गावच्या शौचालयाचे दरवाजे चोरीला गेले अन्‌ बेरडवाडीकरांची राष्ट्रभक्ती जागी झाली

गावच्या शौचालयाचे दरवाजे चोरीला गेले अन्‌ बेरडवाडीकरांची राष्ट्रभक्ती जागी झाली

महाराष्ट्रातीलच एका कोपर्यात वसलेलं एक काल्पनिक गाव म्हणजे बेरडवाडी. येथील लोक म्हणजे एक से बढकर एक नमुनेच म्हणा ना. तर या बेरडवाडीच्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहोत. आणि हो, यातील घटना आणि व्यक्ती यांचा वास्तवाशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा बरं का !

भल्या सकाळी एकच गलका झालाजो तो खालच्या वेशीच्या दिशेनं पळत सुटलाअर्धा तासातच तिथं ही गर्दी जमलीबायकापुरूष, म्हातारेकोतारे, पोरंटोरंसगळीच गर्दी झाली. सर्वात नंतर आलेल्यांना काय झालंय तेच कळत नव्हतं. ते आपले विचारपूस करत होते. इतक्यात कुणीतरी मोठ्यानं आरोळी दिली, ‘अरे अण्णाला बोलवा पटकन’. सूचना येताच कुठलाही विचार न करता अण्णाच्या घराच्या दिशेने दोनचार बाप्ये आणि तीनचार पोरं पळली सुद्धा. इकडे जमलेली गर्दी तर्क वितर्क करत बसली होती.. ‘ हे अचानक असं कसं झालं?… कुणी केलं असंल बरं? … मेल्यांचं वाटूळं होईलअसे विविध उदगार एकाचवेळी ऐकायला मिळत होते

इकडे पाटील वाड्यात अण्णा पाटील नुकताच उठला होता. त्याचा सकाळचा दुसरा चहा सुरू होता. दिवाणखान्यातील गलेलठ्ठ सोफ्यावर बसून भुरक्या भुरक्यांनी तो चहाचा आस्वाद घेण्यात दंग होता. आणखी काही वेळ त्याला असाच निवांत चहा प्यायचा होता, पण अचानक काहीजण थेट दिवाणखान्यात घुसले.. त्यांच्या घामाघूम झालेल्या चेहऱ्यावर काळजी होती. जरा घाईनंच तो सांगू लागला ‘ अवं अण्णा आता वो कसं करायचं?….खालच्या वेशीजवळचा गावचा सार्वजनिक संडास…’ दम लागल्यानं त्याला पुढं बोलवंना. ‘दमानं दमानं…’ असं अण्णानं अभय देताच तो पुढं सांगू लागला…,‘ अहो सकाळी आम्ही तिकडंच गेल्तो नेहमीपरमानं.. पन पाहतो तर काय.. आपल्या सार्वजनिक संडासचे दरवाजेच गायबबापे आणि बायका दोन्हींच्या संडासचे दरवाजे कुणीतरी काढून घेतलंया…’ तो तो सांगत होता.. त्याच्या सांगण्याबरोबर अण्णाचा चेहरा गंभीर होत गेला. हातातला चहा तर केव्हाच गार झाला होता.. त्यासोबत आता या बातमीनं अण्णा स्वत:ही गार पडल्यासारखा झाला

तुम्ही आता जावा घरलाहे मॅटर लय शिरियस दिसतंय, दुपारच्याला सगळ्यांना जमायला सांगा पंचायतीम्होरंअर्जंट मीटिंगये म्हणावं…’

पडत्या फळाची आज्ञा मानून मंडळी गेली आणि अण्णानं माजघराकडं पाहत पुन्हा चहाची ऑर्डर सोडली.

बेरडवाडीचा अण्णा पाटील म्हणजे एकदम इरसाल असामी. पिढ्यान् पिढ्या गावचं पुढारपण अण्णाच्या घराकडे चालत आलेलं. सरपंचकी असो, पंचायत समिती असो की साखर कारखाने, अण्णाचा वट सगळीकडे होता. केवळ अण्णा पाटीलच नाही, अख्खी बेरडवाडी आणि तिथे राहणार्‍या नमुनेदार माणसांबद्दल सगळ्या तालुक्यात गवगवा होता. त्यातही निवडणूकीचं राजकारण करावं तर अण्णानंच. भल्याभल्यांना तो कधी चकवा देईल कुणीच सांगू शकत नसे. खरं तर मागच्या ३५ वर्षांपासून गावची सत्ता अण्णा पाटलाकडंच होती. पण गावचा विकास म्हणाल, तर मागच्या पंचवार्षिकमध्ये तयार झालेला दहादहा ब्लॉकचे सार्वजनिक शौचालय सोडलं, तर गावाच्या हिताचं काहीच काम झालं नव्हतं. दुष्काळातील रोजगार हमीची कामं असो, नाहीतर सार्वजनिक रस्ते आणि गटारी सर्वच कामं अगदी अप टू डेट होत होती गावात, पण कागदावर.. एवढ्या सगळ्या गैरसोयी सोसूनही गावकरी अण्णालाच निवडून द्यायचे. याचं कारण म्हणजे ऐनवेळी काही तरी क्लृप्ती लढवून तो निवडून यायचा. यंदा मात्र बेरडवाडीत त्याच्या विरोधात धूसफुस सुरू झाली होती. त्यातच निवडणुका लागल्यानं आता कुठल्या तोंडानं लोकांसमोर जायचं हा प्रश्न अण्णाला मागच्या काही दिवसांपासून सतावत होता. त्यातच हा प्रकार कानावर आल्यानं अण्णाचे डोळे लकाकू लागले..

