व्हॅलेंटाईन्स डे अन् तरुणांच्या आत्महत्या

व्हॅलेंटाईन्स डे अन् तरुणांच्या आत्महत्या

आपला जन्म हा परस्परांसाठीच झाला असून ‘एक दुजे के लिये’ कुछ भी करेंगे या मानसिकतेमुळे यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन्स वीक’मध्ये नैराश्यग्रस्त तरुणांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरुणांना ‘तिचा’ नकार जिव्हारी लागत असल्याने असा टोकाचा निर्णय घेतला जातोय. नकारात्मकता पचवण्याची मानसिकताच दिवसेंदिवस कमी होत असल्याने जगातील सर्वाधिक तरुण देश म्हणून ओळख असलेल्या भारताच्या भविष्याच्या दृष्टीने ही गोष्ट निश्चितच धोकादायक म्हणावी लागेल.

कोरोनामुळे साधारणत: वर्षभरापासून घरी असलेल्या तरुण मुलांना ऑनलाईन शिक्षणासोबत मोबाईलची इतकी सवय झाली आहे की, त्यांना आता शाळा नकोशी वाटते. लॉकडाऊनच्या काळात मोबाईल गेम्स आणि यू-ट्यूबवरील व्हिडीओ बघण्याचे प्रमाण दुपटीने वाढल्याने त्यांच्यातील चिडचिडेपणा कमालीचा वाढला आहे. आई-वडिलांना घरातील दोन मुलांना सांभाळणे अवघड वाटत असताना अशा परिस्थितीत शाळेत येणार्‍या शेकडो विद्यार्थ्यांचा सांभाळ करणे ही शिक्षकांची खर्‍या अर्थाने परीक्षाच ठरणार आहे. खरे तर शाळेतील विद्यार्थी आणि दहावीनंतर कॉलेजमध्ये जाणारे तरुण विद्यार्थी यांच्या बैध्दिकतेत फारसा फरक नसतो. परंतु, इयत्ता दहावी झाल्यानंतर आपण आता कॉलेजला पोहोचल्याची ‘हवा’ त्यांच्या डोक्यात घुसते आणि येथूनच त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स जागा होतो. अर्थात ही हवा निर्माण करण्याचे काम ऑनलाईनचे व्हिडीओ पूरकपणे करतात. फेसबुक असेल किंवा यूट्यूब यांचे शॉर्ट व्हिडीओ आणि व्हॉट्सअ‍ॅपवरील ‘स्टेटस’ हे सध्या सर्वाधिक पसंतीचे विषय बनले आहेत.

‘तू माझ्या स्टेट्सला कमेंट दिली नाही’ म्हणून भांडणारेही अनेकजण आहेत. अशा आभासी जगात वावरणार्‍या तरुणांना पुस्तकी ज्ञान हे फक्त पास होण्यापुरते आवश्यक वाटू लागले आहे. त्यामुळे शाळेत फक्त गुण मिळवण्याच्या दृष्टीने बघणार्‍या या तरुणाईला ऑनलाईन शिक्षणात अधिक रस वाटू लागला आहे. त्यातही एकीकडे शिक्षण आणि दुसरीकडे मनोरंजन असा ‘गोलमाल’ सुरु असल्याने अभ्यासाचे ‘टेन्शन’ मुलांना आता नकोशे वाटते. यातही काही विद्यार्थ्यांना घरी राहण्यापेक्षा शाळेत आवडते, हा भाग वेगळा. परंतु, ज्यांना अभ्यासाची फारशी गोडी नाही, असे विद्यार्थी ऑनलाईनला प्राधान्य देतात.

