नौशादजी…

नौशादजी…

नौशादजी

त्या काळीही कलेचा आस्वाद घेणारे लोक होते, हे खरंच आहे. पण तरीही कित्येकांच्या घरात कलाकार होण्याला परवानगी मिळण्याची चोरीच होती. कलेची कदर, पण कलाकार होण्याला मात्र मनाई असा तो अजब काळ होता. त्या अशाच काळात नौशाद वाहिद अली म्हणजे संगीतकार नौशाद यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म झाला लखनऊमध्ये. लखनऊ म्हणजे संगीतातल्या सुरावटीला आणि नृत्याच्या पदन्यासाला दिलोजान से दाद देणारं कलागुणप्रेमी शहर. संगीत आणि नृत्याची पंढरीच. अशा संगीत आणि नृत्यमय लखनऊमध्ये घर असलेल्या नौशादमियाच्या घरी नक्कीच रसिक माणसाचा राबता असणार असा समज कुणीही करून घेईल.

पण तिथेच अनेक जणांची फसगत होत होती. कारण सरळ होतं. नौशादजींच्या घरी कला वगैरे गोष्टींना साफ विरोध होता. त्यांच्या घरात अतिशय कर्मठ वातावरण होतं. घरातील एकूण एक मंडळी कर्मठ होती. लखनऊसारख्या कलेच्या पंढरीत राहूनही कला वगैरे गोष्टींबद्दल घरातल्या सगळ्यांना रागच होता. विशेष म्हणजे संगीत नावाच्या प्रकाराला तर त्यांचा अतिशय विरोध होता. खासकरून नौशादजींच्या वडिलांचा तर पराकोटीचा विरोध होता. अशा घरात नौशाद नावाच्या एका संगीतकाराचा जन्म झाला ते फारच गमतीदार होतं.

अशा घरातून नौशादजींना संगीताचं वेड लागलं. अशा घरातून नौशादजी संगीतकार म्हणून आपली पायवाट कशी काय चालले आणि एक यशस्वी संगीतकार म्हणून कसे काय पुढे आले ही एक थक्क करणारी कहाणी आहे.

त्याचं झालं असं की लखनऊमधल्याच एका वाद्याच्या दुकानात नौशादजी जात असत आणि कुतुहलापोटी तिथे काम करत असत. त्या दुकानातली वाद्य घासूनपुसून ठेवत असत. त्या वाद्यांची अशी साफसफाई करत असतानाच कधी कधी ती वाद्य ते अधेमधे वाजवूनही पहात. त्यासाठी त्या दुकानात जाणं त्यांना फार आवडे. ते त्या कामासाठी त्या दुकानात अगदी वेळेवर काय, वेळेच्या आधीच जात. अशाच एकेदिवशी हार्मोनियम पुसता पुसता आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांनी हार्मोनियमवरून लपूनछपून सहज बोटे फिरवली. पण तितक्यात त्या दुकानाचा मालक दुकानात अनपेक्षितपणे अवतरला आणि नौशादजींच्या मागे येऊन उभा राहिला. झाल्या प्रकाराने नौशादजी दचकले, ओशाळले. पण मालकाने नौशादजींचं कलासक्त मन ओळखलं. त्यांची संगीताबद्दलची, सात सुरांबद्दलची ओढ समजून घेतली आणि खूश होऊन ती हार्मोनियम नौशादजींना बक्षीस म्हणून देऊन टाकली.

ती हार्मोनियम घेऊन त्यांनी काही काळ नाटकांना संगीत दिलं. त्यासाठी खूप मेहनत घेतली. त्या मेहनतीचं फळ म्हणून काही मुकपटांना संगीत द्यायचं काम त्यांना मिळाले. हे काम करताना आपला एकूण कल हा संगीतात काही नव्याची निर्मिती करण्याकडे असल्याचं त्यांना कळलं. याच दरम्यान ते सतार शिकले. पण याच काळात त्यांचं कलेबद्दलचं प्रेम, त्यांची गाणे बजावण्याबद्दलची ओढ त्यांच्या ओतप्रोत कर्मठ घरात कळली. एव्हाना गाणं बजावण्याच्या प्रेमाने त्यांच्या मनात एक जबरदस्त जिद्द निर्माण केली होती. ती जिद्द आता त्यांच्यातल्या संगीतावरच्या प्रेमाला लखनऊपुरतंच कुंपण घालू शकत नव्हती. आता त्यांच्या मनाला मायानगरी मुंबईचे वेध लागले होते.

