वेब सिरीज : अनैतिकतेचा बाजार 

वेब सिरीज : अनैतिकतेचा बाजार 

युवापिढीला मोठ्या प्रमाणात आकर्षित करणार्‍या अमेझॉन, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, अल्ट बालाजी यांसारख्या अनेक ऑनलाइन मीडियाच्या माध्यमातून ‘आश्रम’, ‘पाताल लोक’, ‘लैला’, ‘सेक्रेड गेम्स’, ‘गंदी बात’, ‘कोड एम्.’ आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’ यांसारख्या आक्षेपार्ह वेबसिरीज दाखवल्या जात आहेत. ज्यांच्यावर शासन, प्रशासन वा सेन्सॉर बोर्ड यांच्यापैकी कोणाचेही बंधन किंवा नियंत्रण नाही; परिणामी या माध्यमांतून देशविरोधी, सैन्यविरोधी, हिंदूविरोधी, अश्‍लील, हिंसक, आक्षेपार्ह आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी दृश्ये-संवाद मोठ्या प्रमाणात प्रसारित केली जात आहेत. हे अत्यंत गंभीर असून देशाची एकता अन् सामाजिक शांतता धोक्यात येत आहे. त्यामुळे या सर्व वेबसिरीजवर शासनाने नियंत्रण आणण्यासाठी सेन्सॉर बोर्डासारखी व्यवस्था उभारावी; तोवर या सर्व वेबसिरीजवर तात्काळ बंदी आणण्याची गरज आहे.

भारतीय मनोरंजन विश्वाची व्याप्ती टी व्ही आणि थिएटर्स इथपर्यंत मर्यादित होती, तोपर्यंत त्यांच्यावर सरकारी अनुशासन राहिले, सेन्सॉर बोर्ड या संस्थेच्या माध्यमातून मनोरंजन विश्वाला लगाम होता. टी व्ही मालिका अथवा चित्रपट हे समाजमाध्यमातील सर्व वयोगटातील घटकांच्या आयुष्याचा भाग बनले आहेत, त्यातून समाजाचे अधःपतन होणार नाही, समाजात चुकीचा संदेश जाणार नाही, किंवा समाजात अनैतिकतेचा प्रसार होणार नाही इत्यादीच्या पार्श्वभूमीवर सेन्सॉर बोर्डाने कडक नियमावली बनवली आहे, कोणतीही टी व्ही मालिका किंवा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याची संहिता सेन्सॉर बोर्डातील समितीसमोर मांडली जाते, त्यावर प्रत्येक सदस्य अभ्यास करुन मगच त्याला परवानगी दिली जाते, या कार्यपध्द्तीमुळे तरी भारतीय मनोरंजन क्षेत्र नियंत्रण कक्षात राहिले आहे, मात्र आता परिस्थिती बदलली आहे. मनोरंजन क्षेत्रात आणखी एका व्यवस्थेचा प्रवेश झाला असून या व्यवस्थेने सरकारी अनास्थेपोटी भारतीय मनोरंजन क्षेत्रात बस्तान बसवले आहे. वेब सिरीज असे या व्यवस्थेचे नाव आहे.

स्टोरीज बाय रवींद्रबाथ टागोर, सिलेक्शन डे, क्रिकेट फेव्हर – मुंबई इंडियन्स, रंगबाज अशा वेब सिरीज नंतर अनुराग कश्यप  दिग्दर्शित सेक्रेड गेम्स  या वेब सिरीजची निर्मिती झाली, ज्याला मोठ्या संख्येने दर्शक मिळाले. इंटरनेटचा सर्वाधिक वापर होत असलेला भारत हा चीन नंतर जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे साहजिकच वेब सिरीज सारख्या नव्या व्यवस्थेचे भारतात अल्पावधीतच बस्तान बसले, याची सुरुवात होऊन आता सहा वर्षे होतील. या कालावधीत हिंदी भाषेत ७४, बंगाली भाषेत २६, कन्नड २, मल्ल्यालम २, तामिळ १७ आणि तेलगू ४ इतक्या संख्येने वेब सिरीज प्रदर्शित झाल्या आहेत. अर्थात हा आकडा अजून जास्त असू शकतो. इतक्या वेगात वेब सीरिजचे प्रस्थ वाढत असूनही त्यावर शासनाचे नियंत्रण असावे अशा दृष्टीने सरकारकडून कधीच प्रयत्न झाले नाहीत, सरकारच्या या उदासीनतेमुळेच या वेब सीरिजच्या माध्यातून आता समाजाचे अधःपतन सर्रास होऊ लागले आहे. संभोग दृश्य, अश्लील शिव्या, अश्लील संवाद हे प्रकार आता यात नित्याचे झाले आहेत, मात्र सवग लोकप्रसिद्धीसाठी या वेब सिरीज बनवणारे महाभाग हिंदू धर्म, देव-देवता, संस्कृती, राष्ट्रपुरुष, संत महात्मे यांचा अवमान करत आहेत. अशा वेब सिरीज इंटरनेटवर फुकट पाहायला मिळतात. सध्या शाळकरी मुलांकडेही मोबाईल असतात. अशावेळी या प्रकारच्या अश्लील, संस्कृतिहीन, अनैतिक तसेच हिंदू धर्म, राष्ट्रपुरुष यांचा अवमान करणाऱ्या वेब सिरीज जर लहान मुले पाहत असतील तर त्याचा निश्चितच भारताच्या भावी पिढीवर दुष्परिणाम होत आहे.

