राज ठाकरे यांच्या राजकारणाची दशा आणि दिशा !

राज ठाकरे यांच्या राजकारणाची  दशा आणि दिशा !

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसदार कोण, तर राज ठाकरे असे शिवसैनिकांच्या मनात निश्चित झालेले होते. कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसैनिकांंना हवे असलेले हुबेहुब बाळासाहेब त्यांना राज यांच्यामध्ये दिसत होते. बाळासाहेबांसारखेच दिसणे, तसेच हावभाव, तसाच भारदस्त आवाज, तसाच आवेश अशा सगळ्या गोष्टी राज यांच्यामध्ये होत्या. राज यांची राजकीय घडण बाळासाहेबांच्या छत्रछायेखाली झालेली होती. राजकारणाचे बाळकडू त्यांनी बाळासाहेबांकडूनच घेतलेले होते. बाळासाहेबांनंतर आपणच असे राज ठाकरे यांनाही वाटत होते. पण आयुष्य कधी आणि कोणते वळण घेईल, याचा बरेच वेळा तर्क करता येत नाही. काही तरी सगळ्यांच्याच कल्पनेच्या पलीकडचे घडते. त्याला सामोरे जाताना मग बर्‍याच गोष्टी घडण्यापेक्षा बिघडतात.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी राज ठाकरे असे समीकरण ठरलेले असताना अचानक अंत:पुरातून अशी काही चक्रे फिरली आणि राज यांच्या मनसुब्यांवर वीज कोसळली. बाळासाहेबांनी आपला उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव निश्चित केले. त्यामुळे राज नाराज झाले. पुढे शिवसेनेत राहून राज यांचे महत्त्व कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यातूनच मग राज यांनी शिवसेनेत आपली घुसमट होत आहे. माझा राग विठ्ठलावर नाही.आजूबाजूच्या बडव्यांवर आहे, अशा भावना बाळासाहेबांविषयी व्यक्त करून राज यांनी बाहेरचा रस्ता धरला. शिवसेनेचा त्याग करून त्यांनी 9 मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. शिवाजी पार्कवर जशी शिवसेनेची पहिली सभा झाली होती. त्याच थाटात राज यांनी महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी शिवाजी पार्कवर पक्षाची पहिली सभा घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आणि मी महाराष्ट्राच्या सेवेसाठी स्वत:ला वाहून घेत आहे, असे जाहीर केले.

बाळासाहेबांच्या नंतर राज असे समीकरण निश्चित झालेले असताना त्यांना अचानकपणे डावलण्यात आल्यामुळे राज यांना मानणारा शिवसैनिक दुखावला गेला. त्यांनी राज यांच्यासोबत नव्या पक्षात प्रवेश करून त्यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचंड मेळावा झाला. त्यावेळी राज ठाकरे यांचा हा पक्ष महाराष्ट्रावर आपला प्रभाव निर्माण करून शिवसेनेला मागे सारणार असे वाटत होते. पुढील काळात शिवसेनेत मोठी फूट पडून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मनसेमध्ये येतील, असे वाटत होते. मनसेने सुरुवातीच्या काळात इतकी उचल खाल्ली होती की, शरद पवारांसारखे राजकीय दिग्गजही थक्क झाले होते. राज ठाकरे जनहिताच्या प्रश्नांने थेट हात घालत असत. त्यानंतर शिवसेनेला जाग येत असे, त्यामुळे मनसे हे शिवसेनेचे इंजिन आहे, अशी उपरोधिक टीका होऊ लागली होती.

