भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फाइनमन

भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फाइनमन

रिचर्ड फिलिप्स फाइनमन हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी पुंज यांत्रिकी आणि पुंज विद्युतगतिकी या विषयांमध्ये मूलभूत संशोधन केले. त्यांचा जन्म ११ मे १९१८ रोजी न्यूयॉर्क इथे झाला. त्यांनी मॅसॅच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बी. एस्सी ही पदवी (१९३९) आणि प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएचडी ही पदवी मिळवली (१९४२). प्रिन्स्टन इथे सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले (१९४०-४१). दुसर्‍या महायुद्धाच्या काळात (१९४३ ते १९४५) त्यांनी न्यू मेक्सिकोतील लॉस लॅमस इथे हॅन्स बेथे यांच्यासह बहुचर्चित मॅनहटन प्रकल्पावर अमेरिकेच्या अणुबॉम्ब प्रकल्पाचे सदस्य म्हणून संशोधन कार्य केले. या संशोधनादरम्यान त्यांनी विखंडन प्रक्रियेने स्फोट होणार्‍या अणुबॉम्बची परिणामकारकता ठरविण्यासाठी ‘बेथे-फाइनमन सूत्र’ विकसित केले.

ते कॉर्नेल विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते (१९४५-५०). १९५० पासून फाइनमन यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅल्टेक) मध्ये सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले.

फाइनमन यांनी १९५० च्या दशकात अत्यंत कमी तापमानाला असलेल्या द्रवरूप हेलियमच्या अतिप्रवाहिता गुणधर्मावर संशोधन केले आणि रशियन भौतिकशास्त्रज्ञ लेव्ह डी. लँडाऊ यांनी मांडलेल्या निष्कर्षाचे पुंज यांत्रिकीच्या सहाय्याने स्पष्टीकरण दिले. त्यांनतर १९५८ मध्ये अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ मरे गेलमान यांच्यासह अणूंमधील मूलभूत कणांमध्ये असलेल्या क्षीण बलाविषयी पुंज यांत्रिकीतील सिद्धांत वापरून संशोधन केले. हे संशोधन किरणोत्सारी मूलद्रव्यांमधून होणार्‍या बीटा कणांच्या उत्सर्जनाचे स्पष्टीकरण देण्यासाठी उपयुक्त ठरले.

फाइनमन यांना १९५४ साली अल्बर्ट आइनस्टाइन पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. त्यांना १९६५ सालचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ज्यूल्यॅन सीमॉर श्विंगर आणि जपानी भौतिकशास्त्रज्ञ शिन इचिरो टॉमॉनागा यांच्याबरोबर पुंज विद्युतगतिकीतील विद्युत् चुंबकीय प्रारणे आणि इलेक्ट्रॉन, पॉझिट्रॉन व फोटॉन यांतील परस्पर क्रियांचे स्पष्टीकरण देणार्‍या संशोधनाबद्दल विभागून देण्यात आला. अशा या महान शास्त्रज्ञाचे १५ फेब्रुवारी १९८८ रोजी निधन झाले.

First Published on: May 11, 2022 6:18 AM
Exit mobile version