संघाच्या यशावर ’राज’कारणाचे सावट

संघाच्या यशावर ’राज’कारणाचे सावट

Ramesh Powar & Mitali Raj

महिला टी-20 विश्वचषकाची उपांत्य फेरी…भारत विरुद्ध इंग्लंड सामना…भारताचा पराभव…या सामन्यात भारताने आपली सर्वात अनुभवी खेळाडू मिताली राजला संघात स्थान दिले नाही. या सगळ्यामुळे एक गोष्ट होणार हे नक्की होते. टीका. भारतातील प्रसारमाध्यमे, क्रिकेट समीक्षक आणि चाहते यांनी मिळून इतक्या मोठ्या सामन्यात इतक्या अनुभवी खेळाडूला वगळल्यामुळे संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली. तसेच इतका मोठा निर्णय घेताना बीसीसीआयच्या पदाधिकार्‍यांचाही त्यात सहभाग असेल असे तर्कवितर्क लावले गेले. मात्र, बीसीसीआयच्या प्रशासक समितीच्या सदस्या डायना एडुलजी यांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला होता. त्या मितालीला वगळण्याविषयी म्हणाल्या होत्या, आमचा संघनिवडीशी संबंध नाही. मला वाटते की मितालीला वगळले ही गोष्ट गरजेपेक्षा मोठी बनवली जात आहे. जर भारताने हा सामना जिंकला असता तर या गोष्टीवर कोणीही काही बोलले नसते.

मितालीवर इतकी सगळी चर्चा होत असताना मिताली स्वतः मात्र गप्प होती. तिने या प्रकरणावर काही भाष्य केले नव्हते. पण अखेर तिने गेल्या सोमवारी आपले मौन सोडले. तिने बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आणि महाव्यवस्थापक सबा करीम यांना एक पत्र पाठवून आपली बाजू मांडली. या पत्रात तिने रमेश पोवार आणि डायना एडुलजी यांनी मिळून आपली कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप केला.मितालीने तिच्या पत्रात लिहिले होते की, ’रमेश पोवार यांनी मला वारंवार अपमानित केले. मी एखाद्या ठिकाणी बसले असेन तर ते तिथून निघून जायचे. जर मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर ते लक्ष नसल्यासारखे दाखवायचे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्याच्या एक दिवस आधी पोवार माझ्या रूममध्ये येऊन मला म्हणाले की या सामन्यासाठी तू मैदानातही येऊ नकोस, कारण तिथे प्रसारमाध्यमे असतील. त्यांची ही गोष्ट ऐकून मला खूपच धक्का बसला. तसेच इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्याआधी नेट्समध्ये सराव सुरु असताना त्यांनी माझ्या फलंदाजीकडे एकदाही लक्ष दिले नाही. तेव्हाच मला अंदाज आला होता की मला उपांत्य फेरीतील सामन्यासाठी संघात स्थान मिळणार नाही. ही गोष्ट खूपच निराशजनक होती. ते माझी कारकीर्द संपवायचा प्रयत्न करत होते.