मनसेच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले. काही महापालिकांमध्ये नगरसेवकही निवडून आले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नवा आत्मविश्वास निर्माण झाला. आपल्या हातात पूर्ण सत्ता द्या, मी महाराष्ट्राचे नवनिर्माण करून दाखवतो, असे ते आपल्या भाषणांमधून जनतेला सांगू लागले. त्यावेळी त्यांनी गुजरातचा दौरा केला. तेव्हा गुजरातच्या विकासाचा डंका सर्वत्र गाजत होता. मोदींकडे गुजरातची एकहाती सत्ता असल्यामुळे त्यांना वेगाने विकास करता आला. त्यामुळे आपल्या पक्षाला एकहाती सत्ता द्या आणि मग पहा मी महाराष्ट्राचा विकास कसा घडवतो ते, असे राज म्हणू लागले. महाराष्ट्रात शिवसेना नाही, तर मनसे हाच मुख्य पक्ष आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनीही थेट आपल्याशी चर्चा करावी, असे राज यांना वाटू लागले होते. याच काळात ते मोदींची भरभरून स्तुती करत असत. मोदी हे पुढे येणारे नेते आहेत, याची चुणूक राज यांना लागलेली होती. त्यामुळेच त्यांनी आगामी काळाची तयारी करून मोदींची भलामण करायला सुरुवात केली होती, पण पुढे परिस्थिती बदलली. मनसेला उतरती कळा लागली. त्यानंतर मात्र राज हे मोदींचे कडवे टीकाकार झाले.

राज ठाकरे यांच्या पक्षाची सुरुवात जोरदार झाली होती, पण स्थापनेच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र त्याला तो जोर टिकवता आला नाही. राज ठाकरे यांच्या सभांना तर प्रचंड गर्दी जमत असे, पण निवडणुकीत मात्र मतदार त्यांना प्रतिसाद देईनासा झाला. त्यामुळे त्यांच्या निवडून येणार्‍या उमेदवारांची संख्या झपाट्याने ओसरू लागली. राज ठाकरे मोठमोठ्या घोषणा करत असत, पण लहानतोंडी मोठा घास अशीच त्यांची अवस्था होऊन बसली. २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात तर त्यांनी अशी घोषणा केली होती की, माझ्या पक्षाचे निवडणूक आलेले खासदार नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी बाहेरून पाठिंबा देतील. पण पुढे घडले काही भलतेच. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या सगळ्या उमेदवारांची डिपॉझिट्स जप्त झाली. राज्यात त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही मनसेच्या सगळ्या उमेदवारांची डिपॉझिट्स जप्त झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे आपण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहोत, असे जाहीर केले. पण काही दिवसातच, निवडणुका लढवणे हे ठाकर्‍यांच्या जीन्समध्ये नाही, असे म्हणून त्यांनी निवडणुकीच्या मैदानातून काढता पाय घेतला. त्यामुळे साहेबांची नेमकी काय भूमिका आहे, त्यावरून मनसेचे कार्यकर्ते संभ्रमात पडले.

एका बाजूला मनसेची घसरगुंडी होत असताना दुसर्‍या बाजूला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावकाशीने आपला राजकीय जम बसवण्यात चांगल्यापैकी यश संपादन केले होते. त्यामुळे बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना हळूहळू सावरू लागली होती. बाळासाहेबांशी निष्ठा म्हणजे उद्धव ठाकरे यांना साथ, या भावनेतून शिवसैनिक कामाला लागले होेते. तर दुसर्‍या बाजूला मनसेतून कार्यकर्ते दूर जाऊ लागले होते. मुंबई महानगरपालिकेत जे मनसेचे सहा नगरसेवक होते तेही शिवसेनेत गेले. आता मनसेचे पुढे काय होणार असा प्रश्न राजकीय विश्लेषक उपस्थित करू लागले होते. मनसेला गळती का लागली ? त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह का ओसरला ? राज ठाकरे यांच्याविषयी वाटणारी क्रेझ का कमी झाली ? असे अनेक प्रश्न पुढे आले. ज्या नाशिक महानगरपालिकेच्या विकासाबद्दल राज ठाकरे जोशात सांगत असत, ती त्यांच्या पक्षाला का गमवावी लागली, याचेही उत्तर सापडेनासे झाले.

