नूपुर शर्मांचे वादग्रस्त विधान ते इस्लामिक देशांचा रोष आणि देशाची नाचक्की

नूपुर शर्मांचे वादग्रस्त विधान ते इस्लामिक देशांचा रोष आणि देशाची नाचक्की

पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानाप्रकरणी भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांना भाजपने निलंबित केले आहे. शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाचे इस्लामी देशांमध्ये तीव्र पडसाद उमटले. पाकिस्तानसह ओआयसी या इस्लामी देशांच्या संघटनेनेही भारतावर कडाडून टीका केली. तसेच आखाती देशांनी भारतीय वस्तूंवर बहीष्कार टाकण्याचीही मागणी केली आहे. कुवेतमध्ये भारतीय उत्पादन रस्त्यावर फेकली जात आहेत. इस्लामिक देशांनी घेतलेलया या आक्रमक भूमिकेचा भारताला आर्थिकदृष्ट्या फटका पडणार आहे.  यामुळे नाईलाजाने का असेना भाजपने लगेच नाही पण उशीरा का होईना एक पाऊल मागे जात या इस्लामिक देशांच्या दबावापुढे नमते घेत काही महत्वाचे निर्णय घेतले. यामागे अनेक राजकीय कारणे जरी असली तरी या अरब देशांशी भारताचे असलेले व्यापारी संबंध हे देखील महत्वाचे कारण आहे.

शर्मा यांच्या विधानामुळे कतार, कुवेत, इराण यांनतर सौदी अरेबिया, बहारीन, अफगाणिस्तान, संयुक्त अरब आमिराती, मालदीव, जॉर्डन यांच्यामागोमाग पाकिस्ताननेही शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. शर्मा यांचे विधान मुस्लिमांच्या भावनांना ठेच पोहचवणारे , चिथावणीखोर असल्याचा या सर्वच देशांनी आरोप केला . तर काही देशांनी नुसता निषेध व्यक्त न करता भारताने जाहीर माफी मागावी अशी मागणीही केली. परिस्थिती चिघळत असल्याबरोबरच आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताची विशेषतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन होत असल्याने भाजपने सावरासावर करत शर्मा आणि जिंदल यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला. यामुळे मोदींनी केलेल्या कारवाईमुळे बहारिनसह अनेक देशांनी त्यांचे कौतुक केले. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या वादावर तूर्तास तरी पडदा पडल्याचे चित्र दिसत आहे. मात्र नेहमी धर्म आणि पक्षातील प्रत्येक नेत्याच्या मागे ठामपणे उभे राहणाऱ्या भाजपने यावेळी पक्षातील वाचाळवीरांना पक्षातूनच बाहेर काढल्याने पुढच्याला ठेच मागचा शहाणा हा बोध भाजप नेत्यांनी यातून घेणे अपेक्षित आहे. पण जर हीच तत्परता भाजपने आक्षेपार्ह विधान करणाऱ्या वाचाळवीर नेत्यांवर वेळीच कारवाई करत दाखवली असती तर आज जगभऱात मोदींचीच नाही तर देशाचीही झालेली नाचक्की टाळता आली असती.

आखाती देशांबरोबर भारताचे नेहमीच स्नेहपूर्वक संबंध राहीले आहेत. भारतातील अनेक नागरिक आज आखाती देशांमध्ये नोकरी धंद्यासाठी स्थिरावले आहेत. त्यातही आखाती देशामध्ये राहणाऱ्या या नागरिकांमध्ये हिंदूंची संख्या सर्वाधिक आहे. संयुक्त अरब अमिराती म्हणजे एकट्या युएईमध्ये जवळजवळ ३५ लाख भारतीय नोकरी करत आहेत. हा आकडा युएईच्या एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के एवढा आहे. सौदी अरेबियातही मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक नोकरीधंद्यासाठी स्थिरावले आहेत. भाजपच्या नेत्यांच्या सतत एका समुदायाविरोधातील वक्तव्यांचा परिणाम येथील हिंदूवर होतो. त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून हिंदूविरोधी वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच याचा परिणाम येथे काम करणाऱ्या भारतीय समुदायावरही होण्याची शक्यता आहे. यापुढे कोणीही हिंदूना नोकरी देणार नाही. विशेषत मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर परदेशात राहणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला होता. कारण मोदींनी आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताची प्रतिमा एका उंचीवर नेऊन ठेवली. जगातील जवळजवळ सगळ्याच देशांबरोबर त्यांनी व्यावसायिक संबंध दृढ केल्याने भारतियांसाठी जगातील अनेक देशांचे दरवाजे उघडले.

