प्यासा हळुवार मनाची घुसमट

प्यासा हळुवार मनाची घुसमट

प्यासा

‘प्यासा’ हा त्याच्या नायकाप्रमाणेच चित्रपटकर्त्यांच्या जगाकडे पाहण्याच्या निराशावादी दृष्टिकोनातून साकारला गेलेला आहे. कलाकाराची अभिव्यक्ती, शून्यवाद आणि समाजातील बहुतांशी घटकांमध्ये आढळणारा भौतिकवाद या गोष्टी (आणि त्यांची चिकित्सा) ‘प्यासा’च्या महत्त्वपूर्ण संकल्पनांमध्ये मोडतात. नायक विजयचा रोमँटिक दृष्टिकोन, काव्यात्म अभिव्यक्ती ही भौतिकवादी विचार करणार्‍या जगाच्या कामाची नाही.

गुरुदत्तच्या ‘प्यासा’मध्ये वरवर पाहता दिसणार्‍या जीवनातील एक विस्तृत काळ अपयशी असणार्‍या कवीच्या प्रेमकथेच्या पलीकडेही अनेक महत्त्वाच्या संकल्पना आढळून येतात. चित्रपटाचा नायक विजय (गुरुदत्त) हा केवळ एक अपयशी कवी किंवा अधिक विस्तृत दृष्टिकोनातून पहायचं झाल्यास एक अपयशी कलाकारच नाही, तर तो त्याच्या सभोवतालाचं, तो ज्या काळात जगतो आहे त्या काळाचं आणि त्याच्या आयुष्यातील अनुभवांचा परिपाक म्हणता येईलशी एक व्यक्ती आहे. तो पहिल्यांदा पडद्यावर दिसतो तो नदीकिनारी मनातल्या मनात कविता तयार करत ती गुणगुणत पहुडलेला असताना. तो ज्या निसर्गाचं वर्णन करतोय त्या सभोवतालात फुलांवर भिरभिरत असणार्‍या भुंग्यावर कुणीतरी पाय देऊन निघून जातं. नितांतसुंदर काव्य आणि लेखन, परिणामकारक दिग्दर्शन, न्यूनतम तरीही प्रभावी आणि रूपकात्मक छायाचित्रण अशी चित्रपट माध्यमातील महत्त्वाची अंगं इथे एकत्रितपणे कार्य करून एका उत्तम ओपनिंग सीक्वेन्सची निर्मिती करतात.

केवळ या एका दृश्याचं निरीक्षण केलं तरी चित्रपटाच्या पुढील वाटचालीची, आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे विजय या पात्राच्या विचारसरणीची कल्पना येऊ शकते. इथे भुंग्यावर पाय पडल्याचं पाहून अस्वस्थ झालेला विजय त्या व्यक्तीच्या मागे जातो. काही पावलं चालल्यावर क्षणभर थांबतो, आणि जणू भावनांच्या बळावर न चालणार्‍या या जगाचं उत्पादन असलेल्या त्या व्यक्तीला आपल्या म्हणण्याची किंमत कळणार नाही अशा प्रकारचा विचार करत मागे फिरतो. विजयचा रोमँटिक दृष्टिकोन, काव्यात्म अभिव्यक्ती ही भौतिकवादी विचार करणार्‍या जगाच्या कामाची नाही. त्याचा हा रोमँटिसिझम जगाच्या दृष्टीने अतर्क्य आहे, तर जगाचे नियमही त्याच्या दृष्टीने अतर्क्य आणि जाचक आहेत.

