पोस्ट पेस्ट कंट्रोल !

पोस्ट पेस्ट कंट्रोल !

गेले काही दिवस वातावरण अधिक भयंकर होतंय. खळखळून हसणारे चेहरे विलक्षण दडपणाखाली दिसताय. लहान लेकरं खेळाची मैदानं सोडून भेदरलेल्या, घाबरलेल्या अवस्थेत घरात बसून मोठ्यांच्या ‘कोरोनाचर्चा’ कान देऊन ऐकू लागली आहेत. अतिसूक्ष्म कोरोना विषाणूमुळे संक्रमित होणाऱ्या ह्या आजारास कुणाचीही ‘करुणा’ वगैरे वाटत नाही. स्वच्छतेला मात्र तो घाबरतो बरं! हे स्वच्छता प्रकरण आपल्याकडे विविध ठिकाणी कशा प्रकारे पाळले जाते? हे जगजाहीर आहेच. चौकाचौकातल्या कचराकुंड्या, झाडाझुडुपांना फुटलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, नदीओढ्यांमध्ये पाण्यापेक्षा अधिक वाहणारं निर्माल्य, रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी घाण, पान- तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंतींवर केलेली कलाकारी आणि कित्येक बाबी सांगता येतील. त्याचप्रमाणे आपल्याकडील वैद्यकीय सुविधा आणि प्रकृतीविषयक वैद्यकीय सजगता दोन्हीही प्रकरणं क्लिष्ट आहेत. आजार, व्याधी झाली म्हणजे अजूनही गावठी उपचार करणारी, अंधश्रद्धांवर विसंबून राहणारी भाबडी, अडाणी प्रजा आहेच. तुम्ही म्हणाल, ‘पूर्वी होते खेड्यापाड्यात, वाड्यापाड्यावर गावठी उपचार, बुवाबाबा; पण आता कसलं आलंय हे माहिती तंत्रज्ञानाच्या युगात?’ पण माझा अनुभव तर तुमच्या मताच्या अगदी विपरीत वास्तव सांगतोय. ते हसून सांगावं की रडून तेच कळेना, पण हे चिंतीत करणारं आहे हे निश्चित. तर सांगायचा मुद्दा असा की, खेड्यापाड्यातच नव्हे तर अगदी मोठमोठ्या शहरांमध्ये, शिक्षणाच्या पदव्यांची भली मोठी शेपूट आपल्या नावापुढे मिरवणारी तथाकथित ‘सुशिक्षित’ लोकच अधिक अडाण्यासारखी वागू लागली आहेत. वातानुकूलित खोलीत आरामात बसून विज्ञानाने केलेल्या आधुनिक क्रांतीचे अपत्य असलेल्या नाना प्रसारमाध्यमांतून बुरसटलेल्या विचारांच्या अंधश्रद्धा पसरवण्याच्या स्पर्धेत हे लोक अव्वल असतात. त्यातही लक्षणीय संख्येने ‘महिला भगिनी मोठ्या उत्साहाने पुढे असतात’ खेदाने हा उल्लेख करावा लागतो. हातात जग आलंय म्हटल्यावर ते उलथंपालथं करण्याची जबाबदारी आपलीच समजून कधी एकदा ही ‘ब्रेकिंग न्युज’ विश्वाला देण्याचे श्रेय घेऊ असे काहींना सतत वाटत असते. नवा विनोद, नवा संदेश, नवे संशोधन कुठलीही खातरजमा न करता असंख्य ग्रुपवर विलक्षण झपाटल्यासारख्या ह्या चिकटवत (पेस्ट) सुटतात. त्याचे परिणाम, कुणावर काय होतील? याच्याशी त्यांना कसलेही देणेघेणे कधीच नसते, आणि ते जाणून घेण्याचे स्वारस्यदेखील त्यांना नसते. स्मार्टफोन हाती आला पण माणसं अधिक ‘बधीर’ झाली. आमच्या महिला भगिनी तर वेगाने भावनिक वगैरे होतात आणि कुणातरी मोठ्या माणसाच्या निधनाची खोटी बातमी शेकडो व्हाट्सप समूहांवर चिटकवून त्या अमुक व्यक्तीस ‘जिते जी’ मारून टाकतात. केवढा मोठा हा अनर्थ!
