पद्मदुर्गाची मोहीम

पद्मदुर्गाची मोहीम

मुरुड गावातून राजपुरीकडे जाणारा गाडी रस्ता आहे. या रस्त्यावरच्या खाडीलगत एकदरा गाव आहे. याच्या किनार्‍यावर अनेक मच्छीमारी नावा उभ्या असतात. या मच्छीमारी नौकावाल्याकडे चौकशी केल्यास यातील एखादी नौका आपल्याला कासा किल्ल्याकडे घेऊन जावू शकते. आपण संख्येने जास्त असल्यास फारसा आर्थिक भार पडत नाही.सागराची आणि हवामानाची परिस्थिती पाहूनच हे मच्छीमार कासाकडे येण्यासाठी तयार होतात. आपण आगाऊ चौकशी करुन किंवा आदल्या दिवशी जर नौका ठरवली तर वेळेची बचत होऊन गैरसोय टळू शकते.येथे जाण्यासाठी ‘कस्टम’ ची परवानगी घ्यावी लागते. मुरुड जंजिरा पाहण्यासाठी आलेले पर्यटक सहसा पद्मदुर्ग पाहण्यासाठी जात नाहीत, कारण जंजि-याला जाण्यासाठी ज्याप्रमाणे बोटी सहज उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे पद्मदुर्गला जाण्यासाठी बोटी सहज मिळत नाहीत. मुरुडला जाण्यासाठी अलिबाग रेवदंडा मुरुड असा एक गाडी मार्ग आहे. मुंबई-पणजी महामार्गावरील नागोठणे अथवा कोलाड येथून रोहे गाठावे रोह-चणेरे बिरवाडी मार्गे मुरुडला जाता येते. तसेच मुंबई-पणजी महामार्गावरील इंदापूर येथून तळा-भालगाव मार्गेही मुरुड गाठता येते.

पद्मदुर्ग (कासा किल्ला )ला भेट देण्यासाठी मुरूड कोळीवाड्यातील एकदरा गावातून खाजगी बोटीने जावे लागते. एकद-यापासून किंवा राजापुरीपासून नावेने अर्धा तासाच्या आत कासा किल्ल्याला पोहोचतो.येथे जेटी नसल्याने पाण्यातच उतरावे लागते.समुद्राला ओहोटी असल्यास दुर्गावर जाण्यास योग्य वेळ समजली जाते.बोट खडकाला लावतात.तेथे शेवाळ असल्याने सावधानता बाळगावी. दुर्गात प्रवेश करताच याची भव्यता कळून येते. कासा किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट. पडकोट मोठ्या प्रमाणावर नामशेष होत आला आहे.पद्मदूर्गच्या पडकोटचा वैशिष्ठ्यपूर्ण कमळाच्या आकाराचा भव्य बुरुज दूरुनच आपले लक्ष वेधून घेतो. मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तमपैकी शाबूत आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरुन उभा आहे. या बुरुजाच्या चर्चा कमळाच्या पाकळ्याप्रमाणे फुललेल्या आकाराच्या आहेत. म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले गेले असावे.चोहोबाजूंनी समुद्राने वेढलेल्या या पद्मदुर्गला जाताना बोटीत निवांतपणे बसून प्रवास करणे हे आपले भाग्यच मानले पाहिजे.

कासा उर्फ पद्मदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचे एक वैशिष्ठ्य येथे पहावयाला मिळते. तटबंदीच्या दोन दगडांमधे सिमेंटिंग म्हणून चुना वापरलेला आहे. गेल्या साडेतीनशे वर्षामधे सागराच्या लाटांच्या तडाख्याने आणि खार्‍या पाण्यामुळे तटबंदीचा दगड झिजून गेला आहे. या दगडाची झीज पाच ते दहा से.मी.एवढी झाली आहे. तरीही दोन दगडांमधला चुना अजूनही शाबूत आहे. शिवकालीन बांधकामाचे हे वैशिष्ठ्य आपल्याला चकित करते. पडकोटामधील चौकोनी विहीर, तोफा, इमारतींचे अवशेष असे पाहून आपण मुख्य किल्ल्याकडे निघायचे पडकोट आणि मुख्य किल्ला यामधील खडकावर समुद्रामधून वाहून आलेल्या शंख शिंपल्यांचा ढीग साचलेला आहे. दुर्गाचे मुख्यद्वार पूर्वेकडे तोंड करून आहे. कासा किल्ल्याच्या महाद्वाराने प्रवेश करण्यासाठी चार पाच पायर्‍या चढाव्या लागतात. दाराच्या आतल्या बाजूला पहारेकर्‍यासाठी केलेल्या देवड्या आहेत.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दोन बुरुज आहेत. या ३० फूट उंच बुरुजात तोफा ठेवण्यासाठी झरोके व जागोजागी जंग्या आहेत. तसेच बाजूच्या तटबंदीत असलेल्या जंग्याचा व तोफांचा रोख प्रवेशद्वारावर आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूच्या दगडांच्या भिंतीतील दगड लाटांच्या, वार्‍याच्या मार्‍याने झिजलेले आहेत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायर्‍यांचा मार्गही आहे. मधल्या भागामधे नव्या जुन्या वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. काही काळ भारतातील कस्टम ऑफिसचे एक कार्यालय येथे थाटलेले होते. हे चौकीवजा कार्यालय येथून हलल्यावर या सगळ्या वास्तूचा ताबा निसर्गाकडे आला त्यामुळे सगळ्या वास्तूंची रयाच गेलेली दिसते. चारही बाजूंनी खारे पाणी असताना आतमधे गोड्या पाण्याची चार टाकी केलेली दिसतात.किल्ल्याचा दर्या दरवाजा आणि त्याचे स्थापत्य पाहून परत नावेने फिरायचे. तटबंदीवरुन जंजिरा आणि सामराजगड किल्ले दिसतात. मुरुडचा किनाराही उत्तम दिसतो.आम्ही किनार्‍याकडे निघालो ते एका अविस्मरणीय गडभेटीची आठवण घेऊनच.


-विवेक तवटे

First Published on: September 25, 2018 12:30 AM
Exit mobile version