विजय केवळ काव्यात्म अनुभूती निर्माण करण्यावर भर देणारा नाही. त्यामुळेच पुढच्याच दृश्यात तो जेव्हा त्याच्या कविता ज्याच्याकडे सुपूर्द केल्या आहेत त्या संपादकाकडे जातो, तेव्हा तो संपादक बेरोजगारी, उपासमारीसारख्या बाबींना संबोधणार्‍या त्याच्या कविता म्हणजे कविताच नाहीत अशा शब्दात त्याची अवहेलना करतो. एकीकडे हे जग विजयला त्याच्या रोमँटिक कल्पनांतून खर्‍या विश्वातील समस्या, वास्तविकतेकडे आणते, तर दुसरीकडे हेच जग त्याच्या कलाकृतीत प्रतिबिंबित होणार्‍या वास्तवाचा निषेध करत त्याच्याकडून ‘नजाकत’ असलेल्या मधाळ कल्पनांनी समृद्ध असलेल्या काव्याची मागणी करतं. पात्रं आणि दृश्यांतील विरोधाभास ही ‘प्यासा’मधील एक महत्त्वाची संकल्पना आहे. जगातील हाच विरोधाभास आणि दांभिक दृष्टिकोन चित्रपटाचं कथानक जसजसं पुढे सरकत जातं, तसा अधिक स्पष्ट होत जातो. विजयची पूर्वाश्रमीची प्रेयसी, मीना (माला सिन्हा), तिचा पती आणि पुढे जाऊन विजय ज्याच्याकडे काम करू लागतो तो मि. घोष (रहमान), श्याम (श्याम कपूर), त्याचे भाऊ (मेहमूद आणि राधेश्याम) हे लोक जगातील दांभिकतेचं प्रतिनिधित्व करतात. या पात्रांना भौतिक संपत्तीच्या हव्यासापोटी गोष्टींच्या योग्य-अयोग्य असण्याचा जणू विसर पडतो.

अब्दुल सत्तार (जॉनी वॉकर) हा तेल मालिशचा व्यवसाय करणारा विजयचा मित्र त्यामानाने रूढ अर्थाने भौतिकवादीही नाही, किंवा निराशावादीदेखील नाही. तो स्वतःच्या उदरनिर्वाहापुरतं काम करणारा आहे. तो विजयने लिहिलेलं ‘सर जो तेरा चकराये’ हे गाणं म्हणत आपल्या कामाशी काम बाळगतो. तो श्यामच्या विरुद्ध स्वभावाचा, विजयशी असलेल्या मैत्रीचं नातं कुठल्याही प्रकारच्या अपेक्षांविना अबाधित राखणारा आहे. स्वार्थी पात्रांनी परिपूर्ण असणार्‍या कथानकात त्याच्या निःस्वार्थी स्वभावाला अधिक महत्त्व आहे.

दरम्यानच्या काळात अनायासेच विजयच्या आयुष्यात आलेली वेश्या गुलाबो (वहिदा रेहमान) मात्र त्याच्या आयुष्यातील इतर माणसं बाळगून असणार्‍या भौतिकवादापासून अलिप्त आहे. त्याला ओळखतही नसताना त्याच्या कवितांच्या प्रेमात पडलेली गुलाबो कालांतराने त्याच्या प्रेमात पडलेली आहे. त्याच्या अंतर्मनातील अस्वस्थता, त्याच्या शून्यवादाच्या मुळाची व्युत्पत्ती कशी झाली हे ती ओळखून आहे. त्यामुळेच चित्रपटाच्या शेवटाकडे जात असताना विजय जेव्हा आपली ओळख नाकारतो, तेव्हा भौतिक सुखांचा विचार करता आपणहून चालून आलेलं यश आणि संपत्ती नाकारण्याची ही कृती मीनाच्या दृष्टीने अतार्किक ठरते. मात्र, हाच विजय जेव्हा जगापासून दूर जात असताना शेवटचं म्हणून गुलाबोला भेटायला येतो तेव्हा तिला मात्र त्याची ही कृती अतर्क्य वाटत नाही. मुळात तीदेखील तिच्यावर लादल्या गेलेल्या वेश्या या संज्ञेमुळे पिसली गेलेली असल्याने या सगळ्या गोष्टींपासून दूर जाण्याच्या प्रयत्नांत आहे. दोघांची विश्वं, दोघांच्या समस्या निराळ्या असल्या तरी ते दोघेही एकप्रकारे समदुःखी आहेत. त्या दोघांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांना जोडणारा दुवा आहे. ते दोघेही एकमेकांना पूर्ण करतात. त्यामुळेच त्यांना शेवटी एकमेकांच्या साथीने जगापासून दूर जाता येणं शक्य होतं.