ते ही जाऊ द्या, ‘शासन मोफत लॅपटॉप वाटतंय’ हा संदेशही पहिला लॅपटॉप त्यांना स्वतःलाच मिळाला असल्याच्या अविर्भावात त्या सर्व समूहांवर पुन्हा चिटकवत सूटतात. दुष्काळात झाडं लावायची, जगवायची सोडून, दुष्काळ निवारणाचा मंत्र मोठ्या उत्साहात अत्रतत्र सर्वत्र चिकटवत सुटतात. आवडत्या ‘डेली सोप’ च्या ब्रेकमध्ये वेळात वेळ काढून या माताभगिनी अनाकलनीय भाषेत आलेला मंत्र न वाचता
वाऱ्याच्या वेगालाही लाजवेल अशा जबरदस्त वेगाने कॉपीपेस्ट करत राहतात.
ज्याचा अर्थ त्यांना स्वतःही समजलेला नसतो तरीही वर म्हणतात, ‘दुष्काळ नाहीसा होण्यासाठी एक हजार लोकांची साखळी तयार करा, हा मंत्र पुढे पाठवा आणि नाही पाठवता आला तर मलाच परत पाठवा.’ म्हणजे बघा ज्या मायभगिनींना स्मार्टफोन हाताळायचा कसा? त्यातील फ़ंक्शन्स वापरायची कशी? हे माहिती आहे, म्हणजे त्या अगदीच अज्ञानी, अडाणी म्हणता येणार नाहीत. पण देवादिकांच्या नावाने आलेला संदेश कुठल्यातरी अनामिक भीतीने ह्या पुन्हा सर्व समूहांवर चिटकवत सुटतात.
सध्या आपण सर्वच ‘कोरोनाच्या’ सावटाखाली आहोत. प्रत्येकजण भीती घेऊन वावरतोय. या भयंकर वातावरणातही डॉक्टर व शासनाने सांगितलेल्या दक्षतेपेक्षा ‘तुम्ही एक लाख आठ लोकांची साखळी तयार करु शकत असाल तर हा अमुक-अमुक मंत्र पुढे पाठवा, हे कोरोनाचे संकट कायमचे नाहीसे होईल’ हा उपाय तर वैद्यकशास्त्रालाही बुचकुळ्यात टाकणारा. हा संदेश पाठवणाऱ्यांमध्येही कमाल संख्या महिलाभगिनींचीच अधिक दिसते. कित्येक वर्षे ही मजेशीर तेवढीच दुर्दैवी बाब जवळून बघतेय. असा संदेश पुढे पेस्ट करत सुटणाऱ्या अनेक शिक्षित गृहिणी, उत्तम पदावर नोकरीत असणाऱ्या, निवृत्त झालेल्या, व्यावसायिक अशा महिलाच मोठ्या संख्येने असतात. विशेष म्हणजे आपल्या निवृत्त झालेल्या प्राचार्या मॅडमकडून असा संदेश जेव्हा आपल्याला वारंवार येतो तेव्हा होणारे दुःख-राग-संताप कसा व्यक्त करावा समजत नाहीये, असो!
