सचिन शून्यावर बाद…!

सचिन शून्यावर बाद…!

4 जून 2020 रोजी रात्री ‘मातोश्री’वरून मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना स्वतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आदेश दिला, ‘सचिन वाझेंना जॉईन करून घ्या’. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी रात्री दहा वाजता सचिन वाझे यांना फोन केला. ‘सचिन, तुम्हे कल से जॉईन करना हैं । सीएम सर की ऑर्डर हैं। आप कल सुबह युनिफॉर्म पहनकर दस बजे ऑफिस आकर मुझे रिपोर्ट करो।’ यावर गोंधळलेले सचिन वाझे आयुक्तांना म्हणाले, ‘सर, ये आप क्या कह रहे हैं। मुझे तो अभी युनिफॉर्म भी देखना पडेगा। उसकी   भी तैयारी करनी पडेगी।   यावर आयुक्त परमबीर सिंह म्हणाले, अब वो आप देख लो और कल सुबह मुझे ऑफिस में आकर मिलो । अब सीएम साब की  ऑर्डर हैं ।’

मुख्यमंत्र्यांच्या थेट आदेशानंतर सचिन वाझे पोलीस विभागामध्ये तब्बल 16 वर्षांनी पुन्हा रुजू झाले. त्यांच्याबरोबर राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम हे तिन्ही पोलीस कर्मचारी सेवेत पुन्हा आले. त्याआधी वाझे यांनी 30 नोव्हेंबर 2007 ला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याचं कारण होतं दुबईहून परतलेला परभणीचा २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर ख्वाजा युनूस याचा २ डिसेंबर २००२ रोजी पोलीस कोठडीमध्ये झालेला संशयास्पद मृत्यू. घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईहून परभणीला तपासासाठी नेताना ख्वाजा युनूस याने पोलिसांच्या गाडीतून अहमदनगर जवळच्या जंगलात पलायन केले. असा बनाव वाझे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ख्वाजा युनूसच्या मृत्यूनंतर रचला होता. यथावकाश वाझे यांना 3 मार्च 2004 रोजी सेवेतून निलंबित करण्यात आलं.

ख्वाजा युनुसच्या संपूर्ण कुटुंबाने व्यवस्थेच्या विरोधात प्रचंड संघर्ष केला. तो अतिशय पराकोटीचा होता. ख्वाजा युनूसचे वडील सय्यद ख्वाजा आयुब हे राज्य सरकारच्या आरोग्य सेवेतून निवृत्त झाले होते. त्यांनी सगळं निवृत्तीवेतन आपल्या पोटच्या मुलाचा मृत्यू हा इतर कोणत्या कारणामुळे नव्हे तर सचिन वाझे यांनी त्याच्या केलेल्या खुनामुळे झाला आहे हे सिद्ध करण्यात खर्च केलं. ख्वाजा युनूसची आई आसिया बेगम 72 वर्षांची वृद्धा अस्थमाच्या आजाराने पीडित आहे. तरीही तिचा आपल्या मुलाच्या न्यायासाठी संघर्ष सुरूच आहे. वाझे आणि त्यांचे सहकारी पोलीस दलात रुजू झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत आसिया बेगम यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण ज्या वाचकांच्या स्मृतीत सचिन वाझे यांची कारकीर्द धूसर झाली असेल, तिला उजाळा देण्याचा हा प्रयत्न आहे.

2003 सालीही एका आईने सचिन वाझेंवर खुनाचा आरोप केला. आता पुन्हा एकदा सचिन वाझेंवर खुनाचा आरोप झाला, तो एका पत्नीकडून. 18 वर्षांपूर्वी झालेला आरोप एका ग्रामीण भागातील मुस्लीम कुटुंबाने केलेला होता. आता मनसुख हिरेन यांची पत्नी विमल हिरेनने केलेला आरोप अधिक तपशीलवार आणि थेट आहे. या आरोपातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांचा उत्तम परिचय होता. अन्यथा बारा लाखांची गाडी चार महिने वाझेंसारख्या ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’च्या हाती सोपवायला मनसुख हिरेन हा काही साधा भोळा, गरीब शेतकरी नव्हता. तर तो ठाण्यातील एक हुशार व्यापारी होता. मनसुख यांच्या पत्नीने एटीएसकडे जो जवाब दिलेला आहे तो पाहिल्यानंतर एक गोष्ट आपल्याला झटकन समजून येते, ती म्हणजे हिंदी चित्रपटांमध्ये अनेकदा ऐकायला मिळणारी एक मसालेदार संवादफेक, ‘पुलीसवाले से ना दोस्ती अच्छी होती हैं, ना दुश्मनी …’

