फोटोतल्या लतादीदी!

फोटोतल्या लतादीदी!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर

थकल्याभागल्या लता मंगेशकरांचा फोटो बघून उदासवाणं वाटलं. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आलेल्या त्या फोटोवरच्या प्रतिक्रियाही तशा उदासच होत्या. माझ्या प्राध्यापक मैत्रिणीची त्याच्यावरची प्रतिक्रिया तर विलक्षण स्पर्शून जाणारी होती…तिने फोटोखाली पोस्ट केलं होतं…भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. तर दुसर्‍या एकाने पोस्ट केलं, ये कहाँ आ गये हम…

परवा असाच कुणीतरी आमच्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर एक फोटो टाकला. फोटो होता स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांचा. नेहमीसारखा त्यांच्या बहराच्या काळातला नव्हे तर त्यांचं थकलेपण-दमलेपण दाखवणारा. खूप म्हातारपणातला. वयाच्या खूप संध्याकाळचा.

त्यांच्या चेहर्‍यावर नेहमी दिसून येणारी ती प्रसन्नता नसणं तसं स्वाभाविक होतं. वयाच्या घनगर्द खुणा दिसणं हेही नैसर्गिकच होतं. पण तरीही त्यांचं ते म्हातारपण मन खिन्न करणारं होतं. माणसाचं वय होतं. माणसाला माणसाचं वय खिंडीत गाठतं हे सगळं आपण कितीही स्वीकारलं तरी काही असामान्य माणसांच्या वयाच्या खुणा आपलं मन कातरून टाकतात.

थकल्याभागल्या लता मंगेशकरांचा फोटो बघून परवा तसंच झालं. माझ्या ग्रुपवर आलेल्या त्या फोटोवरच्या प्रतिक्रियाही तशा उदासच होत्या.

माझ्या प्राध्यापक मैत्रिणीची त्याच्यावरची प्रतिक्रिया तर विलक्षण स्पर्शून जाणारी होती…तिने लतादीदींनी गायलेले ग्रेसचे शब्दच त्या फोटोखाली पोस्ट केले होते…भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गाते, तू मला शिकवली गीते…भय इथले संपत नाही…

ग्रुपवरच्या आणखी एकाने तिचं अनुकरण करत लतादीदींनी गायलेल्या आणखी एका गाण्याचे शब्द पोस्ट केले…ये कहाँ आ गये हम…

आणखीही बर्‍याच जणांनी आपापल्या कुवतीने आणि पध्दतीने अशाच काही प्रतिक्रिया पाठवल्या. या सगळ्या प्रतिक्रियांमधून एकच दिसलं, लतादीदींच्या त्या फोटोतलं थकलेभागलेपण तसं कुणीच स्वीकारायला तयार नव्हतं.

तुम्हाआम्हा सगळ्यांप्रमाणे लतादीदींचं वय होणं हा तसा निसर्गधर्म होता; पण तरीही अनेकांच्या ते का पचनी पडलं नव्हतं?…

लता मंगेशकर या नावाचा सर्वव्यापी, सार्वकालिक महिमा, त्यांची त्रिकालाबाधित लोकप्रियता हे त्यामागचं कारण आहेच. पण त्या पलिकडेही एक कारण आहे ते म्हणजे लतादीदींनी या सगळ्यांच्या आयुष्यातल्या, सगळ्यांच्या अंतर्मनातल्या, सगळ्यांच्या तारूण्यातल्या जाणीवा आपल्या आर्त आवाजात कित्येक दशकं व्यक्त केल्या आहेत. एका अर्थी लतादीदींनी त्या सर्वांचं आयुष्य, त्या सर्वांचं तारूण्य स्वत:च्या सुरांच्या कलाबतूंंनी दररोज सजवलं. त्यांच्या मनातला आनंद आणि त्यांच्या मनातल्या व्यथावेदना दररोज आपल्या सुरांतून लतादीदींनी व्यक्त केल्या. लतादीदींचा सूर सगळ्यांना आनंदाच्या क्षणीही आणि उदासवाण्या क्षणीही जवळचा वाटला. तो त्यांच्यापासून कधी दुरावला नाही. त्याने कधी त्यांची साथ सोडली नाही. तो कधी मध्येच लुप्त झाला नाही. तो सगळ्यांसोबत सदासर्वकाळ सावलीसारखा राहिला. साहजिकच अशा सुरांचं वय होणं कुणाला चालणार होतं?

