ऋतूचर्या : व्याधींचा प्रतिबंध

ऋतूचर्या : व्याधींचा प्रतिबंध

Ayurveda

आपण मागील लेखात आरोग्यरुपी धनसंपदेचे रक्षण करणार्‍या दिनचर्येेचे महत्त्व जाणून घेतले. आजच्या लेखात आपण आयुर्वेदाने आरोग्यरक्षणासाठी मार्गदर्शन केलेल्या ऋतूचर्येची माहिती घेणार आहोत. आयुर्वेदाने शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत असे सहा ऋतू मानले आहेत. सर्वसाधारणपणे इंग्लिश व मराठी महिन्याचा विचार करता चैत्र-वैशाख महिन्यांचा (मार्च – एप्रिल) वसंत ऋतूत, ज्येष्ठ-आषाढ महिन्यांचा (मे-जून) ग्रीष्म ऋतूत, श्रावण व भाद्रपद महिन्यांचा (जुलै-ऑगस्ट) वर्षा ऋतूत, आश्विन व कार्तिक महिन्यांचा (सप्टेंबर- ऑक्टोबर)शरद ऋतूत, मार्गशीर्ष-पौष महिन्यांचा (नोव्हेंबर-डिसेंबर) हेमंत ऋतूत व माघ – फाल्गुन महिन्यांचा (जानेवारी – फेब्रुवारी) शिशिर ऋतूत समावेश होतो.

सर्वप्रथम आपण ऋतूराज अशा वसंत ऋतूचर्येविषयी जाणून घेऊ. वसंत ऋतूत आंबा-पळस इ. वृक्षांना फुटलेली पालवी, कोकिळेचे सुमधूर कूजन, बहरलेली फुलराजी यामुळे सर्व वातावरण आल्हाददायक असते. परंतु शिशिर ऋतूतील शीत गुणाने संचित झालेला कफ वसंत ऋतूतील उष्ण अशा सूर्यकिरणांनी पातळ होतो व सर्दी, खोकला, दमा यासारखे अनेक विकार उत्पन्न करतो. यापासून प्रतिकार करण्यासाठी कफशमन करणार्‍या आहार-विहार व औषधांचा वापर वसंत ऋतूत करावा. मुख हे कफदोषाचे स्थान असल्याने तोंंडातील कफाचा चिकटा निघून जावा यासाठी सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात. अर्धशक्ती व्यायाम करून त्रिफळा किंवा निंबाच्या वस्त्रगाळ चूर्णाचे उटणे लावून सुखोष्ण जलाने स्नान करावे.

आहारात प्रामुख्याने कफनाशक कडू, तिखट व तुरट चवीच्या पदार्थांचा समावेश करावा. आहारात विशेषत: पडवळ, मेथी, कारले या भाज्या, सुंठ, मिरी, लसूण, मध व पचण्यास हलके पदार्थ (मुगाच्या डाळीची खिचडी इ.) असावेत. सुंठ घालून पाणी किंवा कोमट पाणी घ्यावे. आहारात प्राधान्याने स्निग्ध व शीत पदार्थ, आंबट व मधूर रसाचे पदार्थ टाळावे. पचण्यास जड असा आहार वर्ज्य करावा. दिवसा झोपणे टाळावे. या ऋतूतील कफदोषामुळे उद्भवणार्‍या आजारांसाठी वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली पंंचकर्मापैकी वमन (औषधी चाटण व काढ्याच्या मदतीने उलटी करविणे) ही चिकित्सा फलदायी ठरते.
यानंतर आगमन होते ते रणरणत्या ग्रीष्म ऋतूचे! या ऋतूत कडक उन्हामुळे जमिनीवरील ओलाव्याचे व मनुष्य शरीरातील कफाचे प्रमाण कमी होत जाते. वायूची रुक्षता वाढण्यास सुरुवात होते. पर्यायाने शरीरातील स्निग्धांशांचे शोषण होण्यास सुरुवात होते. शरीरातील जलीय अंश टिकवण्यासाठी आहारात मधूर रसाच्या, शीत व पचण्यास हलक्या अशा पदार्थांचा समावेश करावा. तोंडाची कोरड कमी करण्यासाठी फ्रिजमधील पाण्याऐवजी वाळामिश्रित माठातील पाणी प्यावे. गोड-आबंट चवीचे डाळिंब, द्राक्ष-सफरचंद असे फळांचे रस, लिंबू सरबत, कोकम सरबत, वाळा सरबत, शहाळ्याचे पाणी, कोकमाचे सार, लाह्यांचे सूप, मुगाचे कढण, गोड ताक असे द्रवपदार्थ आहारात अधिक असावेत. तर मांसाहारी व्यक्तींनी मांसरस (चिकन सूप, मटण सूप) सेवन करावेत. जेवणात कोबी, बीट, पांढरा कांदा यांच्या कोशिंबीरी, तर आवळा, कोकम, कवठ, कैरी यांच्या चटण्या घ्याव्यात.

श्रीखंड, आमरस (तूप व मिरपूड घालून), नारळी पाक, कोहळ्याच्या वड्या यांचा आस्वाद घ्यावा. फळांचा राजा असणार्‍या गोड व पिकलेल्या आंब्याचा आस्वाद घ्यावा.अतिशय खारट, तिखट पदार्थ वर्ज्य करावे. हरभरा, पावटा, चवळी यासारखे वातूळ पदार्थ तसेच तीळ, कुळीथ यासारखे उष्ण पदार्थ टाळावेत. मिसळ, पावभाजी यासारखे जळजळ उत्पन्न करणारे पदार्थ खाऊ नयेत. वेफर्स, बटर, चीज सारखे खारट रस प्राधान्य असणारे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत. अतिशीत पेये टाळावीत अन्यथा सर्दी, पडसे निर्माण होते. दुपारी उन्हात फिरू नये व बाहेर जावे लागलेच तर टोपी, गॉगल यांनी डोक्याचे व डोळ्यांचे रक्षण करावे.

ग्रीष्म ऋतूतील तप्त उन्हाचा दाह कमी करण्यासाठी कोमट पाण्याने स्नान करावे. अति गरम पाण्याने स्नान करू नये. सुती वस्त्रे परिधान करावीत. दिवसा जेवल्यानंतर झोपणे आयुर्वेदाने निषिद्ध मानले आहे. अपवाद आहे फक्त ग्रीष्म ऋतूचा ! या काळात अति शारीरिक दगदग टाळावी. उन्हात फिरू नये. रात्री जागरण करू नये. क्रोधावर नियंत्रण ठेवून मन शांत व प्रसन्न ठेवावे.रणरणत्या ग्रीष्म ऋतूनंतर ऋतू हिरवा,ऋतू बरवाअशा वर्षा ऋतूचे आगमन होते. वर्षा ऋतूची व इतर ऋतूंची परिचर्या आपण पाहणार आहोत पुढील लेखात!

वैद्य स. प्र. सरदेशमुख

(लेखक इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे या संस्थेचे संचालक आहेत.)

First Published on: March 10, 2019 4:59 AM
Exit mobile version