२०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरबच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी अरब न्यूज वृत्तवाहीनीला २९ ऑक्टोबर रोजी मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी २६ लाख भारतीयांनी सौदी अरबला आपले दुसरे घर बनवले आहे. येथील प्रगतीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. याचा आपल्याला गर्व असल्याचे  म्हटले होते. मोदींच्या या मैत्रीपूर्ण दौऱ्यामुळे सौदी अरब आणि भारताचे संबंधही भक्कम झाले.

तसेच कोरोना असो की अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा भारताने वंदे मांतरम मिशन राबवत अडकलेल्या भारतीयांना सुखरुप मायदेशात आणण्याचेही शिवधनुष्य पेलले. यामुळे मोदी यांचा जगातील लोकप्रिय व्यक्तींच्या यादीत समावेश झाला. पण नंतर देशात ज्याप्रमाणे गोहत्या, मॉब लिंचिंग, गोमांस यावरून जी दुफळी निर्माण झाली त्यानंतर मात्र भारतात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याच्या कहाण्या परदेशी मिडियाने रंगवल्या. त्याचेही तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीयस्तरावर उमटले होते. त्यानंतर आता नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण केला आहे.

याआधी २०१५ साली खासदार तेजस्वी सूर्या या ३१ वर्षीय खासदारानेही अरब देशांमधील महिलांवर आक्षेपार्ह टि्वट केले होते. त्यावेळीही असाच वाद निर्माण झाला होता. आखाती देशांमध्ये हिंदू किंवा इतर कोणत्याही धर्मावर टिप्पणी केल्याने वाद निर्माण झाल्याचे ऐकवत नाही. उलट युएईमधील काही कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेत लेखी स्वरुपात सूचना केल्या जातात. ही फार मोठी गोष्ट आहे. पण भारतात घडणाऱ्या या घटनांमुळे आखाती देशातील हिंदूचे अस्तित्व धोक्यात येण्याचा टक्काही वाढतोय.

तसेच युएई आणि भारत यांच्यात मुक्त व्यापार करार होणार आहे. ज्यामुळे देशात परकिय चलनही वाढणार आहे. सौदी अरबने २०१९ साली भारतात पेट्रोकेमिकल्स, इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिफायनरीमध्ये १०० अरब डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते.

तर ईराणबरोबर भारत चाबाहर पोर्टची निर्मितीचे काम करत आहे. त्यातच अफगाणिस्तानमध्ये तालिबान आल्याने भारताशी या देशाच्या संबंधात दुरावा आला आहे. कतारनेही भारताला अडचणीत आणण्याची तयारी केली आहे.

अरब देशांमध्ये रस्त्यावर उतरुन निषेध करणे आंदोलन करण्यास बंदी आहे. यामुळे भारताविरोधात येथे उसळलेला जनक्षोम दिसत जरी नसला तरी येथील जनतेच्या मनात शर्मा यांच्या वक्तव्यानंतर हिंदूविरोधात रोष निर्माण झाला आहे. भाजपच्या हिंदू मुस्लीम कार्डचे दूरगामी परिणाम संपूर्ण देशालाच नाही तर जे या इस्लामिक देशात नोकरी धंदे करत आहेत त्या परदेशी भारतीयांना भोगावे लागणार आहेत.

 

 

First Published on: June 7, 2022 5:53 PM
Exit mobile version