माणसं वाचताना चष्मे फेकून द्यावेत

माणसं वाचताना चष्मे फेकून द्यावेत

रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती या अभिनेत्रीची युट्युबवर मुलाखत पहात होतो. त्याखाली हजारो कमेंटस रियाला फक्त शिव्यांची लाखोली वाहणार्‍या आणि ज्या चॅनलने, पत्रकाराने मुलाखत घेतली त्याला ट्रोल करणार्‍या. अपवाद वगळता सर्वच माध्यमांनी तर रियाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलं आहे.

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबाबत जवळपास गेले दोन महिने प्राइम टाइम डिस्कशन करणार्‍या वृत्तवाहिन्यांनी तपास यंत्रणांच्या समांतर असा खास तपास सुरु केला आहे.

तपास यंत्रणा किंवा न्यायव्यवस्था आपापलं काम करण्याआधीच (त्यातही अनेकदा हस्तक्षेप असतो, हे खरंच आहे.) माध्यमांनी आणि नेटिझननी आपल्या ‘फास्ट ट्रॅक कोर्टात’ न्याय देऊन टाकला आहे.

मुद्दा सुशांत अथवा रिया किंवा कोणी सिद्धार्थचा नाही, मुद्दा आहे तो आपल्या धारणांचा, गृहीतकांचा आणि फटाफट जजमेंट पास करण्याचा. घटना घडायचा अवकाश; आपलं जजमेंट तयार असतं. आपल्या आतमधलं पूर्वग्रहांचं सॉफ्टवेअर इतकं स्ट्राँग आहे की बस्स ! आपण तात्काळ सर्वांची निकालपत्रं तयार करत असतो.

माझा एक मित्र सांगायचा, पुणेरी लोक भयंकर खडूस असतात. कारण त्याला पेठेत रहात असताना एका मालकाने त्रास दिला होता. त्याच्या अनुभवातून तयार झालेल्या मताचं त्यानं सर्वसामान्यीकरण केलं आणि पुणेरी लोक अमुकच प्रकारचे असतात, असा निकाल त्याने जाहीर केला.

1.अमूक धर्माचे लोक अधिक हिंसक असतात कारण ते मांसाहार करतात.
2.समलिंगी संबंध अनैसर्गिक स्वरूपाचे असतात आणि ते विकृतपणाचं लक्षण आहे.
3.झोपडपट्टीत राहणारी मुलं चोर्‍यामार्‍या करतात.
4.मुलींना गणित किंवा विज्ञान विषयात फारशी गती नसते.

अशा एक ना अनेक, जात-धर्म-वर्ग-लिंग-प्रदेश या संदर्भात आपापल्या धारणा असतात. पूर्वग्रह असतात. आपण स्वतःच्याच पूर्वग्रहांच्या जाळ्यात अडकलो की मग त्यातून सुटका होत नाही. सत्य आपल्याला दिसू शकत नाही. पूर्वग्रहांचा डोंगर ओलांडल्याशिवाय स्वच्छ, नितळ अवकाश आपल्याला गवसू शकत नाही. निव्वळ एखाद्या घटनेवरुन कोणाला खडूस तर कोणाला देशद्रोही ठरवतो आपण. लगेच आपण कुणाला कुणाचा तरी एजंट मानतो, हे सारं टाळायला हवं.

‘12 अँग्री मेन’ या इंग्रजी सिनेमावर आधारित हिंदीतही ‘एक रुका हुआ फैसला’ हा एक सुंदर सिनेमा आहे. अवघा सिनेमा घडतो एका खोलीत. मुलाने वडिलांचा खून केला असा आरोप आहे आणि हे सत्य आहे की नाही, हे तपासण्यासाठी बारा जणांची समिती गठित केली गेली आहे. या प्रत्येकाच्या विचार करण्याच्या पद्धतीचा पाया पूर्वग्रहांवर कसा आधारित आहे, हे हळूहळू समोर येतं. या निमित्ताने सिनेमा आपल्या स्वतःच्याही पूर्वग्रहांची तपासणी करायला भाग पाडतो.

प्रख्यात मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस यांनी रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपीच्या ((REBT)) संदर्भात जी मांडणी केली आहे ती आपण सर्वांनी समजावून घ्यायला हवी. -ABCDE मॉडेल या नावाने गेल्या काही वर्षात ते विशेष लोकप्रिय आहे. -A म्हणजे -Activating Event म्हणजे मूळ घटना. B म्हणजे Belief विश्वास, C म्हणजे Consequence परिणाम, D म्हणजे Dispute तर E म्हणजे Effect.