नुकतेच प्रकाश झा दिग्दर्शित ‘आश्रम’ ही ‘वेब सीरिज’ २८ ऑगस्ट या दिवशी ‘एम् एक्स प्लेयर’ या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वर प्रदर्शित झाली. या वेब सिरीजमध्ये ज्या आश्रमाचा उल्लेख केला आहे, ते ‘काशीपूर’ या गावातील असल्याचे सांगितले आहे. काशी हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. त्याच्या नावाशी साधर्म्य असणारे गावाचे नाव दाखवून हेतूतः हिंदूंच्या धार्मिक क्षेत्रांची प्रतिष्ठा मलीन करण्याचा प्रयत्न यातून केला गेला आहे. या वेब सिरीजच्या ट्रेलरमध्ये ‘भक्ती कि भ्रष्टाचार’, ‘आस्था कि अपराध’ अशा स्वरूपाची वाक्ये घेतली आहेत. ही हिंदूंच्या मनात आश्रमव्यवस्थेविषयी असलेला आदरभाव नष्ट करू पहाणारी आहेत. कलाकृतीच्या निर्मितीमध्ये कल्पनास्वातंत्र्य असले, तरी त्या कल्पनेच्या आधारे समाजाच्या श्रद्धा भंजन करण्याचा कुणालाही अधिकार नाही.

या वेब सिरीजसोबत एक ‘डिस्क्लेमर’ देखील देण्यात आला आहे. यामध्ये ‘आपल्या देशातील सर्व प्रचलित धर्म-पंथ, विचार, संस्कृती अन् परंपरा आमचा वारसा आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. पण या गौरवशाली वारशाचा कधी कधी विकृत प्रयोग करत समाजातील भोळ्या लोकांचे शोषण केले जाते. तसेच आपल्या पूज्य, सत्य आणि सन्माननीय धर्मगुरूंना अपमानित केले जाते. ‘आश्रम’ची कथा याच विषयावरील एक काल्पनिक कथा आहे.’ या मनोगतातून हिंदूंचा चातुर्याने बुद्धीभेद केला आहे. जर वैभवशाली परंपरा आहे, हे मान्य आहे, तर ती या वेब सिरीजमध्ये कुठेच दाखवण्यात आलेली नाही. असे का ? एकीकडे भोळ्या लोकांचे शोषण केले जात आहे, खर्‍या धर्मगुरूंना अपमानित केले जात आहे, असे म्हणायचे; दुसरीकडे ही कथा ‘काल्पनिक’ आहे, असे म्हणायचे ! हा ‘डिस्क्लेमर’ नसून सरळसरळ बुद्धीभेद करून कायद्यात अडकू नये, म्हणून काढलेली पळवाट आहे.

या वेब सिरीजमध्ये आश्रमातील छुप्या बंकरमध्ये युवतींना डांबून ठेवले जाते आणि त्यांचे लैंगिक शोषण करून त्यांची हत्या केली जाते. अनेक युवती बेपत्ता होऊन त्यांच्या हाडांचे सांगडे सापडतात, असे दाखवले आहे. या चित्रणाद्वारे आश्रमातून मुलींना गायब करून त्यांच्यावर अत्याचार करून मारले जाते, असा संदेश यातून दिला आहे. आश्रमात वेश्या व्यवसाय, अमली पदार्थांची तस्करी, भ्रष्टाचार, भाबड्या भक्तांची फसवणूक, तसेच भारतीय कायद्याला आश्रम झुगारून लावते, या ठिकाणी केवळ आश्रमाचा कायदा चालतो, इथे पोलिसांनाही आश्रमात येण्यापूर्वी प्रवेशद्वाराकडे स्वतःकडील शस्त्रे जमा करावी लागत असतात, असे दाखवण्यात आले आहे. हिंदू धर्मातील आश्रम व्यवस्थेला कलंकित करणारे दिग्दर्शक प्रकाश झा  अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांमधून चालणारे काळे धंदे आणि राष्ट्रविघातक कारवाया यांच्यावर ‘प्रकाश’ टाकण्याची हिम्मत दाखवतील का ?