‘प्यासा’ हा त्याच्या नायकाप्रमाणेच सदर चित्रपटकर्त्यांच्या जगाकडे पाहण्याच्या निराशावादी दृष्टिकोनातून साकारला गेलेला आहे. कलाकाराची अभिव्यक्ती, शून्यवाद आणि समाजातील बहुतांशी घटकांमध्ये आढळणारा भौतिकवाद या गोष्टी (आणि त्यांची चिकित्सा) ‘प्यासा’च्या महत्त्वपूर्ण संकल्पनांमध्ये मोडतात. अर्थातच शोकांतिक रीतीने जगणार्‍या मुख्य पात्राचं एक कलाकार असणं, आणि त्याच्या अभिव्यक्तीच्या स्वरूपाबाबत समाजात असलेली उदासीनता या गोष्टीमुळे चित्रपटाला एक विशिष्ट असा निराशावादी दृष्टिकोन प्राप्त होतो. चित्रपटातील अनेक दृश्यं, पात्रांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया लेखक अब्रार अल्वी, दिग्दर्शक गुरुदत्त आणि गीतकार साहिर लुधियानवी यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांची निर्मिती आहे. शिवाय, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारतातील परिस्थितीदेखील त्यातील पात्रांच्या सभोवतालावर आणि त्यांच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर परिणाम टाकते.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातील अंतर्गत परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा असतानाही प्रत्यक्षात मात्र बेरोजगारी, गरिबीसारख्या समस्या प्रकर्षाने जाणवत असणं चित्रपटकर्त्यांवर प्रभाव टाकणारं असल्याने विजयच्या व्यक्तिमत्त्वातही याच्या छटा दिसून येतात. साहिर लुधियानवी लिखित ‘जिन्हें नाज हैं हिन्द पर वो कहाँ हैं’ किंवा ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या हैं’ असे बोल असलेली गीतंदेखील या सर्व बाबींचा परिणाम म्हणून समोर येतात. अर्थात या बाह्य घटकांच्या माहितीशिवायही चित्रपटाच्या अंतर्गत पातळीवर या बाबी प्रभावी ठरतात हे त्याच्या उत्तम चित्रपट असण्याचं द्योतक आहे.

‘प्यासा’ हा त्यातील खोल आशय असलेल्या संकल्पनांचा समावेश, त्या संकल्पनांची दृकश्राव्य स्वरूपावर सूक्ष्म निरीक्षणं आणि रूपकांच्या माध्यमातून केलेली मांडणी या गोष्टींमुळे महत्त्वाचा ठरतो. याखेरीज त्यातील एस. डी. बर्मन यांचं संगीत, मोहम्मद रफी, गीता दत्त, हेमंत कुमार या त्रयीचे आवाज आणि साहिरच्या शब्दांच्या संगमातून मिळणारी एक समृद्ध सांगीतिक अनुभूती त्याला नवीन आयाम प्राप्त करून देते. खोल आशय-विषय, नेटकं आणि प्रभावी छायाचित्रण आणि सुरेख संगीत या सर्व गोष्टी गुरुदत्तच्या इतरही चित्रपटांमध्ये अस्तित्त्वात असल्या तरी ‘प्यासा’मध्ये त्यांचा होणारा एकत्रित परिणाम हा अधिक परिपूर्ण आहे, एवढं मात्र नक्की.

First Published on: April 21, 2019 4:19 AM
Exit mobile version