या अशा मनस्थितीत एकदा ते घरात शिरले. तोपर्यंत नौशादजी गाणं बजावण्याच्या कमालीचे नादी लागले आहेत, याचा पुरता सुगावा त्यांच्या कर्मठ घराला लागला होता. घरात शिरता शिरता नौशादजींना कर्मठ स्वरातच घराण्याकडून त्याबद्दल जाब विचारला गेला. काय चाललंय हे तुझं? नौशादजी कधीच आपल्या वडिलांच्या नजरेला नजर मिळवत नसत. पण या वेळेस त्यांनी कशाचाही मुलाहिजा न ठेवता सरळ सांगून टाकलं, गाणं बजावण्याची मला बेहद आवड आहे. मी आयुष्यभर गाणं करायचं ठरवलं आहे. भले त्यासाठी घर सोडावं लागलं तरी चालेल! आणि नौशादजींनी खरंच आपलं घर सोडलं आणि एकच शिफारसपत्र घेऊन, अगदी तुटपुंजे पैसे खिशात टाकून मुंबई गाठली.

मुंबईत आल्यानंतरची त्यांची पुढची पायवाट सहजसोपी नव्हती. अनेक खस्ता त्यांना खाव्या लागल्या. इतक्या की कांचन नावाच्या एका सिनेमाच्या संगीताचं काम त्यांना मिळालं, पण वादकांनी जाणूनबुजून त्यांना सहकार्य केलं नाही. म्हणून त्यांनी तो सिनेमा सोडून दिला. काहींनी त्यांच्यावर, रागदारीच्या चौकटीत तशीच्या तशी फिट गाणी बसवणारा संगीतकार म्हणून कठोर टीका केली, पण नौशादजींनी ती टीका मनाला लावून घेतली नाही. त्यांनी बैजू बावरा या सिनेमासाठी रागदारीवर आधारलेलं ‘मन तरपत हरी दर्शन को आज’ यासारखं सुबकसुबर गाणं केलं आणि महंमद रफींच्या आवाजात ते जसं सर्वोत्तम गाण्यापैकी एक असलेलं हे गाणं आहे. तसं पाहिलं तर महंमद रफींच्या सर्वोत्तम गाण्यापैकी बहुतांश सर्वोत्तम गाणी ही नौशादजींनी दिलेली आहेत. हा नौशादजींच्या कामगिरीच्या मूल्यमापनाचा एक निकष सांगता येईल.

नौशादजींच्या संगीताला रागदारी संगीताची महिरप असली तरी त्यांना लोकसंगीताचीही अत्यंत चांगली जाण होती. त्यांची ही जाण प्रकर्षाने दिसली ती ‘दुख भरे दिन बिते रे भैया, अब सुख आयो रे’ . या गाण्यात दुख भरे दिन या गाण्यातला भैया हा शब्द नौशादजींनी शहरी उच्चारला न जाता तो पूर्णपणे देहाती उच्चारला जाईल याची पुरेपूर काळजी घेतली. लोकसंगीताच्या बाजातलं नौशादजींच्या आणखी एका गाण्याचं उदाहरण द्यायचं झालं तर ‘लह जे हो तो मानवा मा कसक होई वे करी’ या गाण्याचं देता येईल. नौशादजींच्या संगीतावर त्यांच्या समकालिनांनी रागदारी संगीताचा जो शिक्का मारला होता त्याच्या अगदी दुसर्‍या टोकाचं गाणं नौशादजींनी लोकांसमोर आणलं होतं. हे गाणं त्या काळात लोकांनी डोक्यावर घेतलं होतच. पण नंतरच्या ऑर्केस्ट्राच्या जमान्यातही या गाण्याशिवाय ऑर्केस्ट्राचं पान हलायचं नाही. नौशादजींनी आपला काळ गाजवला. आजही त्यांच्या गाण्याची आठवण संगीतरसिकांना आहे. आजच्या नव्या गाण्याच्या काळातही नौशादजींची गाणी मनात रुंजी घातलाहेत. हेच नौशादजींच्या गाण्याचं मोठं यश आहे.

First Published on: July 14, 2019 4:31 AM
Exit mobile version