स्तनपान देणार्‍या मातांना पुरेशी झोप गरजेची

स्तनपान देणार्‍या मातांना पुरेशी झोप गरजेची

breast feeding mother health

स्तनपान देणार्‍या मातांना पुरेशी झोप मिळणे आवश्यक असते. डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की अपुरी झोप असलेल्या मातांना गर्भावस्थेनंतर नैराश्य येते. तसेच, अपुर्‍या झोपेमुळे दुधाच्या पुरवठ्याचे प्रमाण आणि दर्जा कमी होतो. कारण तणाव असल्यास शरीरातील काही इतर नैसर्गिक संप्रेरके स्रवतात. यामुळे प्रोलॅक्टिन (दुधाचे उत्पादन) आणि ऑक्सिटोसिन (मुक्त होणारे दूध) यांच्यावर परिणाम होतो किंवा ते बंद होते. त्यामुळे स्तनपान देणार्‍या मातांना पुरेसा आराम आणि आवश्यक झोप घेतल्यास या सर्व गोष्टी टाळता येतात, असे वेकफिटकोच्या अन्न आणि आहारतज्ज्ञ सल्लागार डॉ. सिल्की महाजन यांनी सांगितलं.

दीर्घकाळ झोपेसाठी प्रयत्न न करता छोट्या छोट्या डुलक्या घेणंही अशा परिस्थितीत उपयोगी ठरतं. अगदी १५ मिनिटे किंवा अर्ध्या तासाची झोप मिळत असल्यास ती सोडू नये जेणेकरून स्तनपान देणार्‍या मातांना थोडा आराम मिळू शकेल. शक्य असेल तेव्हा झोप काढा, जर बाळ दिवसा झोपत असेल तर मातांनीही तेवढ्या वेळात झोप घ्यावी. यावेळी आराम करणे मातांसाठी उत्तम ठरेल.

आई आणि बाळ दोघांनाही झोप गरजेची

बाळांना निरोगी वाढीसाठी झोपेची गरज असते. नवजात बालकांच्या मेंदूच्या विकासासाठी हे महत्त्वाचे आहे. बाळाप्रमाणेच आईसाठीही पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे. कारण अपुरी झोप आणि आरामाचा अभाव याच्यामुळे दुधाच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम होतात. ते आई आणि मूल दोघांसाठीही चांगले नसते.

रात्रीच्या स्तनपानाचा फायदा

रात्रीच्या वेळी स्तनपानामुळे जास्त प्रोलॅक्टिन उत्सर्जित होते. त्यामुळे बाळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुधाचे उत्पादन वाढण्यास मदत होते. रात्रीच्या वेळी स्तनपानाने दुधाचा पुरवठा नियमित होतो. स्तन रिकामा असल्यास पुरवठा जास्त होतो. कारण बाळांना रात्री २० टक्के जास्त भूक लागते. रात्रीच्या वेळी स्तनपानाचा फायदा आई आणि बाळ दोघांनाही होतो.

स्तनपान देणार्‍या मातांचा आहार

स्तनपान देणार्‍या मातांनी आपल्या आहारात अन्नधान्ये, अंडी, ताजी फळे, भाज्या, दाणे आणि चिकन यांच्यासारखे उच्च प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थ, कमळाच्या बिया, पालक, गाजर, नाचणी, दूध आणि दही यासारख्या लोह आणि कॅल्शियमयुक्त आहाराचा समावेश करावा, असाही सल्ला डॉ. महाजन देतात.

First Published on: September 28, 2018 12:10 AM
Exit mobile version