दुपार कलायला लागली, तशी गावकऱ्यांनी पंचायतीसमोर गर्दी करायला सुरवात केली. सकाळच्या प्रकरणाची चर्चा प्रत्येकाच्या तोंडी होती. थोड्याच वेळात अण्णा पाटील आला आणि बैठक सुरू झाली. अर्थात अण्णानं बैठकीत थेट भाषणंच सुरू केलं. ‘मित्रांनो, सकाळच्या प्रकारानं तुमच्यापरमानंच मला बी धक्का बसलाय.. सार्वजनिक शौचालय म्हणजे आपल्या गावचा अभिमान, आपल्या गावची अस्मिता.. आम्ही आमदार साहेबांच्या दोन वर्ष मागे लागून हे शौचलय मंजूर करून आणलंअनेकांच्या पोटाचा प्रश्न सुटला..म्हणजे मला असं म्हणायचंय की तोपर्यंत बाया बापड्यांना उघड्यावर जावं लागे, त्यातून अनेकांना संकोचामुळे पोटाच्या व्याधी जडल्या होत्या.. पण २० ब्लॉकचे हे शौचालय झालं अन्‌ तो प्रश्न सुटलाइथं जमलेल्या मला सर्वांनी सांगा, पोटाचा प्रश्न सुटला की नाही?… ’ (सर्वांनी एकसूरात होकार दिला.) अख्ख्या तालुक्यात असं शौचालय नाही. पण नेमकं हेच आमच्या विरोधकांना खटकतंय, इतकंच न्हाय, तर आमच्या बाजूच्या गावांना पन्‌ मी केलेला विकास सहन होत नाहीयेशौचालयाचे दरवाजे यांच्यापैकीच कुणीतरी चोरलं असणार.. पन मित्रांनो हा प्रश्न आता माझ्यापुरता मर्यादित नाही, तर अख्ख्या गावाचा झालाय, मी तर म्हंतो राष्ट्रीय प्रश्न झालाय (टाळ्या) .. म्हणून या प्रकाराचा निषेध करू आणि दरवाजे चोरणाऱ्या देशद्रोह्यांना धडा शिकवूबोला शिकवणार की नाही धडा? ( सर्वांनी पुन्हा एकमताने हो करून उत्तर दिले). त्यासाठी यंदा तुम्ही आमच्याच पॅनलला निवडून द्या. तुमचे प्रत्येक मत हे दरवाजा चोरणाऱ्या गावद्रोही आणि देशद्रोह्यांना धडा शिकवेल आणि सरसेवक म्हणून मला पुन्हा संधी दिलीत, तर मी आश्वासन देतो की शौचालयाला सागवानाचे दरवाजे बसवू

बैठकीचं रूपांतर अण्णा पाटलाच्या सभेत कधी झाले कळलेच नाही. अण्णाच्या भाषणानं लोक चांगलेच भारावले. दुसऱ्या दिवशी प्रत्येकाच्या छातीवर देशप्रेमाचे बिल्ले झळकले. त्यावर लिहिलं होतं, ‘ गावच्या शौचालयाचा मला आहे अभिमान, मी आहे बेरडवाडीचा राष्ट्रभक्त’. बेरडवाडीच्या नसानसांत राष्ट्रभक्ती संचार करती झाली. अर्थात ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत अण्णा पाटील आणि त्यांचा पॅनल पुन्हा जिंकला हे वेगळं सांगायला नको.

आता बेरडवाडीचे लोक नेहमीप्रमाणेच सकाळी टमरेल घेऊन उघड्यावर जात आहेत आणि पुन्ह्याने सरपंच झालेल्या अण्णाला शेतातल्या घरात ठेवलेल्या २० दरवाजांचं काय करायचं याचा गोड प्रश्न सतावतोय?

First Published on: May 9, 2019 4:58 AM
Exit mobile version