डायना एडुलजी यांच्याविषयी मितालीने पत्रात लिहिले की, ’डायना एडुलजी यांचा आणि त्यांच्या पदाचा मी नेमहीच आदर केला. पण त्यांनी त्यांच्या पदाचा वापर मला उपांत्य फेरीत संघाबाहेर ठेवण्यासाठी केला हे अत्यंत निराशाजनक आहे. घडलेल्या सर्व प्रकारामुळे मला खूप वाईट वाटले. मी भारतीय महिला संघाचे 20 वर्षे प्रतिनिधित्व करते आहे. माझ्या या योगदानाची उच्च पदावर असणार्‍या लोकांना काहीच किंमत नाही असे मला वाटू लागले आहे.’ मितालीने आपल्या पत्रात इतके गंभीर आरोप लावल्यानंतर प्रशिक्षक रमेश पोवार काय प्रतिक्रिया देणार याकडे सार्‍यांचे लक्ष होते. त्यांच्या प्रतिक्रियेसाठी फार काळ वाट पाहावी लागली नाही. त्यांनीही मितालीला सडेतोड उत्तर दिले. त्यांनी बीसीसीआयला एक अहवाल सादर केला. ज्यातील 5 पाने ही मितालीच्या बाबतीत होती. या अहवालात पोवार यांनी मितालीवर जोरदार टीका केली. अहवालात पोवार यांनी म्हटले की, ’मितालीला संघाच्या यशाशी काही देणेघेणे नव्हते. ती तिच्या वैयक्तिक विक्रमांसाठीच खेळत होती. तिला डावाच्या सुरुवातीला फटकेबाजी करता येत नाही. त्यामुळे इतर फलंदाजांवर दबाव येतो. आम्हाला पॉवर-प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करायच्या होत्या. त्यासाठी आम्ही तिला मधल्या फळीत खेळवण्याचा निर्णय घेतला. पण तो तिला फारसा आवडला नाही. त्यामुळे जर तिला सलामीला पाठवले नाही, तर ती विश्वचषक अर्ध्यावर सोडून निघून जाईल अशी तिने धमकी दिली होती. ती नेहमीच अलिप्त राहायची. संघातील सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून ती इतर खेळाडूंना मार्गदर्शन करेल अशी मला अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. तिच्याशी संवाद साधणे कठीण होते.’ पोवार यांच्या या टीकेनंतर मितालीने ट्विटरवर म्हटले की, ’मी भारतीय संघासाठी 20 वर्षे जी मेहनत घेतली ती सर्व वाया गेली.

मिताली आणि पोवार यांनी आपापली बाजू तर मांडली, पण त्यांच्या या वादविवादामुळे उर्वरित भारतीय संघाच्या कामगिरीकडे काहीसे दुर्लक्षच झाले आहे. अनेक वर्षे धडपड केल्यानंतर भारतीय महिला संघाने आता कुठे स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी मागील वर्षी झालेल्या विश्वचषकात (50 षटकांच्या) जी उल्लेखनीय कामगिरी केली होती, त्यामुळे त्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. नेहमी पुरुष संघाची वाहवा करणार्‍या चाहत्यांना आणि बीसीसीआयला आपल्या खेळाकडे लक्ष देण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्याकडून चाहत्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. महिला संघाने टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केला आणि संघ चाहत्यांच्या अपेक्षांना पात्र ठरला. असे असताना मिताली आणि पोवार यांच्यातील वादाकडे सर्वांचे लक्ष आहे हे दुर्दैवच ! या वादामुळेच रमेश पोवार यांना आपले प्रशिक्षकपद गमवावे लागणार हे जवळपास निश्चितच आहे. गेल्या शुक्रवारी त्यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. टी-20 विश्वचषकाला अवघे पाच महिने बाकी असताना माजी प्रशिक्षक तुषार आरोठे यांनी खेळाडूंसोबतच्या वादामुळे प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पोवार यांनी प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. अगदी कमी वेळातच त्यांनी भारतीय संघाला विश्वचषकासाठी तयार केले. विश्वचषकादरम्यान भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने पोवार यांची स्तुती केली होती. त्यांच्यामुळे आमचा खेळ अधिक सुधारला आहे असे तिने म्हटले होते. पण आता या प्रकरणामुळे बीसीसीआयने त्यांचा करार वाढवलेला नाही. तर बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकासाठी अर्जही मागवले आहेत. पोवार प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करूही शकतात, पण त्यांची पुन्हा त्या पदी नेमणूक होईल यात जरा शंकाच आहे.

या सर्व वादविवादामुळे मिताली राज आणि रमेश पोवार यांचे नुकसान झाले आहेच पण सर्वात जास्त नुकसान हे भारतीय महिला संघाचे झाले आहे. भारतीय संघ यशाची शिखरे पार करत असताना हे प्रकरण घडणे संघाच्या भविष्याच्या दृष्टीने चांगले नाही. भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड या संघांइतके यशस्वी व्हायचे असेल तर संघात खेळीमेळीचे आणि स्थिर वातावरण असणे गरजेचे आहे. त्यामुळे मिताली – पोवार यांच्यातील हा वाद आणखी वाढू नये आणि त्याचा महिला संघाच्या भविष्यावर दुष्परिणाम होऊ नये यासाठी बीसीसीआयने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे हे निश्चित.

First Published on: December 2, 2018 5:39 AM
Exit mobile version