पाकिस्तान अराजकतेच्या उंबरठ्यावर…

पाकिस्तान अराजकतेच्या उंबरठ्यावर…

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला खुलेआम दहशतवादी देश ठरवण्यापर्यंत मजल मारली आणि त्यावर पाकिस्तान लगेच काही उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे भारतातील माध्यमे उत्साहात आली होती. पाकिस्तानच्या नाड्या कशा आवळल्या गेल्या, त्यावरच वाहिन्यांनी सोमवारी आनंदोत्सव सुरू केला होता. पाकिस्तान जिहादी मानसिकतेच्या आहारी गेलेला देश व समाज आहे, यात शंका नाही. पण म्हणून तिथला प्रत्येकजण जिहादीच असतो असेही नाही. त्यातल्या कष्टकरी लोकांना आपले नित्यजीवन सुसह्य झाले तरी पुरे आहे. सुशिक्षीत सुखवस्तू लोकांनाही आपल्या ऐषारामात कुठली बाधा येऊ नये, असेच वाटत असते. पण त्यांच्यापलिकडे अशीही लोकसंख्या असते, ज्यांना धर्म व अन्य काही गोष्टीत रस असतो. असे भारावलेले लोक नेहमी आक्रमक असतात. त्याचा लाभ उठवून काही धर्मांध वा राजकीय पुढारी आपल्या पोळ्या भाजून घेण्याची संधी शोधत असतात. त्यांना लगाम लावण्याची क्षमता प्रशासनात व कायद्यात असली, तरच त्या देशाला ठामपणे उभे राहता येत असते. दुर्दैवाने पाकिस्तानची निर्मितीच धर्माच्या पायावर झालेली असल्याने, तिथे कधी आधुनिक विचार रुजला नाही आणि नेतृत्व कायम भारतविरोधी नेत्यांच्याच हातात राहिल्याने त्याच विस्तवाला हवा देण्यापलिकडे त्या देशाचे राजकारण जाऊ शकले नाही. मग त्यात अधिक भडकावू व चिथावणीखोर लोकांनी आपले स्वार्थ साधण्याच्या राजकारणात, त्या देशाला धर्मांधतेच्या गर्तेत लोटून दिले. त्यातून जिहादी व दहशतवादी मानसिकता जोपासली गेलेली आहे. अमेरिकेच्या कुठल्या एका धमकीने वा कृतीने पाकिस्तान त्या गर्तेतून बाहेर पडू शकणार नाही.

पाकिस्तान असा धर्माच्या आहारी गेला आणि त्याला आपला आर्थिक औद्योगिक विकास करण्यापेक्षा हिंदू भारताला शह देण्यापलिकडे काही उद्दीष्टच राहिले नाही. मग भारताचा द्वेष इतकेच त्याचे ध्येय बनले. म्हणूनच त्या धारणेचा लाभ उठवत जगातल्या महासत्तांनी व पुढारलेल्या देशांनी आपापले हेतू साध्य करण्यासाठी पाकिस्तानचा यथेच्छ वापर करून घेतला. उपयोग संपल्यावर पाकला उकिरड्यात फेकून दिलेले आहे. असा पूर्ण विस्कळीत व दिवाळखोर देश, ही आजच्या पाकिस्तानची ओळख आहे. हळुहळू भारताचा दुसरा शेजारी चीननेही पाकचा तसाच भारताला शह देण्यासाठी उपयोग करून घेतला. या गडबडीत पाकिस्तान कधीही स्वयंभूपणे आपल्या पायावर उभा राहिला नाही आणि सतत अनुदान, कर्ज वा खिरापतीवर जगण्याची वेळ त्याच्यावर आली. अब्जावधी रुपयांचे कर्ज आणि कुठलेही उत्पन्नाचे साधन नाही, अशा चमत्कारिक अवस्थेत तो देश सापडला आहे. पण व्यसनाधीन दारुडा जुगारी जसा अधिकाधिक कर्ज काढून वा उसनवारीने चैन उधळपट्टी करीत असतो, तशी पाकिस्तानची दशा झालेली आहे. असे दिवाळखोर नेहमी सावकारासमोर लाचार असतात. मग पाकिस्तान चीन, अमेरिका वा सौदी अरेबियासमोर अगतिक झालेला दिसला तर नवल नाही. ट्रम्प म्हणजे त्यातला सर्वात मोठा सावकारच. त्याने एकप्रकारे पाकला यापुढे एक छदाम मिळणार नाही, असे धमकावले तर पाक राज्यकर्त्यांची गाळण उडणारच ना? पण हे कमी म्हणून की काय, देशाच्या अंतर्गत सत्तास्पर्धेलाही उधाण आलेले आहे. सेना व नागरी राज्यकर्ते यांच्यात सतत बेबनाव असतोच. अधूनमधून घटना गुंडाळून तिथल्या सेनापतींनी सत्तासूत्रे हाती घेतलेली आहेत. आता तो बेबनाव शिगेला पोहोचला आहे आणि त्यात चीनसह सौदी अरेबियाही हस्तक्षेप करताना दिसतो आहे.