मला आठवतंय, क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्सनी एका काळात आपल्या अनोख्या शैलीच्या फलंदाजीने जगभरची मैदानं मारली होती. त्या काळचे तरुण-तरुणी त्यांच्यावर फिदा झाले होते. त्यांच्या डोळ्याचं पारणं फेडणार्‍या खेळामुळे त्यांच्या नावाला एक वेगळं वलय प्राप्त झालं होतं. त्यावेळचे असे वलयांकित सोबर्स काही वर्षांपूर्वी जेव्हा मुंबईच्या मैदानात आले आणि वयामुळे त्यांना जेव्हा किंचित लंगडत चालताना पाहिलं तेव्हा त्यांच्या चाहत्यांच्या मनातही असंच चर्र झालं होतं.

महान माणसांचं होतं काय की ती त्यांची कारकीर्द गाजवतात, त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या कर्तबगारीने भुरळ पाडतात. ती त्यांच्या शारीरिक क्षमतेपर्यंत आपलं काम यथायोग्य करत असतात. पण केव्हा ना केव्हा, कुठे ना कुठे त्यांची क्षमता तरी संपते किंवा त्यांची सद्दी तरी…आणि मग एक दिवस असा येतो की ती अचानक दिसेनाशी होतात. आपल्या नजरेला पडेनाशी होतात. ती अशी दृष्टीआड झाल्यानंतर बराच काळ जातो…आणि नंतर कधीतरी ती जेव्हा दृष्टीस पडतात तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर, शरीरावर वयाच्या खुणा दिसू लागतात. आपण पूर्वी कधीतरी पाहिलेला भलाभक्कम चिरेबंदी वाडा काही वर्षांनी जीर्णशीर्ण दिसल्यावर जे आपल्या मनात येतं तसं काहीतरी अशा वेळी आपल्या मनात येऊन जातं. मैदानं मारलेल्या, मैदानं गाजवलेल्या, मैफिली जिंकलेल्या माणसांचं विकलांग होणं हे मनाला चटका लावून जातं. अशा वेळी कधी कधी कुणाच्या भावना दाटून येणं, नको तितक्या उत्कट होणं साहजिक असतं.

परवा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकलेल्या लता मंगेशकरांच्या त्या फोटोबद्दल म्हणूनच तशा उत्कट प्रतिक्रिया एकामागोमाग आल्या. ग्रुपवरच्या एका चाहत्याने अशाच उत्कट भावनेतून लिहिलं-आई कितीही म्हातारी झाली तरी ती आपल्याला आपल्यासोबतच लागते. कारण ती आई असते, दीदी, तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार!

ग्रुपवरच्या कोणत्या तरी भाबड्या चाहत्याची भाबडेपणातून आलेली ती प्रतिक्रिया होती. पण त्यात ओतप्रोत सकारात्मकता भरलेली होती. कलावंताचं किंवा कुणाचंही म्हातारपण, त्यांचं वय होणं हे त्या प्रतिक्रियेत स्वीकारलं गेलं होतं; पण त्याचबरोबर त्या स्वीकाराचाही स्वीकार त्यात होता.

…आणि खुद्द लता मंगेशकरांच्या बाबतीत म्हणायचं तर आजही आणि उद्याही त्यांची गाणी तारुण्याने मुसमुसलेली राहणारच आहेत; पण आता मात्र त्या त्यांची गाणी गाण्यासाठी स्टेजवर येऊ शकणार नाहीत किंवा माईकसमोर उभ्या राहू शकणार नाहीत हे वास्तव त्यांच्या चाहत्यांनी ते मनाविरूध्द असलं तरी स्वीकारलेलं आहे. पण तरीही असं वाटतंय की, लता मंगेशकर नावाचा आवाज त्यांचं वय होताना आम्हाला जराही दिसू नये, जराही ऐकू येऊ नये! कलेचंही वय होऊ नये…आणि कलावंताचंही!

First Published on: May 19, 2019 4:45 AM
Exit mobile version