देशी ‘रूपे’ कार्ड तुमच्या-आमच्या सोयीचे !

देशी ‘रूपे’ कार्ड तुमच्या-आमच्या सोयीचे !

व्हिसा आणि मास्टर कार्ड्स पाठोपाठ रूपेची वाढती लोकप्रियता

भारतासारख्या महाकाय देशासाठी दहा प्रमुख बँका आणि रिझर्व्ह बँक यांनी पुढाकार घेऊन ‘एनपीसीएल’ म्हणजेच देशांतर्गत पहिली रिटेल पेमेंट सिस्टीम यंत्रणा स्थापन केली. 26 मार्च,2012 व्यापारी व्यवहार आणि व्यक्तिगत यासाठी रिटेल पेमेंट सिस्टीम उभी करण्याचे प्रयत्न सुरु झाले. त्यातून जन्माला आले देशातील पहिले पेमेंट कार्ड – रू-पे -हे आपले स्वत:चे आहे. आपल्या चलनातून पेमेंट करण्यासाठी. आजवर आपल्याकडे मास्टर आणि व्हिसा कार्ड्स सर्रास वापरली जातात, परंतु आता एक चांगला आणि देशी असा पर्याय आपल्याला मिळालेला आहे.

फार पूर्वी वस्तूच्या बदली वस्तू देऊन  एकमेकांच्या गरजा भागवल्या जायच्या, पण पैसा-जन्मला आणि व्यवहार सुलभ झाला. पुढे आर्थिक शोधसुविधांतून कार्ड-पद्धती उदयाला आली. आणि बघता बघता आधी डायनर्स आणि त्यानंतर क्रेडीट-डेबिट आणि एटीएम अशा कार्ड्सनी अक्षरशः इतिहास घडवला. तुम्हाला आठवत असेल तर नोटाबंदीसारख्या आणीबाणीच्या काळात आपल्या तोंडचे पाणी पळाले होते, तेव्हा कार्ड्स आणि प्लास्टिक-मनी आपल्या मदतीला आला. कागदी चलनाची चणचण दूर होण्यास मदत झाली. तेव्हाच सोयीचे असे पेटीएम आणि अन्य ऑन-लाईन पेमेंट सुविधा अधिक कार्यान्वित झाल्या. आज आपण क्रेडिट-डेबिट कार्ड्स वापरतो, पण ही दोन मुख्य प्रणाली-व्हिसा व मास्टर यांच्याशी सलग्न आहेत. हे आपल्याला ठावूक आहे का? नसेल तर आज आपण या जागतिक कार्ड-प्रणालींचा परिचय करून घेणार आहोत आणि आपल्या देशात जन्माला आलेल्या व अल्पावधीतच लोकमान्यता मिळवणार्‍या ‘रू-पे’ची माहिती करून घेणार आहोत.

पार्श्वभूमी- प्लास्टिक मनीची सुरुवात -रोखीला शह देण्यास प्रारंभ !

याच दरम्यान सिटी बँक या अमेरिकन बँकेने क्रेडिट कार्ड आपल्याकडे आणले तशी त्याआधी श्रीमंतांसाठी ‘डायनर्स कार्ड’ होतीच. उच्चभ्रू आणि नव-श्रीमंतांना ही कार्ड असणे आणि वापर करणे हे प्रतिष्ठेचे वाटू लागले होते. पुढे ही कार्ड इथे रुजली आणि गेल्या 10-12 वर्षात तर क्रेडिट कार्डांच्यापाठोपाठ डेबिट कार्ड्स आणि एटीएम यांनीदेखील बँक ग्राहकांच्या मनात आणि अर्थ-व्यवहारात स्थान निर्माण केले.

कागदी -पेपर बँकिंगचे युग मोडीत निघाले !
1980 पर्यंतची बँकिंग सिस्टीम ही कागदी आणि रजिस्टर्सने बांधलेली होती. परंतु देशात संगणक अवतरला आणि त्याने बँका-बँकात प्रवेश केला. संगणक आणि पाठोपाठ इंटरनेट आल्याने शाखा आणि शाखांतर्गत व्यवहार कनेक्ट झाले आणि ग्राहक-सेवेची परिमाणे वाढू लागली. नवनव्या सेवा देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याची स्पर्धा सुरू झाली हा चमत्कार घडला ते आपल्या अर्थ आणि बँकिंग व्यवस्थेत निर्माण झालेल्या खुला व्यवस्थेमुळे. पण हे सर्व स्थिर होते आहे, तोवर मोबाईल बँकिंगची क्रांती झाली आणि एकूण आपल्या बँकिंगचा चेहरा-मोहराच बदलून गेला.