तरुण वयात मुलांचा पाय घसरतोच! पण त्यातून घडणार्‍या गैरप्रकारांमुळे कुटुंबातील व्यक्ती व्यथित होतात. एखादी घटना घडून गेल्यानंतर पश्चाताप करण्याशिवाय दुसरा उपाय नसतो. परंतु, आपल्या मुलांमधील कालानुरुप घडणारे बदल हे त्यांच्या पालकांच्या निदर्शनास येत असतात. बडबड करणारी मुले अचानकपणे गप्प रहायला लागतात. काही मुले जास्त रडतात. धुमसणार्‍या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी ते जागा शोधतात. मुलांमधील हे बदल पालकांनी ओळखले पाहिजे. मुळात एकतर्फी प्रेमातून आत्महत्या होण्याचे प्रमाण अलिकडे वाढल्याचे दिसून येते. ‘एक दुजे के लिये’ या हिंदी चित्रपटानंतर गोव्यातील ‘त्या’ ठिकाणी आत्महत्या करण्याचे एकप्रकारे ‘फॅड’च उठले होते. त्यानंतर सरकारने या जागेवर जाण्यास बंदी घातली. मुलांच्या मानसिकतेवर प्रभाव पाडण्यात चित्रपटांचा मोठा वाटा आहे. त्यातही नकारात्मक बाबी चटकन लक्षात ठेवतात. एखाद्या मुलीवर एकतर्फी प्रेम केले म्हणजे ती आपली ‘प्रायव्हेट प्रॉपर्टी’ समजायला लागतात. त्यातूनच एकाधिकार शाहीचा उगम होतो. अर्थात हे फक्त मुलांच्याच बाबतीत घडते असे नाही तर काही प्रकरणांमध्ये मुलीही आग्रही असल्याचे दिसून येते.

आपल्याला आवडणारी व्यक्ती काही मिनिटांमध्ये आपली होते, हे चित्रपटात ज्या पद्धतीने दाखवले जाते, त्याचा थेट मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. पूर्वी ‘स्टंट’ करणारी मुले ही उनाड म्हणून दुर्लक्षित होती. आता या मुलांनाच वर्गात घाबरणारे शिक्षक दिसतात. त्यातून भाईगिरीची एक वेगळीच ‘इमेज’ तयार होते. आपल्याला सगळेच घाबरतात म्हटल्यावर मुले ‘नेतेगिरी’ करायला लागतात. तरुणांमध्ये गल्लीतील ‘भाईं’चा वेगळाच आदर्श असतो. यातून ही धटिंगणशाहीची मानसिकता तयार होते. परंतु, चित्रपटातील भाईचे एखाद्या मुलीवर जसे प्रेम असते, तशाच स्वरुपाचे भाई आता गल्लोगल्ली दिसू लागले आहेत. तरुणांची ही मानसिकता कोणत्या दिशेला घेऊन जात आहे, हे पालकांनाही कळते. परंतु, मुलांमधील बदलांकडे लक्ष न देणार्‍या पालकांना त्याच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.

टीव्ही, मोबाईल आणि इंटरनेट यांच्या आभासी जगात वावरणारी तरुण पिढी आता वेगळ्याच मानसिकतेत दिसते. ते म्हणजे नैराश्य अन् चिडचिडेपणा! मुलांना नकार सहन होतच नाही. मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की त्यातून नैराश्य येते. ही मानसिकता बदलण्यासाठी अनेक तरुण मुले व्यसनाच्या आहारी जातात. मुलींचेही प्रमाण यात खूप जास्त आहे. परंतु, आपली मुलगी व्यसन करते, हे पालक आजही उघडपणे सांगत नाहीत. समाजात आपली काय इज्जत राहील, या भीतीपोटी या गोष्टी लपवल्या जातात. तरुणांचा चिडचिडेपणा किंवा स्वभावातील बदल हे ओळखून त्यानुसार घरातील वातावरणात बदल घडविल्यास नैराश्य कमी होण्यास मदतच होईल. मुलांसोबत जेवायला बसले पाहिजे. त्यांच्यासोबत खेळायला, फिरायला गेल्यास त्यांचेही मन मोकळे होऊ शकते.