सचिन वाझे यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं वक्तृत्व, अंगची आक्रमकता, एखाद्या विषयाला भिडण्याची त्यांची पद्धत आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संगणकीय विश्वाबद्दलचं त्यांचं अद्ययावत ज्ञान या गोष्टी अचंबित करणार्‍या आहेत. सचिन वाझे यांना अनेक मित्र आहेत. त्यात राजकारणी, माध्यमकर्मी, चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ, खेळाडू यांचा समावेश आहे. 16 वर्षांपूर्वी वर्दी उतरल्यावर त्यातले अनेक गायबही झाले. जी मंडळी वाझेंना ओळखतात त्यांना एक गोष्ट माहीत आहे, ती म्हणजे वाझेंशी गप्पा मारणं हा एक निखळ आनंद देणारा प्रकार असतो. पण बहुधा याच प्रकाराने मनसुख हिरेन यांचा घात झाला असावा. हे मी इतक्यासाठीच म्हणतोय की, मनसुख हिरेन यांच्या पत्नीनं एटीएस अधिकार्‍यांकडे नोंदवलेला जवाब त्याचे ठळक उदाहरण आहे. हा जवाब आपल्याला प्रश्नात पाडून जातो, तो म्हणजे पोलीसवाल्यांबरोबर खरंच मैत्री करू नये का? त्यांना आपल्याजवळ येऊ देऊ नये का? याचा विचार प्रत्येकाने व्यक्तीनिहाय करण्याची वेळ या घटनेनं आणली आहे. पोलिसांकडून जीवघेणी फसगत होण्याची ही काही पहिली घटना नाही. याआधीही पोलीस दलाविषयीच्या अशा अनेक घटना चवीचवीनं चर्चिल्या गेल्या आहेत. मात्र वाझेंसारखा धडाकेबाज अधिकारी अडचणीत आला तो त्यांच्या अंगी असलेल्या फाजिल अतिआत्मविश्वासानं.

सचिन वाझेंचा जन्म 22 फेब्रुवारी 1972 ला कोल्हापूरमध्ये झाला. 1990 मध्ये वाझे राज्य पोलीस दलात आले. पहिल्यांदाच नक्षलग्रस्त गडचिरोली भागात काम करून आलेले वाझे 1992 साली ठाणे पोलिसांत दाखल झाले. नव्वदच्या दशकात महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत टोळीयुद्धाने धुमाकूळ घातला होता. अंडरवर्ल्डच्या गुन्हेगारांनी मुंबईसह ठाण्याला आपलं कार्यक्षेत्र बनवलं होतं. अशाच दिवसांत सचिन वाझे हे ठाण्यात रुजू झाले आणि त्यांनी गुन्हे शाखेमध्ये काम करायला सुरुवात केली. या विभागामध्ये काम करण्यासाठी लागणारे सगळे गुण वाझे यांच्या अंगी होते. वयाच्या पंचविशीत असलेले वाजे हे आपल्या संगणकीय रुचीमुळे आणि ज्ञानामुळे या विषयांमध्ये अधिक लक्षणीय काम करू शकले. त्यामुळे अंडरवर्ल्डमधील सुमारे 65 एन्काऊंटरमध्ये वाझे यांचा सहभाग आहे. पोलीस दलातून बाहेर पडल्यानंतर 2008 मध्ये सचिन वाझे यांनी दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ स्वीकारून दसरा मेळाव्यात जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केला. सचिन वाझे यांचे शिवसेनेबरोबर असलेले निकटचे संबंध कधीच पडद्याआडून नव्हते.

