जागतिक किर्तीचे जादुगार रघुवीर भिकाजी भोपळे

जागतिक किर्तीचे जादुगार रघुवीर भिकाजी भोपळे

रघुवीर भिकाजी भोपळे हे जागतिक किर्तीचे जादुगार होते. त्यांचा जन्म २४ मे १९२४ रोजी आंबेठाण येथे झाला. त्यांनी आपले सगळे आयुष्य जादू या कलेच्या संवर्धनासाठीच समर्पित केले होते. आपले तन मन धन त्यांनी जादू या कलेसाठी वाहून घेतले. जादू ही एक कला आहे. त्याचा खरे तर उगम हा भारतात झालेला आहे. रघुवीर हे मूळचे चाकणजवळील आंबेठाणचे. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे रघुवीर पुण्यामध्ये आले आणि त्या वेळच्या अनाथ विद्यार्थी गृहामध्ये राहिले. माधुकरी मागून त्यांनी शिक्षण घेतले.

एकदा रस्त्याने जात असताना राणा या राजस्थानी कलाकाराला त्यांनी जादूचे खेळ करताना पाहिले. त्यांच्याकडून जादूची ही कला रघुवीर यांनी आत्मसात केली आणि सुमारे ७५ वर्षांपूर्वी पहिला व्यावसायिक प्रयोग केला. गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी जादूगार रघुवीर यांना परदेश दौर्‍यावर नेले आणि तेथून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. जादूच्या कलेमुळे जगभरातील २७ देशांचा प्रवास केला असला तरी पुणे ही त्यांनी आपली कर्मभूमी मानली. आपल्या आयुष्यात त्यांनी सात हजार २३ प्रयोग केले. जादू हा तंत्रमंत्र नाही तर ती हातचलाखी आहे, हे ठसवताना त्यांनी प्रयोगांच्या माध्यमातून जनजागरण केले. ३६५ दिवसांत २०० प्रयोग व तेही हाउसफुल, असे विक्रम त्यांच्या नावावर आहेत.

अनेक गावांतील मंदिरे, शाळा, हॉल, तालमीच्या बांधकामांसाठी निधी मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले कार्यक्रम फुकट दिले. त्यांच्या जादूचे आकर्षण कायम राहिले. त्यांनीही साधी, सोपी उदाहरणे, साधी, सोपी भाषा यातून त्यांनी जादूचे खेळ चालू ठेवले. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जादूगार म्हणून कीर्ती मिळविली. निखळ करमणूक हे सूत्र ठेवून रघुवीरांनी अनेक वर्षे आबालवृद्धांवर अक्षरशः जादू केली. अशा या जगविख्यात जादुगाराचे २० ऑगस्ट १९८४ रोजी निधन झाले.

First Published on: May 24, 2022 5:52 AM
Exit mobile version