एक साधं उदाहरण आपण लक्षात घेतलं की आपल्याला हे मॉडेल सहज समजू शकेल. समजा मी एका मुलीला माझ्यासोबत कॉफी प्यायला येशील का, अशी विचारणा केली आणि ती नाही म्हणाली. ( असं कधी होत नाही पण आपण उदाहरण म्हणून घेऊया.) आता ही घटना आहे A.

आता माझ्या मनात असं आहे की मी ग्रामीण भागातला आहे, गरीब आहे किंवा त्या मुलीच्या बरोबरीचा नाही त्यामुळे त्या मुलीने माझ्यासोबत कॉफी प्यायला नकार दिला, अशी माझी धारणा आहे. हा आहे मुद्दा अतार्किक धारणेचा, विश्वासाचा. पॉइंट नंबर B.

त्यावरुन मी ती मुलगी अभिजन आहे, आखडू आहे असा निष्कर्ष काढला, हा परिणाम आहे पॉइंट नंबर C. साधारणपणे एवढ्या गोष्टी नॉर्मली घडतात. एलिस पुढं जे सांगतात ते अधिक महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की D ही पायरी महत्त्वाची आहे ती आहे Dispute ची, आपल्याच धारणांसोबत वाद घालण्याची. म्हणजे मला वाटलं की या मुलीने मला मी ग्रामीण भागातला असल्यामुळे किंवा गरीब असल्यामुळे नकार दिला, पण मी असा विचार करण्याला तार्किक आधार काय आहे ? कदाचित त्या मुलीला मी जेव्हा विचारलं तेव्हा तिला दुसरं काही काम असेल किंवा तिला त्या वेळी कॉफी प्यायची इच्छा नसेल. असं काहीही असू शकतं, पण आपण पहिल्यांदा आपल्या अतार्किक धारणेला प्रश्नांकित केलं पाहिजे. त्यातून नवा परिणाम (E) साधला जातो. आपण एक प्रकारची संतुलित प्रतिक्रिया देण्याच्या बिंदूपाशी येऊन पोहोचतो. त्यातून आपण व्यक्तीला कुठलंही लेबल चिकटवत नाही आणि तिला आणि स्वतःला समजावून घेण्याचा अवकाश देतो.

आजची गंमत अशी झाली आहे की आपण तात्काळ निष्कर्ष काढून मोकळे होतो. D च्या पायरीपाशी पोहोचत नाही. स्वतःसोबत वाद घालत नाही. ‘आपुलाचि वाद आपणासी’ हे आपण विसरुन गेलो आहोत. संसद हे देशाच्या वाद-संवादाचं मोठं विचारपीठ. तिथं वाद-विवाद होईल की नाही, आपल्या हाती नाही पण आपल्या मनाच्या संसदेत तरी ही घुसळण झाली पाहिजे. मंथन झाले पाहिजे. अन्यथा आपल्या मनातही निष्कर्षांच्या फाइल्सची चळत उभी राहील. इतरांचं सोडा आपण स्वतःविषयीही जजमेंट पास करतो आणि मग स्वतःमध्ये बदल होण्याच्या सार्‍या शक्यताही धूसर होतात. दीपा गोवारीकर यांच्या या ओळी मला खूप भावतातः

माणसं वाचताना चष्मा काढून ठेवावा
जुन्या माणसाना भेटताना नवं व्हावं
पुराणा संदर्भ चाळू नये
माणसं वाचताना विरामचिन्हं ऐसपैस पेरावीत.
मोकळं मन आनंदाचं महाद्वार असतं.
आपलं वाचन आपणच करावं
डोळे आणि कान यातील अंतर स्मरावं
माणसं वाचताना अडखळलेलंच बरं
मुख्य म्हणजे पट्टीच्या वाचकानेही,
आपण देखील माणूसच आहोत, हे विसरू नये !

हे वाचन अडखळत झालं तरी हरकत नाही पण ते सदोष आणि चुकीच्या दिशेनं जाऊ नये, याची काळजी घेणं आपल्याच हातात असतं. चुकीच्या वाचनातून आपण स्वतःवर आणि इतरांवर अन्याय करत राहतो. त्यामुळे कोण कुठल्या रिया चक्रवर्तीने काय केलं हा मुद्दा नाही, मुद्दा आहे तो आपल्या डोळ्यांवरचे हे सारे चष्मे फेकून देण्याचा.

First Published on: September 20, 2020 5:24 AM
Exit mobile version