संपादकीय : युतीच्या बाजारात तुरी…

संपादकीय : युतीच्या बाजारात तुरी…

आत्मविश्वासाला यशाची पहिली पायरी म्हणतात. पूर्वी तिला अपयशात मोजलं जायचं. अपयशाला यशाची पहिली पायरी म्हटलं जायचं, पण आत्मविश्वास नसेल तर यश आणि अपयश शून्य.आत्मविश्वास जणू आपल्या नसानसात आहे, असं मानून त्याचे पुरस्कर्ते नकोतितक्या फुशारक्या मारू लागले आहेत. या भरात आपण संसदीय परंपरा धुडकावून लावतो आहोत याचं त्यांना काहीही पडलेलं नसतं. महाराष्ट्रात सत्ता मिळण्यापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत सुरू असलेले दावे प्रतिदावे लक्षात घेतले की सत्ता माणसाला कशी लाचार बनवते ते लक्षात येतं. बाजारात तुरी, अशी एक ग्रामीण म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय या सगळ्या दाव्यांनी आणून दिला आहे. किमान निवडणूक तरी होऊ द्या, असं म्हणण्याची वेळ या मंडळींनी आणून ठेवली आहे. शुचिर्भूतवाले भाजपचे नेते यात आघाडीवर आहेत, हे सांगायला नको. सत्तेच्या नाड्या भाजपच्या हाती आल्यापासून त्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या तोंडाचा जणू दांडपट्टाच करून ठेवला आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. वीस ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणुका होतील. त्यानंतर ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत, त्या पक्षाच्या आमदारांनी बहुमताने आपला नेता निवडायचा असे लोकशाहीचे संकेत आहेत. आजकाल हे सगळं मोडीत निघालं आहे. म्हणूनच ज्याचा अधिकार तो सत्तेपासून दूर आणि ज्याचा वशिला तो सत्तेचा म्होरक्या ठरतो आहे. आमदारांना मान्य नसलेल्या नेत्यांची दिल्लीतून वर्णी लावली जात आहे. भारतीय जनता पक्ष जरी स्वतःला इतरांपेक्षा वेगळा मानत असला आणि पार्टी विथ डिफरंसचा कितीही तोरा मिरवला तरी तिथेही आता हायकमांडशिवाय पान हलत नाही. उलट त्या पक्षात हायकमांडच अधिक पावरफूल आहेत. पान हलवण्याचा कोणी प्रयत्न केला की तो एकनाथ खडसेंसारखा घरी बसलाच म्हणून समजा. काँग्रेसमध्ये हे हायकमांड काही संख्येने असायचे. भाजपात त्यांची संख्या केवळ दोन आहे. वर्णीची संधी मिळाली की तिचा इतका वापर करू नये की तिची घृणा यावी. भाजपातील नेते त्याचा असाच वापर करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस असोत, माजी प्रदेशाध्यक्ष दानवे असोत, की नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असोत, यांना सत्ता म्हणजे सारंकाही असंच वाटतं. यामुळेच त्यांच्या तोंडाला आवर नाही.

देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे सूत्र पुढेही चालू राहण्याचे संकेत यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. त्यामुळं चंद्रकांत पाटील यांची जरी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली असली, तरी देवेंद्रांच्या स्थानाला धोका नाही. त्यांनी काम करो अथवा ना करो, ते आहे त्याच जागी असतील ही काळ्या दगडावरील रेघ होय. विधिमंडळात आणि भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भाष्य करताना आगामी मुख्यमंत्री मीच, हे पालपूद फडणवीसांनी ऐकवलं. मुख्यमंत्री पदाचा कायम टीळाच जणू आपल्या कपाळी असल्याचं फडणवीसांना वाटत असावं. यासाठीच रस्तोरस्ती फलकांचा माहोल तयार करण्यात आला होता. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीकडे जाणार्‍या रस्त्यावर लावण्यात आलेले फलक तेच सांगत होते. वास्तविक मोदींच्या कृपेने फडणवीस यांचं स्थान पक्क असताना त्यांच्या समर्थकांना असे फलक लावण्याचं काहीच कारण नाही. गेल्या पाच वर्षांत भाजपने राज्यात काय काम केलं, कोणती आश्वासनं दिली, त्यापैकी किती प्रत्यक्षात आली, याचं मूल्यांकन जनता या निवडणुकीत करणार आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचं पानिपत झालं असलं, तरी आताही तशीच परिस्थिती राहीलच असं नाही. तरीही मुख्यमंत्री आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी २२० जागा जिंकण्याचा पण केला आहे. या दोघांना यात अतिशयोक्ती वाटणार नाही. कारण माहोल तयार करून फायदा उठवण्याची शक्कल त्यांना चांगलीच ठावूक आहे. हा आकडा गाठण्यासाठी त्यांना फारशी शक्ती खर्च करावी लागणार नाही. तशी पुरेपूर तयारी त्यांनी करून ठेवली आहे. जशी पैशांची कमी नाही, तशी पैसे घेऊन फाटाफूट करणार्‍यांची त्यांना कमी नाही. विरोधकांमधल्या लाचारांची जशी कमी नाही तशी प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या फुटपाड्यांचीही कमी नाही. २२० जागा मिळवण्याचा भाजपचा मनोदय असला, तरी त्यात अतिशयोक्ती आहे, असंही नाही. भाजपचा हा मानस खोटा ठरविण्याची क्षमता विरोधकांत नाही आणि काँग्रेस-राष्ट्रवादीतून दररोज भाजप-शिवसेनेत जाऊ इच्छिणार्‍यांची बाहेर येणारी नावं पाहिली, तर भाजपसाठी हे सगळं सुपीक कुरण मिळालं आहे.

जनतेला गृहीत धरून पुढचा मुख्यमंत्री आमचाच होईल, असा दावा युतीचे नेते करत आहेत. स्वतः मुख्यंत्र्यांनी शड्डू ठोकलाच आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदासाठी प्रोजेक्ट करू लागताच आदित्य यांना मुख्यमंत्रिपदासाठी प्रोजेक्ट करण्यामुळे शिवसेनेतच नाराजी आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील सांगू लागले आहेत. दुसरीकडे आदित्य यांच्या दौर्‍यात शक्तिप्रदर्शन करत शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी हा दौरा नसून जनआशीर्वादासाठी असल्याचं सांगत आहे. जनआशीर्वाद कशासाठी याचं उत्तर मात्र दिलं जात नाही. ताकाला जाऊन भांडं लपविण्याचाच हा प्रकार आहे. अशा परिस्थितीत विधानसभेच्या सर्व २८८ जागांवर लढण्याची तयारी करण्याचा सूर भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत लावला. यात फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचं बाशिंग बांधल्याने विधानसभा निवडणुकीत युती होणार, की नाही याविषयी संभ्रमाचं वातावरण आहे. कारण भाजपच्या नेत्यांवर विश्वास ठेवायला सेना तयार नाही. पुन्हा मागचाच हातखंडा वापरून भाजपने ऐनवेळी दगाफटका केला तर त्याचे परिणाम स्वप्न भंगणारे ठरू शकतात. हे लक्षात घेऊन सेनेने आपल्या प्रमुख पदाधिकार्‍यांसोबत राज्यातील सर्व जागा लढविण्याबाबत गांभीर्यानं चाचपणी सुरू केली आहे. भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेश भाजपच्या प्रभारी सरोज पांडे, फडणवीस यांनी युतीबाबत ब्र काढला नाही. २०१४ प्रमाणेच युती झाली नाही, तर काय चित्र राहील? राज्यातील कुठल्या विभागात भाजपला चांगलं यश मिळेल? तसंच कुठल्या विभागात भाजपला अधिक कठोर परिश्रम घ्यावे लागतील, याबाबत अनेक नेते व कार्यकर्ते यांच्यात चर्चा सुरू होती. जेथे भाजपचे उमेदवार असतील तिथे आणि जिथं मित्रपक्षांचे उमेदवार असतील, तिथेही भाजपच निवडणूक लढत आहे, असं समजून सर्व २८८ जागांवर कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. हाव नावाच्या एका वाक्यात भाजप प्रदेशाध्यक्ष पाटलांनी आपला हेतू स्पष्ट करून टाकला.

First Published on: July 29, 2019 11:15 AM
Exit mobile version