आणखी एक ताजी गंमत, 22 मार्च रोजी घडलेल्या ‘टाळी-थाळी’ वादनाची. संचारबंदी असताना या कठीण काळातही आपल्याला तातडीची सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला सायंकाळी पाच वाजता पाच मिनिटे टाळ्या वाजवायच्या होत्या हे रास्तच! मग सुजाण, सजग व्यक्तींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत घराबाहेर येऊन काही मिनिटे टाळ्या वाजवल्या आणि पुन्हा घरात गेले. परंतु इतरांनी मात्र थाळ्या-पराती, ढोल-ताशा, डमरू, शंख वाजवत मिरवणुकी काढणे, गरबा खेळणे हे भयावह प्रकार केले. ते प्रसारमाध्यमांतून आख्ख्या जगाने बघितले आहेतच. शासनाचा मूळ हेतू त्याचे गांभीर्यच नष्ट करणारा हा हुल्लडबाजी उन्माद होता. ह्या घडल्या प्रकारासही ‘कॉपीपेस्ट’ व्हाट्सप विद्यापीठातील संदेश कारणीभूत ठरले हे विचारांती लक्षात येते. ‘पाच वाजता नवीन कपडे घालून बाहेर या आणि अमुक वाद्यांचा मोठ्ठा आवाज करा म्हणजे हवेत अगणित ध्वनीकंपनं निर्माण होतील. त्यामुळे सूक्ष्म जीवाणू-विषाणू नष्ट होतात, म्हणजे कोरोना नष्ट होईल वगैरे’ असल्या मेंदूला झिणझिण्या आणणाऱ्या चुकीच्या गोष्टी मोठ्या प्रमाणात दोन-तीन दिवसात पसरवल्या गेल्या. आवर्जून सांगावेसे वाटते की, ‘कंपनं कोरोना विषाणू मारते’ अशा प्रकारचे मला व्यक्तिगत आलेले व माझ्या विविध व्हाट्सप समूहांवर आलेले सर्व संदेश हे महिलांकडून पाठवलेले होते. विचार न करता, भावनिक होत उगाच काहीतरी भ्रम-अफवा पसरवण्यात भारतीय सर्वात पुढे, त्यातही आमच्या महिलांचे विशेष योगदान दिसते. बरं, न राहवून एकीला म्हणाले, ‘बाई गं, हा मंत्राचा संदेश पुढे लोटण्यापेक्षा कोरोनाची लागण होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी असा काही संदेश पुढे पाठव नेट आणि वेळही सत्कारणी लागेल’ तर ती मलाच ‘देशद्रोही’ म्हणून मोकळी झाली. एकीला म्हणाले, ‘ताई, तुम्ही सहकुटुंब थाळ्या बडवून ध्वनिप्रदूषण करण्यापेक्षा आपण सर्व मिळून एका तालात सामूहिक टाळ्या वाजवू या म्हणजे ऐकायलाही बरे वाटेल व कृतज्ञातही व्यक्त होईल’, त्यावर त्यांनी माझ्या ‘भारतीय’ असण्यावरच शंका उपस्थित केली. देशासाठी तुम्ही आवाजही सहन करू शकत नाही का? असं म्हणत त्या सहकुटुंब पंधरा-वीस मिनिटं भयंकर जोशात थाळी बडवून देशप्रेम व्यक्त करीत होत्या.


अर्थात या वृत्तीशी सतत लढावे लागणार आहे, प्रयत्न सोडणार नाहीच. पुराणवादी मानसिकतेचा गुलाम असणारा आपला समाज आहे. त्यातही सर्व प्रकारच्या अंधश्रध्दा, जाचक प्रथा, भेदाभेद, विषमता ह्या बहुतांशी इथल्या महिलावर्गानेच लाडाकोडात वाढवल्या आहेत, जोपासल्या आहेत. ज्या त्यांना काळाप्रमाणे अद्ययावत होऊच देत नाहीये, उत्तरोत्तर अधिक जीर्ण, जुनं करत जाताय. मानसिक गुलामगिरी अन्य कोणत्याही गुलामगिरीपेक्षा घातक असते हे इथल्या खूप मोठ्या वर्गास समजूनच घ्यायचे नाही ही अनुभूती घेतेय.