ट्रम्प यांची धमकी व पाकची दिवाळखोरी यावर खूप चर्चा झाली. पण त्याच दरम्यान पाकचे पदच्युत तत्कालिन पंतप्रधान नवाज शरीफ व सुरक्षा सल्लागार जंजुवा यांच्यातल्या गोपनीय बैठकीचा कुठे फारसा उल्लेखही आलेला नाही. घटनात्मक पदी नसलेल्या नवाजना जंजुवा कशाला भेटले व त्यांच्यात काय खलबते झाली? नंतर लगेच सौदी राजपुत्राने पाठवलेल्या विमानातून नवाज सौदीला कशासाठी गेले? तिथे खासगी भेटीसाठी नवाज यांचे धाकटे बंधू आधीपासूनच पोहोचलेले आहेत. नवाज यांनी पाक सोडताच ट्रम्प यांनी अनुदानबंदीची घोषणा कशाला करावी? सुरक्षा सल्लागार हे पाकसेना व नागरी सरकार यांच्यातले मध्यस्थ मानले जातात. सौदी राजांचे आमंत्रण लक्षात घेऊनच पाकसेना अधिकार्‍यांनी नवाजना काही डोस दिलेले होते काय? सौदी व अमेरिका यांचा पाकिस्तानात काय खेळ चालू आहे? बाहेरच्या सत्ता मिळून पाकिस्तानची राजकीय घडी बदलण्याचे डाव खेळत आहेत काय? आपल्याला सत्तेतून पदच्युत करण्यासाठी सेनेनेच न्यायालयाचा वापर केला, असे नवाज बोलत असतात. त्यातून सेना व राजकारण यांच्यातली दुफळी समोर आलेली आहेच. नागरी समाज वा राष्ट्र म्हणून आज पाकिस्तान शिल्लक उरलेला नाही. अशा स्थितीमध्ये ह्या एकाचवेळी घडणार्‍या घडामोडी शंकास्पद आहेत. त्याला आणखी एक पदर आहे. त्यावेळी पाकसेनेची कठपुतळी मानल्या जाणार्‍या इमरान खान यांच्या पक्षाने सरकारविरोधी मोर्चाची घोषणा केलेली होती, तीही अकस्मात गुंडाळली गेली होती. कित्येक परस्परांशी संबंध नाही अशा वाटणार्‍या घटना आहेत. आजही पाकिस्तानी सेनेच्या अधिकार्‍यांतही एकवाक्यता राहिली नसल्याच्या बातम्या सारख्या येत असतात. आतून व बाहेरून चालू असलेली ही धक्काबुक्की या देशाच्या अतित्वावरचे संकट ठरू शकेल काय? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. कारण पाकिस्तानची परिस्थिती जशी बिघडत जाईल, तशी ती भारतासाठी अधिक चिंता करण्यासारखी आणि सावधानतेचा इशारा देणारी असेल. कारण पाकिस्तानात जगातील कुठल्याही मोठ्या कंपन्या गुंतवणूक करत नाहीत. त्यामुळे तिथे ज्या काही शिक्षण संस्था आहेत, तिथून शिकणार्‍या तरुणाईला रोजगाराच्या संधी नाहीत, त्यामुळे तिथले काही तरुण विदेशात नशीब काढण्यासाठी जाऊ शकत असले तरी सगळ्यांनाच ते शक्य नाही. तिथे मोठ्या प्रमाणात गरीबी आहे. त्यामुळे शिक्षण घेतलेल्या गरीबांच्या मुलांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे हा वर्ग नाईलाजाने दहशतवादाकडे वळणार हे ओघानेच आले. त्यांच्या माध्यमातून त्या देशात भारतविरोधी नवी ताकद निर्माण होत राहते. त्यामुळे भारताने सीमेवर कितीही दहशतवादी मारले तरी पाकिस्तानात ते सतत निर्माण होत असतात.