ते इतके खुलेआम होते की मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी घटनास्थळाचा जो दौरा केला त्यावेळी त्यांची गाडी स्वतः सचिन वाझे चालवत होते. त्यांनीच पंचतारांकित ट्रायडंट हॉटेलच्या बाहेर हल्ल्याच्या वेळी मुंबईचे पोलीस आयुक्त हसन गफूर गाडीत बसून झोपा काढत असल्याचं कदम यांना दाखवून दिलं होतं. ठाण्यात राहत असल्यामुळे एकनाथ शिंदे किंवा माध्यमस्नेही असल्यामुळे सेनानेते, संपादक संजय राऊत यांच्याशी दोस्ती असली तरी सचिन वाझे यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी थेट संबंध होते आणि आहेत. उद्धव ठाकरे हे आपल्या कुटुंबापलीकडे कोणावरही मनमोकळं प्रेम करत नाहीत, असं त्यांचे विरोधक म्हणतात.

मात्र याला सचिन वाझे अपवाद आहेत, असं मला वाटतं. बहुदा मुख्यमंत्री उद्धव यांचं मिळालेलं प्रेम. डिजिटल माध्यमावर असलेली विलक्षण पकड, आयुक्त परमबीर सिंंह यांच्या गूडबुकमध्ये असलेलं स्थान, अंगी असलेली कोल्हापुरी आक्रमकता या सगळ्या गोष्टींनी सचिन वाझे यांचा घात केला असेल का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. गेल्या 16 वर्षांत पोलीस दलातील तंत्र आणि मंत्र उभे आडवे बदललेत याचा वाझेंनी विचारच केलेला नसावा. मुख्यमंत्री ठाकरेंच्या विलक्षण विश्वासामुळे ते ‘वर्षा’ आणि पोलीस आयुक्तांच्या मधला दुवा झाले होते. ही गोष्ट अनेक अधिकार्‍यांसह नेत्यांनाही सलत होती. त्यातच वाझे आपलं नसलेल्या कामातही ‘लक्ष’ घालत होते. उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख असतानाची आपली सगळी टीम आमूलाग्र बदलून टाकली आहे. ‘खास’ सहकार्‍यांची जागा ‘विशेष’ अधिकार्‍यांनी घेतली आहे. त्याचाही फटका वाझेंना बसलाय, असं सेनेत बोललं जातंय. त्याचवेळी या वादात राष्ट्रवादी ‘सेफझोन’मध्ये असल्याचं सेना नेत्यांच्या नजरेत आलंय.

मनसुख हिरेन प्रकरणानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यातला क्षमतावान विरोधी पक्षनेता समोर आला. जेव्हा उद्धव ठाकरे यांचा सचिन शून्यावर बाद झालेला आहे, तेव्हा मोदींचा देवेंद्र ज्या त्वेषानं विधानसभेत तीन पक्षांच्या सरकारवर झंझावात होऊन तुटून पडला ते पाहिल्यावर सरकार आता मजबूत चाललंय असं समजणार्‍यांच्या पोटात गोळा आलाय. कारण सचिन वाझेंचा कार्यभार काढून घेऊन विरोधकांना शांत करावं असं मंथन मंगळवारी विधानसभेतील अध्यक्षांच्या दालनात गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्यांमध्ये झालं, असं फडणवीसांनीच सांगितलं. त्यावर इतर नेत्यांमध्ये एकमत झाल्यावर वाझेंना दूर करण्याचा हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गृहमंत्री देशमुखांनी सांगितला. त्यावर ते म्हणाले, ‘नथिंग डुईंग! बिलकुल नाही..वाझेंना संपवायचं नाही.’ मुकेश अंबानींच्या अँटालियाचं प्रकरण हे काही गाव पातळीवरच नाही ते राष्ट्रीय स्तरावरचं आहे. सहाजिकच दिल्ली या प्रकरणाकडे कसं बघते त्यावर राज्यातला खेळ अवलंबून आहे. सचिन तर शून्यावर बाद झालाय. कॅप्टन विचार करतायत, मॅच कशी जिंकायची?

First Published on: March 10, 2021 6:32 PM
Exit mobile version