प्रतिभावान कवी केशव मेश्राम

प्रतिभावान कवी केशव मेश्राम

प्रतिभावान कवी केशव मेश्राम

केशव तानाजी मेश्राम हे मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार व समीक्षक होते. त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1937 रोजी झाला. ते सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई येथून एम. ए. (मराठी) झाले. त्यांना प्रारंभी मोलमजुरीची कामे करावी लागली. नंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी रेल्वे खात्यात नोकरी केली. त्याच काळात ‘रूपगंधा’ नियतकालिकात काम केले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच रेल्वे खात्यातील नोकरीचा राजीनामा देऊन ते महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठीचे अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. तेथील एक वर्षाच्या नोकरीनंतर त्यांनी मुंबई येथे, महर्षी दयानंद सरस्वती महाविद्यालयात अध्यापनकार्य केले. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातही प्रपाठक व विभागप्रमुख म्हणून सेवा केल्यानंतर नोव्हेंबर १९९७ मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले.

वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतून लेखन करणार्‍या मेश्रामांचा मूळ पिंड कवीचा होता. ‘कविता’ हा त्यांचा विशेष आवडीचा साहित्यप्रकार. ‘रहस्यरंजन’ विशेषांकात त्यांची ‘मेळा’ ही पहिली कविता प्रसिद्ध झाली (१९५८). त्यानंतर त्यांनी सातत्याने काव्यलेखन केले. ‘उत्खनन’ (१९७७), ‘जुगलबंदी’ (१९८२), ‘अकस्मात’ (१९८४), ‘चरित’ (१९८९), ‘कृतकपुत्र’ (२००१), ‘अनिवास’ (२००५) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. डॉ. सुमतेन्द्र नाडिग यांच्या मूळ कन्नड भाषेतील चिंतनकाव्याचा त्यांनी ‘दाम्पत्यगीता’ हा मराठी भावानुवाद केला.

दलित कवितेच्या प्रारंभ काळातील एक प्रमुख कवी म्हणून त्यांचा उल्लेख होतो. सर्व प्रकारच्या अनुभवांना मोकळेपणाने सामोरी जाणारी त्यांची कविता असून पारंपरिक लयीतील, तसेच मुक्तछंदात्मक लयीतील काव्यलेखनातून त्यांचे काव्यमूल्य सिद्ध होते. समाजातील दैन्य, दारिद्य्र, विषमता व जीवनाच्या सर्वच क्षेत्रांतील अनास्था भाव हे त्यांच्या काव्यलेखनाचे विषय होते. नव्या पिढीच्या ध्येयशून्य तडजोडीची वेदनाही त्यांच्या काव्यात उमटलेली दिसते. जीवनातील रूक्ष, कडवट अनुभव काव्यात मांडताना त्यांच्या शब्दांना तीक्ष्ण शस्त्राची धार येते. ते वृत्तीने आत्मरत असले तरीही त्यांची सामाजिक बांधीलकीशी निष्ठा होती. ‘उत्खनन’, ‘जुगलबंदी’ ह्या काव्यसंग्रहांमध्ये धर्मव्यवस्थेने लादलेल्या मानहानीच्या जीवनाविरुद्ध विद्रोहाचे भावप्रकटन आले आहे. ‘चरित’, ‘कृतकपुत्र’, ‘अनिवास’मध्ये त्यांची प्रखर आंबेडकरवादी जाणीव व्यक्त होते.

गतकाळाचे वास्तव नजरेसमोर ठेवून वर्तमानाला सामोरी जाणारी त्यांची कविता असून ‘आत्मपीडेकडून आत्मशोधाचा प्रत्यय’ हा त्यांच्या कवितेचा स्थायीभाव आहे.‘हकिकत’ आणि ‘जटायू’ (१९७२) व ‘पोखरण’ (१९७९) ह्या प्रसिद्ध कादंबर्‍या आहेत. त्यांचे ‘खरवड’, ‘पत्रावळ’, ‘धगाडा’, ‘मरणमाळा’, आदी नऊ कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. या कथालेखनात सामाजिक विषमता, अस्पृश्यता, अन्याय-अत्याचार, अपमान, विटंबना, अवहेलना, गुन्हेगारी अशा वास्तवाचे चित्रण आहे. मेश्रामांना म. सा. परिषदेचा डॉ.भालचंद्र फडके पुरस्कार (२०००), दलित समीक्षा पुरस्कार (२०००), महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार (२००३), शाहू- फुले परिवर्तन अकादमीचा लेखक सन्मान पुरस्कार (२००३), जीवन गौरव पुरस्कार (२००५) हे पुरस्कार मिळाले. अशा या प्रतिभावान कवीचे २९ नोव्हेंबर २००७ रोजी निधन झाले.

First Published on: November 24, 2021 4:42 AM
Exit mobile version