चौकट पूर्ण करणारा ‘फॅमिली मेंबर’

चौकट पूर्ण करणारा ‘फॅमिली मेंबर’

चौकट पूर्ण करणारा मेंबर

आज दोन वर्षे झाली ’तो’ आमच्यातून जाऊन. कुटुंबातील आम्हा सगळ्यांचाच लाडका होता तो. आजच्याच दिवशी ‘त्याने’ आमच्या कुटुंबात प्रवेश केला होता. बर्याच घरातील मुलांना आई-वडिलांपेक्षा ‘आजी-आजोबांचा’ लळा अधिक असतो. मीसुद्धा माझ्या आजी-आजोबांच्या (आईचे आई-वडील) घरीच जास्त रमायचो. मी, आजोबा आणि आजी असं आमचं एक छोटसं कुटुंब होतं. आमच्या या त्रिकोणी कुटुंबाची चौकट पूर्ण करणारा ‘तो’ म्हणजे ‘पांडू’, आमचा पाळीव कुत्रा. पांढर्या शुभ्र रंगाचा आणि अतिशय स्वच्छ असा एक गावठी कुत्रा. पावसापासून वाचण्यासाठी दिलेला आडोसा आणि कपभर दूध यातून सुरु झालेलं आमचं नातं पुढे अनेक वर्ष अबाधित राहिलं. कोणत्याही विशिष्ट ब्रीडचा नसलेल्या या गावठी कुत्र्याचं, आजोबांनी फार विचार न करता ‘पांडू’असं नामकरण केलं होतं. आज पांडू आणि त्याचे ’पालक’ अर्थात माझे आजी-आजोबा हयात नाहीत. आजच्याच दिवशी पांडूचा वाढदिवस असायचा त्यामुळे त्याच्या आठवणींना उजाळा द्यायचा केलेला हा प्रामाणिक प्रयत्न.

तसं पाहता आजोबांना सुरुवातीपासूनच कुत्रा पाळायची हौस होती. मात्र नेहमीच परिस्थिती आडवी आली. मात्र, आजोबांच्या उतार वयात पांडूने त्यांची ही इच्छा नकळत पूर्ण केली. तूफान पाऊस कोसळत असलेल्या एका रात्री पांडू आमच्या दारात आला आणि दबक्या आवाजत भुंकला. त्यांचं ते भुंकणं ऐकल्यावर आजोबांनी दार उघडलं आणि त्याची एकंदर अवस्था बघून क्षणाचाही विलंब न लावता, स्वत:च्या हातातली ब्रेडची स्लाईस आणि दूधाचा कप त्याच्यासमोर ठेवला. त्या दोघांमधल्या या हळव्या क्षणांचा मी आणि आजीही साक्षीदार होतो.

प्रत्येकाच्या आयुष्यात बरेच मित्र-मैत्रिणी असतात. ज्या भावना आपण आपल्या आई-वडिलांशी, भावंडाशी शेअर करु शकत नाही त्या व्यक्त करण्यासाठी आपल्याला गरज असते ती हक्काच्या मित्रांची. अन्य मित्रांप्रमाणे पांडूदेखील माझा अत्यंत जवळचा मित्र होता. माझ्या मनातल्या सगळ्या भावना मी त्याच्यासमोर बिनधास्त व्यक्त करायचो. माझे शब्द कळत नसले तरी माझ्या भावना त्याला जाणवत असत. बरेचदा आपल्याला असं वाटत असतं की आपण बोलत असताना समोरच्याने फक्त ऐकून घ्यावं आणि काहीही बोलू नये. पांडू आणि माझी मैत्री बहुधा त्यामुळेच अधिक घट्ट झाली होती. मात्र काही बोलला नाही तरी माझ्या चेहर्यावर उमटणारे भाव ओळखून तो त्याप्रमाणे प्रतिक्रिया द्यायचा. आमचीही जेवणाची पंगतही एकत्रच बसायची. अंड्याचाही वास न चालणार्या आमच्या घरात, त्याच्यासाठी खास मांसाहाराचा खुराक चालू करण्यात आला होता. स्वच्छतेच्या बाबतीही तो खूप टापटीप होता. इतक्या वर्षात त्याने कधी घरात घाण केल्याचं माझ्या आठवणीत नाही.

आजोबा गेले तेव्हा तर मी त्याला एखाद्या लहानमुलाप्रमाणे रडताना पाहिलं होतं. पांढर्या शुभ्र चेहर्यावरचे ते दोन काळेभोर डोळे आजोबा गेले त्यादिवशी पाण्याने काठोकाठ भरले होते. सुरुवातीला पांडूला काहीशी घाबरणारी आणि त्याच्यापासून अंतर राखणारी आजी, आजोबांच्या जाण्यानंतर त्याच्या अधिक जवळ आली. नोकरीच्या निमित्ताने मी दिवसभर घराबाहेर असल्यामुळे आजीला सोबत असायची ती केवळ पांडूची.

आम्ही सर्वांनीच पांडूवर जीवापाड प्रेम केलं. मात्र कोणताही कुत्रा हा अखेर आपल्या मालकाशीच वफादार असतो हे पांडूनेही सिद्ध केलं. आजोबांच्या जाण्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्याने आपले प्राण सोडले. दिवसांतून चार वेळा नियमीत खुराक घेणार्या पांडूने खाणं-पिणं सोडून दिलं होतं. एका रात्री झोपेतच त्याने शांतपणे जगाचा निरोप घेतला. भूतकाळात डोकावून पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. मालकाप्रती इतका इमान ठेवणारा ‘पांडू’ बहुधा आजोबांचं कुत्रा पाळण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आला होता.

First Published on: August 9, 2018 12:47 PM
Exit mobile version