नव्याने वसलेले कुलाबा मार्केट

नव्याने वसलेले कुलाबा मार्केट

कुलाबा मार्केट नेमके कोणते? असा प्रश्न उपस्थित झाला तर त्यावरून वाद होईल. गेल्या आठवड्यात मी कुलाबा मार्केटबद्दल लिहिले होते. त्यावरून अनेकांचे मला फोन आले. मी लिहिलेले कुलाबा मार्केट त्यांना माहितच नाही, असे काही वाचकांचे म्हणणे होते तर काही वाचकांनी चक्क मला वेड्यात काढले. मी जे लिहिले ते कुलाबा मार्केटच नाही.

कुलाबा मार्केट हे बेस्ट भवनाच्या समोरील रस्त्यावर आहे… वगैरे मला सुनावण्यात आले. पण खरं सांगतो, कुलाबा मार्केट नेमके कुठले याबाबत नवीन पिढीला फारसे माहीत असण्याची शक्यता नाही. कारण मी जे लिहिले ते जुने कुलाबा मार्केटबद्दल होते. खरं म्हणजे तेच खरे कुलाबा मार्केट; पण काळाच्या ओघात ते मार्केट अर्थातच तो बाजार अस्ताला जात असताना कुलाब्याला रस्त्यावर नवा बाजार आकार घेऊ लागला. तो बाजार म्हणजे आताची पिढी ज्याला कुलाबा मार्केट समजते. रिगल सिनेमाकडून थेट आरसी चर्चच्या दिशेने जाताना शहीद भगतसिंग मार्गावर दुतर्फा जे फेरीवाले बसतात, त्यांच्या बाजाराला नवे कुलाबा मार्केट म्हटले जाते. वास्तविक हा बाजार नाही. पण ग्राहक आणि विक्रेत्यांची गरज म्हणून हा बाजार अस्तित्वात आला आहे. रिगलच्या मागेच कॅफे परेड आहे. त्याच्या फुटपाथपासून हा बाजार सुरु होतो, तो थेट कुलाबा शिवमंदिरापर्यंत आहे. या भागात असलेल्या बाटा, आदिदास, पीटर इंग्लंड अशा पॉश दुकानांबाहेर असलेल्या या फेरीवाल्यांच्या समुहातून हा बाजार विकसित झाला आहे.

गेट-वे-ऑफ इंडिया हे कुलाबामधील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रेक्षणिय स्थळ. त्याच्या जवळ असलेल्या हॉटेल ताज आणि इतर लहान मोठ्या हॉटेलमधून परदेशी पर्यटक रहायला येतात. मुंबईत येणारे बहुसंख्य परदेशी पर्यटकांचे कुलाबा हे विश्रांतीस्थान. त्या पर्यटकांना आवडतील अशा वस्तू विकणारे अनेक फेरीवाले त्या भागात ७० च्या दशकात वावरायचे. त्यांच्याकडून मग मोरपिसाचा हात पंखा, लाकडावरील कोरीव काम, आभूषणे अशा वस्तू हे परदेशी पर्यटक खरेदी करायचे. आजुबाजूला असलेली पॉश दुकाने या पर्यटकांची गरज भागवायला सक्षम असली तरी ती महागडी होती.त्यामुळे पर्यटक या फेरीवाल्यांकडूनच माल विकत घ्यायचे. मालाला विक्री मिळू लागल्यामुळे फेरीवाले हळूहळू फुटपाथवर स्थानापन्न झाले. पोलीस आणि महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना पुरेसा हप्ता देऊन त्यांनी या फुटपाथवर आपला जम बसवला. त्यातून हे नवे कुलाबा मार्केट विकसित झाले. आता या ठिकाणी या फेरीवाल्यांची दुसरी पिढी धंदा करते. प्रत्येक परदेशी पर्यटकाला गाठून त्याला आभूषणे विकणारे करीम चाचा हे यांनी हे मार्केट नावारुपाला येताना पाहिले आहे. ते सांगतात, ‘चार पैसे मिळवण्यासाठी हा धंदा सुरु केला. हळूहळू मालाला उठाव मिळाला. लोक शोधत येऊ लागले. त्यामुळे कॅफे लिओपोर्टच्या पुढे कायमचा स्थिरावलो.’ आता करीमचाचांचा मुलगा तिथे धंदा करतो.

या कुलाबा मार्केटचे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रत्येक गोष्ट मिळते. फॅशनेबल कपड्यांपासून ते आभूषणांपर्यंत आणि अ‍ॅण्टीक पिसपासून अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स डिवाईसपर्यंत या मार्केटमध्ये सर्व उपलब्ध आहे. परदेशी पर्यटक या मार्केटमध्ये पारंपारिक भारतीय टच असलेले कपडे, आभूषणे आणि कोरीव कामांच्या वस्तू खरेदी करण्यासाठी येतात.मात्र येथून अ‍ॅण्टीक पीस न खरेदी केलेलेच बरे. कारण ते खरे नसतात. त्याला केवळ अ‍ॅण्टीक फिल दिलेला असतो. हेच येथील दागिने आणि कोरीव कामांच्या वस्तूंचे. मात्रफॅशन म्हणून काही हवे असेल तर कुलाबा मार्केट हा एक चांगला पर्याय आहे. या मार्केटमधील प्रत्येक वस्तू फॅशनेबल आहे. ८०-९० च्या दशकात जेव्हा चर्चगेटचे ‘फॅशन मार्केट’ अस्तित्वात नव्हते तेव्हा हे कुलाबा मार्केटच तरुणाईच्या खरेदीचे केंद्र होते. त्यावेळी फेरीवाले म्युझियमपासून थेट इलेक्ट्रीक हाऊसपर्यंत बसायचे. त्यांच्याकडे स्वस्त आणि फॅशनेबल कपडे मिळायचे.

या मार्केटमध्ये फिरायचे असेल तर खिशात पैसे आणि तीक्ष्ण नजर पाहिजे. तसेच बार्गेनिंगमध्ये तुम्ही मुंबईकरांसारखे एक्सपर्ट असायला हवे. येथे स्टॉलवर एकच भाव किंवा फिक्स प्राईज असे लिहिले असले तरी विक्रेते हमखास बार्गेनिंग करतात.मात्र त्यातही एक गोम आहे. तुम्ही एखाद्या विक्रेत्याकडे काही खरेदी करायला उभे राहिलात आणि विदेशी पर्यटक त्याच्याकडे आले की तो विक्रेता तुम्हाला अजिबात भाव देत नाही!पुन्हा मार्केटमध्ये फिरताना, पोटपुजा करण्यासाठी ऐतिहासिक कॅफे लिओपोर्टसारखी चांगली रेस्टॉरंटही आहेत. ती महाग असली तरी तेथे काही काळ चांगला जातो. मात्र कुलाबा मार्केट नेमके कुठले हा वाद असेल तर हे मुळचे कुलाबा मार्केट नाही. या मार्केटच्या पुढे पूर्वीच्या स्ट्रॅण्ड सिनेमाच्या गल्लीत असलेलेच खरे कुलाबा मार्केट. हे नव्याने वसलेले कुलाबा मार्केट

First Published on: July 30, 2018 3:04 AM
Exit mobile version