रेल्वेची मुजोरी

रेल्वेची मुजोरी

डॉ. जितेंद्र आव्हाड

गेले 2-3 दिवस कळवा आणि मुंब्र्याच्या रेल्वेप्रवाशांची अस्वस्थता आणि जे काही समोर येत आहे, ते अतिशय धक्कादायक आहे. पहिली गोष्ट म्हणजे, मेल-एक्सप्रेस ज्या ट्रॅकवरून धावायला हव्यात, त्या ट्रॅकवरून त्या धावतच नाहीत. त्यामुळे डेसिबल हे 175च्या वरती जाते. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे रात्रौ 10 वाजल्यानंतर डेसिबलवरती मर्यादा आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रेल्वेला लागू नाही का? कळवा आणि मुंब्रामध्ये दोन प्लॅटफॉर्म वाढवले. पण, ज्या Frequencyनुसार ट्रेन थांबायच्या त्या आता कळवा, मुंब्र्यात थांबतच नाहीत. त्याच्यात एसी लोकलची भर पडली आहे. मी आधीच सांगितले होते की, एसी लोकलचे तिकीट हे सर्वसामान्य माणसांना परवडूच शकत नाही. पण, लोकल ट्रेन रद्द करुन त्याजागेवर एसी ट्रेन आणणं हे म्हणजे गरीबांनी श्रीमंत व्हा, असा संदेश रेल्वे देत आहे. ठाण्याकडे जाणाऱ्या सकाळच्या दोन साध्या गाड्या रद्द करण्यात आल्या. ज्या कारशेडवरुन सुरू होत होत्या व त्याच्या जागी एसी ट्रेन सुरू करण्यात आली.

काल, मंगळवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी, मी रेल्वेच्य संबंधित अधिका-यांसोबत दोन तास चर्चा केली. त्यामध्ये त्यांचे त्यांनाच समजत नव्हते की, ते काय बोलत आहेत. त्यांनी मला सांगितले की, 10 ट्रेनमध्ये 5700 प्रवासी प्रवास करतात. म्हणजे एका ट्रेनमध्ये 570 लोक असतात. हे 570 लोक कुठे आणि एका ट्रेनमध्ये बसलेले 5000 लोक कुठे! दोन ट्रेन ठाणे रेल्वे स्टेशनातून सुटत होत्या, त्या रद्द झाल्या याचा अर्थ फक्त 1200 लोक एसी ट्रेनमधून जाऊ शकले. सर्वसामान्यांचे हाल कसे वाढवायचे, हे एसी केबिनमध्ये बसून अधिकारी ठरवत आहेत. एसी लोकलचा त्रास हा फक्त ठाणेकरांना झाला… तर नाही… ज्याविषयी ते माझ्याशी बोलत होते, ते म्हणजे बदलापूर रेल्वे स्टेशनवरच एसी ट्रेनविरुद्ध आंदोलन झाले आणि ही एसी ट्रेनची बोंबाबोंब संपूर्ण मुंबईत आहे. पण, याला कोणी वाचा फोडत नव्हतं.

तुम्ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी साधी लोकल जेव्हा चालवत होतात. ती रद्द करून त्याच्या जागी एसी ट्रेन आणली; हे कुठल्या भूमिकेतून. तुम्ही नवीन एसी ट्रेन सुरू केल्या असत्या. लोकल ट्रेन तशाच सुरू ठेवल्या असत्या, तर आम्ही समजू शकलो. पण, सर्वसामान्य लोकल सुरू करायची आणि त्याचा पर्याय म्हणून एसी ट्रेन द्यायची, याचा अर्थ काय तो मला समजला नाही. एकंदरीतच सर्वसामान्य रेल्वेच्या फे-या कमी झाल्या आहेत. कळवा, मुंब्रा आणि दिवा हे तर रेल्वेच्या गिनतीतच नाही. या विभागात काय माणसे राहत नाहीत की काय? आजचा माझा त्यांच्याबरोबर झालेला संवाद आणि संभाषण हे धक्कादायक होते.

ठाण्याच्या प्रवासी संघटनेने जानेवारी महिन्यामध्ये पत्र दिले होते की, तुम्ही एसी ट्रेन सुरू करू नका. ते विचारात न घेता 8 दिवसांपूर्वी ठाण्यातून लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या व एसी ट्रेन सुरू करण्यात आल्या. त्यामुळे लोकल ट्रेनवर प्रचंड बोजा आला. अर्धेअधिक प्रवासी तर ट्रेनमध्ये चढूच शकत नाहीत आणि जे चढतात त्याच्यातले कमीत-कमीत 3 ते 4 जण ट्रेनमधून पडून मृत्यूमुखी पावतात. मागील काही महिन्यांमध्ये ट्रेनमधून पडून मृत्यूमुखी पावलेल्यांचे प्रमाण वाढले आहे. याला जबाबदार कोण? जर रेल्वेचा हा अट्टाहास असेल की आम्ही सर्वसामान्य लोकल रद्द करू आणि एसीच ट्रेन चालवू. तर यांच्या एसी केबिनमध्ये जाऊन धिंगाणा घालू, हे आज मी त्यांना सांगून आलो. जे श्रीमंत आहेत त्यांच्यासाठी एसी ट्रेन चालवा, सुपर डिलक्स चालवा त्याच्याशी आम्हांला काहीएक घेणंदेणं नाही. पण, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा लोकलचा प्रवास हा तसाच राहीला पाहीजे. हा त्या सर्वसामान्य प्रवासी जे रेल्वेला पैसे देऊन पास काढतात आणि प्रवास करतात त्यांचा हक्क आहे. त्या अधिकारावरती जर गदा आणण्याचा रेल्वे प्रयत्न करत असेल तर तो उधळून लावू.

आज मी मध्य रेल्वेच्या डीआरएम यांना भेटायला गेलो होतो, तर त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर जवळ-जवळ 100 अधिक पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि त्यांच्या हातामध्ये मोठ-मोठ्या बंदूका दिसत होत्या. रेल्वेची प्रवासी संघटना म्हणजे कोणी अतिरेकी संघटना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना भेटायला येणार होती की काय?

त्यामुळे एसी ट्रेन हे रेल्वेचे नाटक आहे. हे जरा सर्वसामान्यांनी समजून घ्यावं. कळवेकरांनी आवाज उठवला आहे. मुंब्र्यातून आवाज उठतोय. ठाण्यातून आवाज उठलाय. बदलापूरवरुन आवाज उठलाय. आता मात्र रेल्वे प्रवाशांना आपल्या हक्कासाठी मत नोंदवायलाच लागेल आणि ते मत नोंदवताना रेल्वे अधिकाऱ्यांना आपल्या अधिकाराची जाणीव करुन द्यावी लागेल. त्यासाठी एकत्र या. तरच एसी लोकलबाबत रेल्वेला निर्णय घेणं भाग पडेल. अन्यथा तुम्हांलाही उद्या दोनशे रुपयांचा पास तीन हजार रुपयांना विकत घ्यावा लागेल.

(लेखक माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत)

First Published on: August 24, 2022 4:06 PM
Exit mobile version