नोटबंदी झाल्यानंतर जे काही बदल झाले किंवा ज्याप्रकारे आपण बँक कार्ड्स, इंटरनेटद्वारे पेमेंट्स करणे किंवा मोबाईलचा वापर करणे किंवा पेटीएम किंवा तत्सम थेट पेमेंट्सची साधने ही ‘रोखीला पर्याय’ म्हणून वापरली गेली, ही एक सकारात्मक बाब मानायला हवी. गरजच इतकी अत्यावश्यक होती की, समोर जे काही सोयीस्कर असेल ते स्वीकारणे अटळ होते. सारी शहरी जनता आपल्या दैनंदिन गरजांसाठी हवालदिल झाली होती. कारण स्वत:कडे असलेले पैसे निकामी झाले होते,बँकेतील खात्यात पैसे असूनही काढणे अवघड आणि निर्बंध लादले गेले होते. एटीएम कार्ड्स हाताशी असूनही यंत्रे नोटाविना उभी होती. अशा विदारक परिस्थितीत जिथे कुठे पेटीएमरुपी पर्याय असेल तिथे धावत सुटले. आठवत असेल तर 2012 साली केवळ मोबाईल रिचार्ज आणि बिले भरण्याच्या हेतूने स्थापन झालेली ही कंपनी जास्त प्रकाशात आली ती निश्चलनीकरण प्रक्रियेत. तशा अनेक ऑन-लाईन पेमेंट टेक्नॅलॉजी कंपन्या बाजारात आल्या आणि त्यांनी लाईफ-टाईम कमाई करून घेतली.

खुद्द भारत सरकारने भीम app ची निर्मिती केली त्याला सुरुवातीलाच 10 लाखांवर नोंदणीचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. रिझर्व्ह बँकेच्या एका आकडेवारीनुसार गेल्या वर्षात ‘डिजिटल व्यवहारांची’ संख्या किमान 40 टक्के इतकी वाढली.2019 मध्ये आणखीन वाढ अपेक्षित आहे. ऑन-लाईन पेमेंट्स वाढली. लोकांनी आगावू पेमेंट करण्याचे धोरण अवलंबिले. हे सर्व केवळ गरजेपोटी जरी झाले, तरी हळूहळू असे व्यवहार सुलभ होत आहेत, ही जाणीव ग्राहकांना झालेली आहे. म्हणूनच छोटी गावे आणि निम-शहरेदेखील काही मागे राहिलेली नाहीत. हळूहळू रोकडवरून थेट पेटीएमवर आले. भाजीवाले, किराणा आणि अन्य लघु आणि मध्यम विक्रेते नाईलाजाने का होईना, पण या आधुनिक पेमेंट यात्रेत सहभागी झाले. आणि आपली वाटचाल सुरक्षित आणि जलद अशा डिजिटल प्रणालीकडे होत आहे.

रु-पेचे पेमेंट सिस्टीममध्ये आगमन आणि कार्यविस्तार-
कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करताना जे काही मूलभूत घटक मानले जातात, त्यात पेमेंट सिस्टीमला फार महत्त्व आहे. एखाद्या देशात व्यापार-उद्योगाचे व्यवहार,व्यक्तिगत आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी काय यंत्रणा आहे हे बघितले जाते. ती निर्दोष आणि सक्षम असणे जरुरीचे असते.कारण देशांतर्गत अर्थ-व्यवहार सुकर असतील तरच अर्थव्यवस्था भक्कम होऊ शकते, तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार-व्यवहार सुलभ-सुरक्षित होऊ शकतात. दोन्हीचा उत्तम समन्वय असेल तर आयात-निर्यात आणि एकूणच परराष्ट्रीय धोरण सशक्त होऊ शकते.

