गाणं… त्यात असंही असतं!

गाणं… त्यात असंही असतं!

थेंबाथेंबाने जलाशय बनावा तसंच गाण्याचंही असतं. ते अक्षराअक्षरा, शब्दाशब्दाने बनतं. गाण्यातलं एखादं अक्षर, एखादा शब्द हा त्या गाण्यात त्याचं वेगळंच व्यक्तिमत्व लेवून येत असतो. तो शब्द त्या गाण्याचं अनोखं वैशिष्ठ्य, वेगळं सौंदर्य ठरत असतो. सगळ्याच गाण्यांचं तसं होत नाही. पण ज्या काही गाण्यांचं तसं होतं ती गाणी इतर कुणाच्या लक्षात राहिली नाही तरी कान आणि मन देऊन गाणं ऐकणार्‍यांच्या मात्र नक्की लक्षात राहतात…आणि गाणं तेच असतं, जे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत नसतानाही लक्षात राहतं ते गाणं, गुणगुणावंसं वाटतं ते गाणं!

शर्मिलीतलं ‘पटदीप’ रागातलं ‘मेघा छाये आधी रात बैरन बन गयी निंदिया’ हे गाणं घ्या. त्यातला ‘बैरन’ हा शब्द गाताना त्यातलं ‘न’ हे अक्षर लतादिदींनी इतकं अलगद आणि हळूवार उच्चारलं आहे की त्या अक्षरासाठी त्या गाण्याचा तो मुखडा आणि तो शब्द पुन्हा पुन्हा ऐकावा. त्याच गाण्यातल्या एका अंतरात एक ओळ आहे – ‘हवा लागे शुल जैसी ताना मारे चुनरियां.’ लतादिदी तिथेही गाणं ऐकण्याचा एक अपार आनंद देऊन गेल्या आहेत. ‘ताना मारे चुनरिया’ हे विशिष्ट शब्द गाताना दिदी अशा काही भावभावना व्यक्त करून गेल्या आहेत की चुनरीचं ते वार्‍यावर लहरणं नजरेसमोर तरळून जातं.

‘आनंदी आनंद गडे’ ही बालकवींची कविता दिदी खूप जुन्या काळात गाऊन गेल्या आहेत. जग कसं आनंदाने ओसंडून वहातं आहे अशा अर्थाच्या त्या कवितेचं गाणं त्या काळात हृदयनाथ मंगेशकरांनी अप्रतिमपणे केलं. ह्या कवितेत बालकवी एका ठिंकाणी म्हणाले आहेत- ‘पक्षी मनोहर कुजित रे!’…कुजन म्हणजे गायन करणं, गाणं. दिदींनी ह्या गाण्यात कुजित हा शब्द गाताना पक्षांचं ते मनोहर कुुंजन गाण्यात जिवंत करून ठेवलं आहे.

‘जिस देश में गंगा बहती हैं’ मधल एक गाणं आहे ‘ओ बसंती पवन पागल ना जा रे ना जा, रोको कोई.’ दिदींनीचं ते गायलं आहे. ह्या गाण्यात कवी शैलेंद्रनी लिहिलं आहे – ‘बन के पत्थर हम खडे थे सुनी सुनी राह पे.’ त्यातला ‘पत्थर’ हा शब्द गाताना तो शब्द गाण्यात किंचित तोडला गेला आहे. संगिताच्या दृष्टीने तो यतिभंग. पण शैलेंद्रजींचं म्हणणं होतं की दगड हा रस्त्यात निपचित पडून असतो ती निपचितता त्या शब्दात आली आहे. नंतर ते गाणं ऐकताना आणि गाण्यातला तो शब्द ऐकताना त्या शब्दातली ती अनुभूती बर्‍याचदा अनुभवाला आल्याशिवाय रहात नाही.

‘उत्सव’मधलं सुरेश वाडकरने गायलेलं गाणं आहे – ‘सांझ ढले, गगन तले, हम कितने एकाकी.’ संध्याकाळचा अवघा पश्चिमरंग ह्या गाण्यात कवी वसंत देवांनी ह्या गाण्यात रेखाटलेला आहे. ह्या गाण्यात एके ठिकाणी सुरेश वाडकर गाऊन गेला आहे – ‘निशिगंधा के सूर में कह देगी बात सभी.’ ह्यातला ‘निशिगंधा’ हा शब्द सुरेश वाडकरने असा गायला आहे की कवी वसंत देव एकदा म्हणाले, ‘मला लिहिताना ह्या शब्दाचा जितका गहनगहिरा अर्थ कळला नाही तितका सुरेश वाडकरने तो गायल्यानंतर कळला’..आणि ते खरंही आहे. तो शब्द सुरेश वाडकरने इतका आतून गायला आहे की तो ऐकताना तो खरंच आपल्या आत नकळत झिरपतो.

असंच एक आशा भोसलेंचं गाणं आहे- ‘हम तेरे बिना जी ना सकेंगे सनम.’ ठाकुर जर्नेलसिंगमधलं. ह्यातली पुढची ओळ आहे – ‘दिल की ये आवाज हैं.’ ह्यातला ‘आवाज’ हा शब्द गाताना आशाताईंनी अशी काही हळवी आणि हळूवार गंमत केली आहे, गाण्यातली अशी काही ती जागा घेतली आहे की हाय हाय! ऐकताना काळजाचं पाणी पाणी होऊन जातं. ते गाणंच मुळात अतिशय नाजूकसाजूक आणि अतिशय निरागस. पण त्या गाण्यात आशाताईंनी आवाज हा शब्द ज्या काही नजाकतीने गायला आहे त्याला खरंच तोड नाही. आशाताईंनी गायलेला तो शब्द हा त्या संपूर्ण गाण्यातलं एक अनुपम सौंदर्य ठरला आहे.

‘एक लाजरा नि साजरा मुखडा’ हे मराठीतलं खेळकर, गावरान गाणं आजही लोकांच्या लक्षात आहे. ह्या गाण्यातले शब्द आहेत – ‘इथं नको तिथं जाऊ, आडोशाला उभं राहू’…ह्या नंतर गायिका प्रश्न विचारते, ‘का?’…आणि नंतर गायक तिला गावरानपणे उत्तर देतो, ‘बघत्यात!’..हा ‘का?’ आणि ‘बघत्यात’ असा सगळा मामला गाण्यात इतका खेळकरपणे आला आहे की गाणं ऐकताना हे का आणि बघत्यात कधी येतं ह्याचीच लोक वाट बघतात.

गाण्यातल्या ह्या बारीकसारीक गमतीजमती असतात. कधी कधी ऐकणार्‍यांचं त्याकडे लक्ष जातं, कधी नाही, पण ती गंमत कळली की त्या गाण्याचा एक वेगळा अर्थ कळतो. गाणं वेगळ्या अर्थाने कळू लागतं. अनेक गाण्यांच्या अशा अनेक गमतीजमती सांगता येतील. मुळात गाणं ही एक सरळसोट गोष्ट नाही. त्याला हे वेगळे पदर असतात, वेगळे कंगोरे असतात, ऐकणार्‍याने गाणं सरळसोट ऐकायचं नसतं ते त्यासाठीच!

First Published on: September 9, 2018 2:58 AM
Exit mobile version