म्हणूनच मेंदू व विचारशक्तीस अजिबात त्रास न देता मोबाईलवर आलेली पोस्ट पेस्ट करत जाणाऱ्यांचं ‘पेस्ट कंट्रोल’ करणं अतिशय गरजेचं वाटतं. कितीतरी हल्ले, दंगली, अत्याचार, देवदेवतांच्या, महापुरुषांच्या विटंबना, अपघात याबद्दल अराजक निर्माण करणाऱ्या, सांप्रदायिक भावना भडकविणाऱ्या कितीतरी प्रक्षोभक बाबी, संदेश सावज शोधत असतात. संगणकीय संस्कार केलेली खोटी चित्रं प्रसारित करणाऱ्या अनेक समाजविघातक टोळ्याही आहेत, ज्या स्वतःच्या ज्ञानाचा विधायक वापर न करता मानवी समूह अस्वस्थ ठेवणारी कृती करतात. त्यांच्या या जाळ्यात कित्येक एकांगी विचार करणारे शहानिशा न करता बळी पडतात. त्यामुळे न भरून येणारे सामाजिक नुकसान तर होतेच, शिवाय व्यक्तिगत ‘कॉपीपेस्ट’वाल्यांवर पोलिसी केसेसही झालेल्या आहेत, समाजासमोर मारहाण झालीय आणि माफी पण मागावी लागलेली आहे. तेव्हा आपल्या एका चुकीमुळे सभोवताल अनपेक्षित संकटात तर येणार नाही नं? याचा विचार करणे वर्तमानात प्रत्येकास गरजेचे वाटले पाहिजे.
श्रद्धा असावी पण आंधळी, घात करणारी श्रद्धा बाळगणं म्हणजे ‘जिवंत बॉम्ब’ बाळगण्यासारखे आहे. आधुनिक प्रसारमाध्यमांत संदेश, प्रतिमा पुढे ढकलण्याऐवजी दोन वेळा विचार करा, खात्री करा, नाहीतर अनर्थ ओढवू शकतो. विशेषतः आज तंत्रज्ञानाच्या युगात ‘गुगल’ हाताशी असताना बातमीची खात्री न करता, कुठलेच तर्क न लावता आंधळेपणाने आपण बळी कसे पडतो बरं? ‘माकडाच्या हाती कोलीत’ असं तर होत नाहीये ना? हा विचार करणे हिताचे ठरेल. व्यक्ती मनोरंजनास चटावलेल्या आहेत हल्ली. वाचन नाही, प्रबोधन नाही, ऐकणं नाही आणि समजून घेणे तरी नाहीच नाही. कुणी समजावून सांगू लागलं तर ‘अहं’ धिंगाणा घालतोच अनेकांच्या डोक्यात. मला तर वाटते की, कुणी स्वतःची चूक लक्षात आणून देत असेल ना तर त्याहून मोठा आनंद नाही. अन्यथा ती चूक तशीच आपल्याबरोबर मोठी होत जाते, अन डोंगराएवढी होत गेली की परत मागे फिरणे कठीण होते.
आपले समज आणि मान्यता काळानुसार संस्कारित व्हायला हव्यात. मागे वळून मानवी इतिहास बघितला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की, कोणतीही विपरीत परिस्थिती जेव्हा जेव्हा उदभवली आहे तेव्हा तेव्हा माणसालाच पाय घट्ट रोवून ठामपणे लढावे लागले आहे. कोणतीही चमत्कारिक शक्ती नाही आणि नसते. तेव्हा कोणत्याही फसव्या संदेशास भुलू नका. ‘आली पोस्ट की कर पेस्ट’ ह्या वृत्तीस आवरा. एकूणच ‘पोस्ट पेस्ट कंट्रोल’ आज अत्यावश्यक आहे आणि सर्वांच्या हिताचेही आहे.
म्हणून म्हणते, दादाबाबांनो आणि विशेष करून ‘माझ्या तायाबायांनो’, मग करणार नं हे ‘पोस्ट पेस्ट कंट्रोल’ ?

डॉ.प्रतिभा जाधव
(लेखिका वक्त्या, साहित्यिक, एकपात्री कलाकार आहेत)

First Published on: March 26, 2020 10:49 PM
Exit mobile version