लोकसभेत जाण्यामागे शरद पवारांचा हा असू शकतो हेतू?

लोकसभेत जाण्यामागे शरद पवारांचा हा असू शकतो हेतू?

सोलापूरच्या ‘माढा’ या लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उभे राहणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. राजकारणात अनिश्चितता असते. त्यामुळेच २०१४ ला ‘मी आता वरिष्ठांच्या सभागृहातच राहणार’, असे म्हणणारे शरद पवार आता कनिष्ठ सभागृहात येण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीला दोन आकडी खासदार नसलेला पक्ष जरी म्हणत असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्या वयापेक्षा जास्त संसदिय कारकिर्द असलेला नेता लोकसभेत असणे हे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना जड जाऊ शकते. त्यामुळे २०१९ ला जर त्रिशंकू अवस्था झाली तर लोकसभेत कर्नाटक पॅटर्न राबवला जाण्याची दाट शक्यता आहे. कर्नाटकात कुमारस्वामी यांच्या कमी जागा असूनही त्यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपद देऊ केले होते.

सत्ता स्थापनेसाठी लागणारी बार्गेनिंग पॉवर पवारांकडे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांची संख्या जरी कमी असली तरी देशभरातील भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्याची किमया हे शरद पवार साधू शकतात. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे वयाने आणि अनुभवाने लहान असल्यामुळे याचा फायदा निश्चितच पवार लोकसभेत असताना उचलू शकतील. विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात राहुल गांधी अपयशी ठरू शकतात, याचे उदाहरण उत्तर प्रदेशमध्ये दिसले आहे. एकेकाळचे सहकारी पक्ष असूनही समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने काँग्रेसला यावेळी बाजूला ठेवून आपापसातच आघाडी केली. निवडणूकपुर्व आघाडी आणि त्यानंतर सत्तास्थापनेसाठी लागणाऱ्या आघाडीसाठी जी बार्गेनिंग पॉवर लागते, ती पवारांकडे पुरेपूर आहे.

देवेगौडा – गुजराल यांच्या इतिहासाची पुनरावृत्ती

आघाड्यांच्या राजकारणात कुणीही विचार करू शकत नाहीत, असे पंतप्रधान झालेले भारताने पाहिले आहेत. १९९६ साली जनता दल (सेक्यूलर)चे नेते एच.डी.देवगौडा आणि १९९७ साली इंद्रकुमार गुजराल हे पंतप्रधान झाले होते. पंतप्रधान पदासाठी लागणारे संख्याबळ नसतानाही हे दोन नेते पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यामुळे शरद पवार हे पंतप्रधानपदाचे दावेदार होऊच शकत नाही, असे आजतरी ठामपणे म्हणता येणार नाही.

लोकसभा लढण्यामागे एक सोची समझी चाल

वर वर पाहायला गेलं तर हा माढा मतदारसंघात दोन उमेदवारांचा वाद झाला. मग कार्यकर्त्यांनी शरद पवार हेच निवडणुकीला उभे राहिले पाहीजेत, अशी इच्छा लावून धरली. त्यामुळे शरद पवार लोकसभा लढवत आहेत, असं कारण पक्षाकडून देण्यात येत असलं तरी ते न पटण्यासारखं आहे. कारण पक्षातील कोणताही वाद असो तो पवारांच्याने सुटला नाही, यावर विश्वास बसू शकत नाही. याआधी देखील तटकरेंच्या घरातील वाद असो किंवा साताऱ्यातील दोन राजेंमधला वाद असो… पवारांनी यशस्वीपणे मध्यस्थी केलेली आहे. माढातील उमेदवारीचा वाद पेटता ठेवण्यात काय गणित होते? हे पुढील काही दिवसात कळेलंच.

First Published on: February 13, 2019 6:45 PM
Exit mobile version