माणसांचा भरवसा नाही…

माणसांचा भरवसा नाही…

प्राण्य़ांवर प्रेम करणारी आजी

आमच्या शेजारी एक आजी रहायला आल्या. त्यांच्यासोबत असलेली कुत्री आणि मांजरांचे आमच्या घरातील सगळ्यांना कुतूहल होते. काही दिवस निघून गेले. त्या आजींना कुत्र्यांमाजंरावरून बिल्डिंगमधील लोकांकडून खूप बोलणे ऐकावे लागायचे. आम्ही त्यांना विचारले, हे सगळे कशासाठी, त्यावर त्या म्हणाल्या, तरूणपणी माझा नवरा मला सोडून गेला. माणसांचा भरवसा नाही. हे मुके प्राणीच जास्त विश्वासाचे आहेत.

आम्ही ग्राऊंड फ्लोअरला राहत होतो. आमच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये एक आजी रहायला आल्या. त्यांच्याकडे चार कुत्री आणि चार मांजरे होती. त्यांच्या आगमनानंतर त्यांच्याकडची कुत्री आणि मांजरे पाहून सोसायटीतील बर्‍याच जणांनी नाके मुरडली. कारण कुत्री आणि मांजरे ही त्यांच्या मालकांसाठी प्रिय असली तरी बरेच वेळा सोसायटीतील इतर लोकांना त्रासदायक ठरतात. पण आम्हाला ती आजी आणि तिची ती चतुष्पाद पिलावळ याविषयी कुतूहल होते. त्या आजीचे वय पासष्टच्या आसपास असावे. तिला दोन मुलगे आणि एक मुलगी होता. त्यांची सगळ्यांची लग्ने झाली होती. ते आपल्या संसारात रमलेले होते. ते अधून मधून त्या आजीला भेटायला यायचे. आजीबाईंचे व्यक्तीमत्त्व सुंंदर आणि रुबाबदार होते. आम्ही त्यांची हळूहळू ओळख काढली. त्या कोण आहेत, कुठून आल्या. पूर्वी काय करत होत्या. याची माहिती आम्ही मिळवली. तेव्हा कळले की, ती आजी उच्च शिक्षित होती. ती गृहशोभिका मासिक नियमित वाचायची. तिचं वाचनही भरपूर होतं. तिला अनेक विषयांची माहिती होती. बोलताना ती मराठीतील मार्मिक म्हणी अगदी चपखलपणे वापरायची. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास असायचा. ती देव बीव काही मानायची नाही.

तिला विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ बनवायला यायचे. तिने पदार्थ बनवले की, ती आम्हाला टेस्टसाठी आणून द्यायची. तिच्याकडच्या काही पदार्थांची तर आमच्या घरातील सगळ्यांना चटकच लागली. मग त्या आजीकडून काही पदार्थ आम्ही शिकून घेतले. त्यातला छोले भटोरे हा खास पदार्थ. तो मग आमच्या घरचाच होऊन बसला. माझी आई आणि बहिणी आजही छान छोले भटोरे बनवतात. ते खाताना त्या आजीची हटकून आठवण येते. आम्ही तिला विचारत असू की, आजी तुम्हाला हे इतके चविष्ट पदार्थ कसे काय येतात. तेव्हा ती सांगाची, आम्ही कारवारी. आमचं गोव्यात हॉटेल होतं. हॉटेलात विविध पदार्थ मी बनवत असे. आजीकडून आम्ही अन्य पदार्थ शिकण्याचा प्रयत्न केला. पण ते काही जमले नाहीत. पण छोले भटोरे मात्र आम्हाला जमले. कुणी नातेवाईक आले की आम्ही छोले भेटोरे बनवतो. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते. तुम्हाला हा पदार्थ कसा येतो, असे ते विचारतात. तेव्हा त्या आजीबाईंचा सगळा इतिहासा पुन्हा जागा होई. पुन्हा तिच्या आठवणी उगाळल्या जातात. तिला येत असलेल्या पदार्थावरून गाडी तिच्याकडे असलेल्या कुत्र्या मांजरांवर जाते. एक वेळ अशी आली की, तिच्याकडच्या कुत्र्यांनी पिल्ले वाढून अकरा कुत्री तिच्या घरात झाली. मांजरांचीही संख्या वाढली होती.

आजीबाई कुठे बाजारात गेल्या की, तिच्या घरातील कुत्री जोरजोरात ओरडायला लागत. तिच्या कुत्र्यांची आणि मांजरींची प्रत्येकाची वेगळे नाव होती. ती नावे माणसांची होती. ती त्यांना घरातल्या आप्तांप्रमाणे हाक मारत असते. त्या कुत्र्यामांजरांसाठी दररोज पाच सहा लीटर दूध लागे. ते ती घेऊन येई. दररोज चाळीस चपात्या लागत. त्या ती भाजायची. सकाळच्या वेळी ती कुत्र्यांना फिरण्यासाठी बाहेर सोडत असे. त्यावेळी ती बिल्डिंगच्या आवारात घाण करून ठेवत. त्यावर बिल्डिंगमधील लोकांचे बोल तिला खावे लागत असत. त्यानंतर मग स्वत:च ती घाण साफ करत असे. त्या कुत्र्या मांजरांवर तिचे विलक्षण प्रेम होते. अगदी पोटच्या मुलांसारखे. आम्हाला तिला खावे लागणारे बोल ऐकून कसे तरी वाटत असे. संध्याकाळी ती कधी कधी आमच्या घरी येत असे. तिच्या विविध विषयांवरच्या गप्पा रंगत असत.

तिला एकदा आम्ही विचारले की, आजी तुम्ही कुत्र्या-मांजरांमध्ये इतक्या का गुंतल्या आहात. त्यांच्यावर इतकं प्रेम करता. त्यांच्यावर इतका खर्च करता. त्यांच्यासाठी लोकांची बोलणी खाता. हे कशासाठी ? त्यावर ती खूप भावूक झाली. तिने जे सांगितले ते ऐकून आमच्याही डोळ्यातून पाणी आले. ती म्हणाली, माझा संसार चांगला चालला होता. तीन मुले लहान होती. नवराही चांगला होता. सगळं छान होतं. पण अचानक माझा नवरा एका बाईबरोबर आम्हा सगळ्यांना सोडून निघून गेला. मला अकल्पित असा धक्का बसला. पण मी त्यातून स्वत:ला सावरले. मुलांना शिकवून मोठं केलं. त्यांची लग्नं करून दिली. मी मागे एकटी राहिले. कुत्र्यामांजरांचा मला लळा लागला. हे मुके जीव खूप माया करतात माझ्यावर. मी जरा दूर गेले की, बेचैन होतात. मला मानसिक आधार मिळतो तो त्यांच्यामुळे. माणसांचा काही भरवसा नाही. कारण ती कधीही सोडून जातील. या मुक्या प्राण्यांचं तसं नाही.


-जयवंत राणे

First Published on: July 31, 2018 1:25 PM
Exit mobile version