‘पुणे ५२’ : मराठीतील पाथब्रेकिंग ‘निओ- न्वार’पट

‘पुणे ५२’ : मराठीतील पाथब्रेकिंग ‘निओ- न्वार’पट

अमर आपटे (गिरीश कुलकर्णी) हा कामाच्या वेगळेपणामुळे नेहमी पैशांच्या चणचणीत असणारा एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. त्याची सर्व काही समजून घेणारी तरीही, काय ही नुसती कटकट करतेय, असं वाटायला लावणारी बायको म्हणजे प्राची (सोनाली कुलकर्णी). नव्याने हाती आलेल्या एका केसच्या निमित्ताने त्याच्या संपर्कात येणार्‍या नेहा (सई ताम्हणकर) आणि तिचा पती प्रसाद साठे (किरण करमरकर) यांच्यामुळे त्याचं आयुष्य कसं बदलून जातं याची गोष्ट म्हणजे ‘पुणे 52’.
नव्वदच्या दशकाच्या पूर्वार्धात घडणार्‍या कथेच्या अनुषंगाने हा चित्रपट या दशकात अवतीभोवती घडणारे बदल समंजसपणे टिपतो. त्यानिमित्ताने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत तत्कालीन सामाजिक परिस्थितीत होणारे परिवर्तनही टिपले जाते. मध्यवर्ती पात्र खाजगी गुप्तहेर असल्याने चित्रपटात रहस्याचा कोन असणं ओघानेच आलं. मात्र चित्रपट केवळ तेवढं एकच उद्दिष्ट समोर ठेवून पुढे जात नसल्याने पात्रांचे एकमेकांशी असलेले संबंध, ती समोरासमोर आल्यावर घडणार्‍या घटना आणि त्यांच्यात रंगणारे बुद्धिबळवजा खेळ या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम आपल्यासमोर येतो.

चित्रपट या माध्यमात काहीवेळा दृश्य भाषा ही कथेहून अधिक महत्त्वाची ठरून खोलवर जाऊन परिणाम करत असते. उदाहरणार्थ, ‘बिकिनी ब्ल्यू’ नामक एका पोस्ट वॉर रहस्य चित्रपटातही त्यातील रंगसंगती आणि छायाचित्रण या गोष्टी मूळ कथेहून अधिक सुंदर होत्या. ‘पुणे ५२’मध्ये चांगल्या कथेला तितक्याच चांगल्या पद्धतीने समोर आणल्याने उत्तम परिणाम साधला जातो. १९९२ चं वर्ष उभं करताना गडद पिवळसर छटा असलेलं वातावरण निर्मिती केली जाते. ज्यामागील मुख्य कारण त्याकाळी वापरण्यात येणारे बल्ब्स जरी असलं तरी पूर्ण चित्रपटभर तसं टेक्श्चर जपणं, त्याचं वास्तववादी पार्श्वभूमीवरील चित्रण या बाबी उल्लेखनीय ठरतात. या गडद छटांचं चित्रपटभर असलेलं अस्तित्त्व त्यातील संशयी, ‘निओ-न्वार’ वातावरणाला पूरक ठरतं. ज्यामुळे चित्रपटातील दृश्यं अंगावर येतात. अमर आपटेच्या मानसिक स्थितीनुसार कॅमेर्‍याच्या स्थिर वा हलत्या असण्यात केलेले बदल असोत वा पात्रांच्या कृतींमुळे स्वभावात होणारे बदल असोत, सर्वच गोष्टींमध्ये दिग्दर्शक निखिल महाजनची या माध्यमाची जाण दिसून येते. सिनेमॅटोग्राफर जेरेमी रिगनचा कॅमेरा अगदी लहानसहान गोष्टीही टिपतो. हा चित्रपट म्हणजे काही रूढ अर्थाने थ्रिलर या प्रकारात मोडणारा चित्रपट नाही. त्यात मुख्य पात्र जरी हेर असलं तरी अवास्तव कल्पना असलेल्या साहसी मोहिमा यात नाहीत. ज्यांचा अभाव असणंच खरंतर चित्रपटाच्या वास्तविकतेचा स्पर्श जाणवणार्‍या विश्व निर्मितीला सहाय्यक ठरतं. त्यामुळे एखाद्या गुप्तहेरपटाला शोभेल असा पे-ऑफ असलेला, खिळवून ठेवणारा चेस सिक्वेन्सचा समावेश असलेला शेवट नसला तरीही त्यातील छोटेखानी सेटिंग आणि रूपकात्मक चित्रणाला साजेसा शेवट जरूर आहे.

चित्रपटात घडणार्‍या बहुतांशी सर्वच गोष्टी या हेतूपुरस्सर करण्यात आलेल्या आहेत. ज्यात त्याची गती संथ असणंही आलंच. त्यामुळे त्याच्या स्लो पेस्ड असण्याचं कारण देत त्यातील सिनेमॅटिक मूल्यं आणि ब्रिलियन्सी नाकारणं चुकीचं आहे. चित्रपटाला आणि त्याच्या निर्मात्यांना त्याचं स्लो पेस्ड असणं मान्य आहे. कारण ती या चित्रपटाची गरज आहे. ‘पुणे 52’ हा इतर कशाहीपेक्षा त्याच्या क्राफ्टकरिता अप्रिशिएट करणं गरजेचं आहे. शिवाय तांत्रिकदृष्ठ्या सजग असा सिनेमा आपल्याकडे खचितच बनतो. त्यामुळे किमान त्यासाठी तरी त्याची दखल घेणे गरजेचे आहे. बाकी चांगला चित्रपट कालांतराने त्याचा स्वतःचा असा प्रेक्षक वर्ग निर्माण करतोच. याही चित्रपटाने ऑनलाईन माध्यमांत त्याची सुरुवात केली आहेच. मात्र तो इतरही लोकांपर्यंत पोचायला हवा. अलीकडे अधिकाधिक प्रयोगशील होत जाणार्‍या मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाच्या निमित्ताने एक धाडसी प्रयोग दिसून आला होता. त्यामुळे जर असे प्रयोग दिसून येत आहेत तर प्रेक्षकांनीही आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला हवे.

First Published on: September 7, 2018 3:00 AM
Exit mobile version