साहित्यिक ना. सी. फडके

साहित्यिक ना. सी. फडके

नारायण सीताराम फडके हे युगप्रवर्तक मराठी कादंबरीकार, कथाकार, मराठी लघुनिबंधाचे आद्य प्रवर्तक आणि साहित्य समीक्षक. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १८९४ रोजी नगर जिल्ह्यातील कर्जत याठिकाणी झाला. त्यांचे वडील सीताराम फडके हे वेदान्ती होते. वेदान्तनिदर्शन (१९१३) हा व्यासंगपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. फडक्यांचे प्राथमिक शिक्षण वडूज (जि. नासिक), बार्शी (जि. सोलापूर), पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी, तर माध्यमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजात झाले. १९१७ साली ते एम.ए. झाले. तत्पूर्वीच, १९१६ मध्ये न्यू पूना कॉलेजात (आजचे स. प. महाविद्यालय) प्राध्यापक झाले.

‘मेणाचा ठसा’ ही फडके यांची पहिली कथा केरळ कोकिळ ह्या मासिकात प्रसिद्ध झाली (१९१२). ‘अल्ला हो अकबर!’ (१९१७) ही त्यांची पहिली कादंबरी. मारी कोरेली ह्या इंग्रज कादंबरीकर्तीच्या टेंपरल पॉवर ह्या कादंबरीच्या आधारे ती लिहिलेली आहे. त्यानंतर त्यांनी अनेक कथा आणि कादंबर्‍या लिहिल्या. मात्र, कादंबरीलेखन हे त्यांचे विशेष कर्तृत्वाचे क्षेत्र ठरले. कला ही कलेसाठीच असते वाचकांना सौंदर्यदर्शन घडविणे व आल्हाद देणे हेच कादंबरीकाराचे प्रमुख कार्य, ह्या भूमिकेतून त्यांनी प्रमाणबद्ध, आटोपशीर आणि लाघवयुक्त कादंबर्‍यांचे एक युगच मराठीत सुरू केले. ‘कुलाब्याची दांडी’ (१९२५), ‘जादूगार’ (१९२८), ‘दौलत’ (१९२९), ‘अटकेपार’ (१९३१), ‘निरंजन’ (१९३२) ह्या त्यांच्या आरंभीच्या कादंबर्‍यांतील प्रणयरम्यता, कुशल, सफाईदार व्यक्तिरेखन, चतुर संवाद आणि मोहक भाषाशैली ह्या गुणांनी वाचकांच्या मनांची पकड घेतली.

त्यानंतरच्या ‘उद्धार’ (१९३५), ‘प्रवासी’ (१९३७), ‘अखेरचं बंड’ (आवृ. दुसरी, १९४४) ह्या महत्त्वाच्या कादंबर्‍यांतून प्रणयरम्यतेला त्यांनी गंभीर विषयांची जोड दिली आणि महाराष्ट्रातील काही असामान्य व्यक्तिमत्त्वांचे दर्शन त्यांतून घडविले. तथापि हे करीत असताना कल्पितालाही त्यांनी वाव दिला आणि ह्या कादंबर्‍या ‘चरित्रात्मक’ होऊ दिल्या नाहीत. गेल्या पन्नास-साठ वर्षांतील महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा उपयोग त्यांनी आपल्या पुढील कादंबर्‍यांतून पार्श्वभूमीसाठी करून घेतला. ‘बेचाळीसचे पत्रीसरकार’ (झंझावात, १९४८), ‘काश्मीरचे स्वातंत्र्योत्तर राजकारण’ (जेहम, १९४८), ‘गोवामुक्तीचे आंदोलन’ (उजाडलं ! पण सूर्य कुठे आहे? १९५०) अशा काही कादंबर्‍या त्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत.

‘ऋतुसंहार’ (१९५८), ‘कुहू ! कुहू !’ (१९६०), ‘ही का कल्पद्रुमांची फळं?’ (१९६१), ‘एक होता युवराज’ (१९६४) ह्या त्यांच्या नंतरच्या कादंबर्‍यांपैकी काही होत. सखोल, अनाकलनीय, गूढ व झपाटून टाकणारे जीवनानुभव फडके ह्यांच्या कादंबर्‍यांतून प्रत्ययास येत नाहीत, तथापि कांदबरी लेखनाबाबत त्यांनी स्वीकारलेल्या भूमिकेशी आणि लेखनतंत्राशी त्या नेहमीच सुसंगत राहिल्या. त्यांच्या काही कादंबर्‍यांचे आणि कथांचे इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांतून अनुवादही झालेले आहेत. कलंक शोभा (१९३३) ह्या त्यांच्या कादंबरीवरून मराठी चित्रपटही काढण्यात आला होता. फडके यांची तंत्रनिष्ठ कलादृष्टी त्यांच्या कथांतून मोठ्या प्रमाणात दिसते. त्यांच्या कथांचे पंचविसांहून अधिक संग्रह प्रकाशित झालेले असून, त्यांच्या काही प्रातिनिधिक कथा बावनकशी (१९६२) ह्या नावाने संग्रहीत केलेल्या आहेत. अशा या महान साहित्यिकाचे २२ ऑक्टोबर १९७८ रोजी निधन झाले.

First Published on: August 4, 2021 3:15 AM
Exit mobile version