एकूणच जगाच्या राजकारणात इस्लामी देश म्हणून जो गट तीनचार दशके कार्यरत होता, त्यात आता मोठी दुफळी माजली असून मध्यपूर्वेतही उलथापालथी चाललेल्या आहेत. शिया-सुन्नी असे भेद आहेतच. पण सत्ताधार्‍यांच्या मतलबानुसारही मुस्लीम देशांची गटबाजी शिगेला पोहोचलेली आहे. सौदी व इराण यांच्यात मुस्लीम जगाचे नेतृत्व करण्याच्या स्पर्धेला हिंसक व युद्धाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. त्यातच शिया मुस्लीम जगाचे नेतृत्व करणार्‍या इस्लामिक क्रांतीचा झेंडा जगभर फडकावू बघणार्‍या इराणमध्ये सामान्य जनताही रस्त्यावर उतरू लागलेली आहे. सौदीमध्ये बदलते वारे ओळखून तिथला राजपुत्र धार्मिक बंधने सैल करण्याच्या कामाला लागला आहे. दुसरीकडे अशाच मुस्लीम सत्ता व तिथल्या धर्मपंडिताच्या चिथावण्यांनी पेटलेले जिहादचे यज्ञकुंड अजून विझलेले नाही. त्यातच पाकिस्तानमध्ये होणार्‍या घडामोडी गंभीर आहेत. बलुच व सिंधी-पठाणांच्या उठावाने पाक बेजार झालेला आहे. पण त्याला शिस्त लावायचे बाजूला पडून सेना व राजकारणी एकमेकांच्या उरावर बसलेले आहेत. त्याचे परिणाम तात्काळ दिसणारे नसतात. जागतिक राजकारणात इस्लामी देशांचा गट म्हणून दबाव आणणारी शक्ती क्षीण झालेली आहे. म्हणून तर अमेरिका इस्त्रायलच्या जेरूसलेम राजधानीला मान्यता देऊ शकली. तर सौदीसारखे देशही काही करू शकलेले नाहीत. अशावेळी काश्मिरचा विषय भारताने युद्धाच्या मार्गाने निकाली काढायचा ठरवला, तर पाकिस्तान प्रतिकारही करण्याच्या स्थितीत उरणार नाही. म्हणूनच पाकिस्तानातल्या घडामोडी बारकाईने बघण्याची गरज आहे. सात दशके उलटल्यावर पाकिस्तान नावाचा बुडबुडा फुटण्याची वेळ जवळ आली. त्यातच उद्या तालिबान्यांशी पाकिस्तानचे पटले नाही तर पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवरून एक आव्हान निर्माण होणार आहे. अगोदरच पाकिस्तान खड्डात आहे. त्यात चारही बाजूने घेरले गेल्यानंतर पाकिस्तानची शकले उठू शकतात. पाकिस्तान तालिबान्यांचा वापर भारतासाठी करेल, ही भीती रास्त आहे. पण त्याचवेळी पाकिस्तानपुढील आव्हाने पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि राज्यकर्त्यांची झोप उडवणारी आहेत, हे वास्तव आहे.

First Published on: September 15, 2021 6:50 AM
Exit mobile version