‘आश्रम वेबसीरिज’मधून भोंदू बाबांच्या खांद्यांवर बंदूक ठेवून हिंदूंचे श्रद्धाभंजन करण्याचा प्रयत्न अश्‍लाघ्य आहे. हिंदूंच्या आश्रमव्यवस्थेविषयी समाजमन कलुषित करण्याचा प्रयत्न हा निषेधार्ह आहे. वास्तविक प्राचीन काळापासून भारताच्या उत्थानामध्ये आश्रमव्यवस्थेने अतुलनीय योगदान दिले आहे. सुसंस्कारित आणि देशभक्त विद्यार्थी घडवणारी गुरुकुले ही आश्रमच होती. आजही भारतभरात साधूसंत, तसेच आध्यात्मिक संस्था यांच्या आश्रमांमध्ये चालणार्‍या सेवाकार्यातून समाज, राष्ट्र अन् धर्म उत्थानाचे मोठे कार्य घडत आहे. हिंदु धर्माच्या मान्यतेनुसार प्रत्येक व्यक्ती ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चार आश्रमप्रक्रियेतून जाते. याविषयी हिंदूंच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक झा यांनी केला आहेच, त्याचबरोबर भारताची जगभरात बदनामी केली आहे.

अनुष्का शर्मांच्या प्रोडक्शन द्वारे निर्मित ‘पाताल लोक’ ही वेबसिरीजही याच उद्देशाने बनवण्यात अली आहे. हि वेब सिरीज  हिंदुविरोधी भूमिकेतून बनवण्यात आलेली असून, त्यात अत्यंत आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली आहेत. यामध्ये एका कुत्रीचे नाव ‘सावित्री’ असे ठेवण्यात आले आहे; मंदिरात पुजारी मांस शिजवून खातांना दाखवले आहेत; भगवे वस्त्र नेसलेले लोक ‘जय श्रीराम’ म्हणत गुंडगिरी करतांना दाखवले आहेत; साधू-संतांना अर्वाच्च शिवीगाळ करतांना दाखवले आहे; एका प्रसंगात एका व्यक्तीला जानवे घालून बलात्कार करताना दाखवले आहे; एक मुसलमान महिला हिंदु महिलेला पाणी देते, तेव्हा ती हिंदु महिला पाणी पिण्यास नकार देते, अशी अनेक समाजात तेढ निर्माण करणारी आणि हिंदु धर्माविषयी द्वेष पसरवणारी दृश्ये दाखवली आहेत.

युवापिढीला मोठ्या प्रमाणात आकर्षित करणार्‍या अमेझॉन, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, अल्ट बालाजी यांसारख्या अनेक ऑनलाइन मीडियाच्या माध्यमातून ‘आश्रम’, ‘पाताल लोक’, ‘लैला’, ‘सेक्रेड गेम्स’, ‘गंदी बात’, ‘कोड एम्.’ आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’ यांसारख्या आक्षेपार्ह वेबसिरीज दाखवल्या जात आहेत. ज्यांच्यावर शासन, प्रशासन वा सेन्सॉर बोर्ड यांच्यापैकी कोणाचेही बंधन किंवा नियंत्रण नाही; परिणामी या माध्यमांतून देशविरोधी, सैन्यविरोधी, हिंदूविरोधी, अश्‍लील, हिंसक, आक्षेपार्ह आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी दृश्ये-संवाद मोठ्या प्रमाणात प्रसारित केली जात आहेत. हे अत्यंत गंभीर असून देशाची एकता अन् सामाजिक शांतता धोक्यात येत आहे. त्यामुळे या सर्व वेबसिरीजवर शासनाने नियंत्रण आणण्यासाठी सेन्सॉर बोर्डासारखी व्यवस्था उभारावी; तोवर या सर्व वेबसिरीजवर तात्काळ बंदी आणण्याची गरज आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार वेब सीरिजच्या माध्यमातून ३ हजार कोटी रुपयांची उलाढाल होत आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात दर्शकसंख्या असतांनाही चित्रपटासाठी जसे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (CBFC) आहे, तसे वेब सिरीजवर कोणतेही नियंत्रण नसणे सामाजिक आरोग्यासाठी धोक्याचे आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय संस्कृती, आध्यात्मिक परंपरा, मठ-मंदिर, संत, राष्ट्र पुरुष यांचा सन्मान करतात, देशवासियांना याची जाणीव करून देतात, असे पंतप्रधान मोदी या बाबतीत अद्याप गप्प का आहेत? हा अनाकलनीय प्रश्न आहे.

First Published on: August 30, 2020 6:23 PM
Exit mobile version