लॉकडाऊनच्या काळात टीव्ही, मोबाईल गेम्सचा भारतात मोठ्या प्रमाणात वापर वाढल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. यातही भारतात पॉर्न फिल्म बघण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. परंतु, यामागील कारणे शोधली असता भारतात, ‘सेक्स’विषयी खूप मोठ्या प्रमाणात अज्ञान दिसून येते. त्यातून सर्च करण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येते. गुगलवर झालेले हे संशोधन करताना थेट पॉर्न साईट बघणार्‍या व्यक्तींना सोडून करण्यात आले आहे. त्यामुळे पॉर्न साईटऐवजी गुगलवर सर्च करण्यात भारतीय पुढे असल्याचे दिसते. पॉर्न बेवसाईट बघण्यात महिलांचे प्रमाणही अलिकडील काळात वाढत चालले आहे. यातून बदलती मानसिकता आपल्या लक्षात येऊ शकते. अशा आभासी वातावरणातून शाळांमध्ये येणार्‍या तरुण पिढीला सांभाळण्याची कामगिरी ही शिक्षकांना करावी लागणार आहे. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांमधील चिडचिडेपणा कमालीचा वाढला आहे. यातूनच ‘व्हॅलेंटाईन्स वीक’मध्ये एकट्या नाशिक जिल्ह्यातच सात व्यक्तींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे सटाण्यासारख्या ग्रामीण भागात राहणार्‍या अत्यंत गरीब कुटुंबातील 18 वर्षीय युवती आणि 20 वर्षांच्या तरुणाने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली.

प्रेम हे काही परिस्थिती बघून होत नसते. ‘ते तुमचं आमचं सेम असतं’ असे म्हटले जाते. परंतु, वाढत्या तंत्रज्ञानामुळे एरवी शहरात घडणार्‍या गोष्टी आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याने त्याचे दुष्परिणामही दिसून येत आहेत. चित्रपटांमधील झगमगती दुनिया, मोबाईलमधील गेम्स, पॉर्न फिल्मस् आणि ‘स्टेटस’ हे सध्याच्या तरुणांमधील ‘फॅड’ कमी होण्याची आवश्यकता आहे. परंतु, त्याला आळा घालणार तरी कोण आणि कशा पध्दतीने हा खरा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. तरुणांना त्यापासून दूर ठेवणे अशक्य होत असल्याने पालकांचे ‘टेन्शन’ वाढू लागले आहे. एखाद्या व्यक्तीविषयी असलेले प्रेम मिळवताना संपूर्ण आयुष्य पणाला लावण्याची आवश्यकता नसते, हे ‘मीरा’ने तीच्या प्रेमातूनही दाखवून दिले. आपले प्रेम यशस्वी झाले नाही म्हणून आयुष्य संपवणारे अजरामर होतात, असेही नाही.

एकदा मिळालेले आयुष्य अधिक सुंदर जगण्यापेक्षा दुसरा आनंद कोणताच नसतो. प्रेमामुळे जीवन अधिक समृद्ध होणे अपेक्षित आहे. जर आपल्याला हवी असलेली व्यक्ती मिळाली नाही, तर त्याचा धक्का मानवी मनाला बसतोच, हे जीवशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय सत्य आहे. कारण ज्याला ठेच लागते, त्यालाच त्याची वेदना कळत असते. पण ठेच लागली म्हणून आपण पाय कापून टाकत नाही. ज्या बोटांचा ठेच लागली आहे, जखम झाली आहे, त्याला मलमपट्टी करून उपचार करतो. प्रेम हे बसगाडी सारखे आहे, आपण बसस्टॉपवर उभे असतो, त्या स्टॉपवर आलेली गाडी आपल्याला मिळेलच असे नाही, पण ती मिळाली नाही, म्हणून जीव देण्याची गरज नाही. मागून दुसरी गाडी येणारच असते. आपण थोडी वाट पाहायला हवी. जीवन सुंदर आहे, वाट पहा. त्याची वाट लावू नका.

First Published on: February 15, 2021 6:50 AM
Exit mobile version