हे सर्व लक्षात घेऊन भारतासारख्या महाकाय देशासाठी दहा प्रमुख बँका आणि रिझर्व्ह बँक यांनी पुढाकार घेऊन ‘एनपीसीएल’ म्हणजेच देशांतर्गत पहिली रिटेल पेमेंट सिस्टीम यंत्रणा स्थापन केली. 26 मार्च,2012 व्यापारी व्यवहार आणि व्यक्तिगत यासाठी रिटेल पेमेंट सिस्टीम उभी करण्याचे प्रयत्न सुरु झाले. त्यातून जन्माला आले देशातील पहिले पेमेंट कार्ड – रू-पे -हे आपले स्वत:चे आहे. आपल्या चलनातून पेमेंट करण्यासाठी. आजवर आपल्याकडे मास्टर आणि व्हिसा कार्ड्स सर्रास वापरली जातात, परंतु आता एक चांगला आणि देशी असा पर्याय आपल्याला मिळालेला आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी असे स्वतंत्र कार्ड आणि पेमेंट यंत्रणा असणे जरुरीचे होते.

रु-पेची ठळक वैशिष्ठ्ये-
देशी बनावटीचे , क्रेडिट -डेबिटचा संकर असलेले कार्ड
स्वत:चे पेमेंट गेटवे आणि मान्यताप्राप्त पेमेंट नेटवर्क
देशांतर्गत प्रोसेसिंगची व्यवस्था
व्यवहार -उलाढाल खर्च माफक
देशात सर्वत्र स्वीकारले जाते
माहितीचा डेटा त्याची विश्वासार्हता जपण्याची खात्री
एसेमेसद्वारे ताजी माहिती देण्याचे संकेत

रु-पे वापराचे फायदे –
1) स्थानिक पेमेंटची सुविधा
2) देशभरातील सर्व एटीएम्स अंदाजे- 1.45 लाख, पोईंट ऑफ सेल पीओएस टर्मिनल्स -8.75 लाख आणि ई-कॉमर्स पोर्टल्सवर किमान 10,000 स्वीकृती म्हणून अधिक सोयीचे
3) परवडण्याजोगे देशी कार्ड
4) देशातच प्रोसेसिंग होत असल्याने अन्य विदेशी कार्ड्सपेक्षा तुलनेने स्वस्त
५) व्यवहार-खर्च रास्त
६) कार्ड मंजुरीसाठी विलंब नाही, त्वरित मिळण्याचे फायदे
७) व्यवहारात रुपयाचा वापर वाढवण्यास आणि त्याद्वारे आपल्या रुपयाची ‘मूल्य’ वृद्धी करण्यास पोषक
८) ग्राहक आणि त्यांच्या गरजानुरूप साधने असल्याने सोयीचे
९) वार्षिक फी मर्यादित आणि रास्त
१०) व्यवहार सुलभ-जलद आणि सुरक्षित
1१) दिलेली माहिती सुरक्षित राखण्याची हमी
1२) देशातील विकसित न झालेला भाग आणि सेवाक्षेत्रात नसलेल्यांना सामावून घेण्याची संधी
1३) इएमव्ही हे अत्याधुनिक तंत्र आंतरराष्ट्रीय कार्ड्ससाठी वापरले जाते. यात चीपचा वापर असल्याने कार्यक्षमतेत व सुरक्षेत अधिक भर पडते

काही त्रुटी किंवा कमतरता –

1) व्हिसा आणि मास्टरइतकी व्याप्ती आणि कार्यक्षमता, जागतिक दर्जा नाही, त्यांचे ब्रॅण्डनेम मोठे आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय यंत्रणा म्हणून दर्जा व सफाई उत्तम, त्यातुलनेत रु-पे नवीन असल्याचे काही तोटे असू शकतात.

2) कार्ड ब्लॉक करणे – याकरिता व्हिसा व मास्टर यांची यंत्रणा अधिक सफाईदार – जगाच्या कोणत्याही भागातून रोखण्याची प्रक्रिया करता येते. गैरवापर आणि अनधिकृत व्यवहारास लागलीच पायबंद घालता येतो.

3) ऑन-लाईनचा वापर त्यामानाने कमी, पण यापुढील काळात वाढू शकतो.

4) क्रेडिट कार्ड नसल्याची उणीव
असे काही तोटे किंवा उणीव असल्या तरीही रु-पे या पहिल्यावहिल्या रिटेल पेमेंट कार्डने आपली सोय केलेली आहे आणि एक स्थिर अशी पेमेंट व्यवस्था उभी राहिलेली आहे. देशातील अंतर्गत व्यापार आणि व्यक्तिगत व्यवहार सुलभतेने होण्यास रु-पे नक्कीच मोलाची कामगिरी करीत आहे आणि भविष्यात ‘रिटेल पेमेंट यंत्रणा’ अधिक सक्षम होईल, अशी आशा आहे.

First Published on: January 26, 2019 4:49 AM
Exit mobile version