राज ठाकरे यांची उदासिनता, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट न घेणे, त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस न करणे याचा फटका मनसेला बसत असल्याची चर्चा होऊ लागली. त्यामुळे सुरुवातीला अगदी जोशात असलेले राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष यांचे अवसान गळाले की काय, असे सगळ्यांना वाटू लागले. पण अशी परिस्थिती असताना आता राज ठाकरे यांनी कात टाकायला सुरुवात केली आहे. आपला पक्ष टिकवायचा असेल तर आपण केवळ कल्पनेच्या भरार्‍या मारून चालणार नाही. तर जमिनीवर आले पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे राज ठाकरे अलीकडच्या काळात जेव्हा महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दौरे करतात तेव्हा जमिनीवर बसून स्थानिकांसोबत त्यांच्या घरात जेवण घेताना दिसतात. पूर्वी त्यांच्या मागे पुढे असणार्‍या गाड्यांचा लवाजमाही कमी झालेला दिसतो. इतकेच नव्हे तर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकून पुन्हा पक्ष उभारण्याचा त्यांची विचार केल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे.

बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये एक समान सूत्र आहे ते म्हणजे त्यांच्यामध्ये हाडाचा व्यंगचित्रकार मुरलेला आहे. बाळासाहेबांनीही सुरुवातीच्या काळात व्यंगचित्रांच्या माध्यमातून सत्ताधार्‍यांवर सातत्याने शरसंधान केले. त्या माध्यमातून शिवसेनेची भूमिका लोकांच्या मनावर बिंबवली. व्यंगचित्र हा लोकमनाला पटकन भावणारा प्रकार आहे. त्यामुळे सरकारचे वाभाडे काढतानाच पक्षाची प्रसिद्धीही होत असते. राज ठाकरे सरकारची खिल्ली उडवणारी व्यंगचित्रे काढून सर्व वर्तमानपत्रांना पाठवत असत. अलीकडच्या काळात त्यांनी स्वत:च्या पक्षाचे फेसबूक पेज सुरू केले आहे. त्या माध्यमातून ते आपली भूमिका मांडतात. व्यंगचित्रे प्रसिद्ध करतात. पण पूर्वीपेक्षा आता राज ठाकरे यांनी राज्य सरकारची पोलखोल करणार्‍या व्यंगचित्रांचा जणू काही सपाटाच लावला आहे, असे दिसते. अर्थात, त्याला राज्यात पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीचीही पार्श्वभूमी आहे हेही तितकेच खरे.

सुरुवातीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढे आपल्या पक्षाची अशी दशा का झाली, दिशाहिनता का आली, याचा विचार राज ठाकरे यांना करावा लागला असावा. त्यांना जमिनी वास्तवता कळू लागली असावी. त्यामुळेच त्यांनी आता लोकांमध्ये मिसळण्यासोबतच व्यंगचित्रांचा आधार घेतलेला दिसतो. त्यातूनच आपल्याला आणि आपल्या पक्षाला नवी दिशा मिळेल, अशी आशा राज ठाकरे यांना वाटत असावी. बाळासाहेबांच्या काळात परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी मराठी माणूस हा एकमेव मुद्दा घेऊन बाळासाहेब उभे राहिले होते. त्यामुळे त्यांना सर्वसामान्य मराठी माणसांचा पाठिंबा मिळत गेला. पण राज ठाकरे शिवसेेनेतून बाहेर पडल्यावर मात्र परिस्थिती बदलली. मराठी माणसांची म्हणून गणल्या जाणार्‍या शिवसेनेत उभी फूट पडली. जो पक्ष मराठी माणसांच्या संघटनासाठी स्थापन झाला होता. त्याच्यातच फूट पडली. दोन ठाकरेच वेगळे झाले. त्यामुळे परिस्थिती अवघड होऊन बसली. आता हे दोन ठाकरे मराठी माणसांना आपल्याकडे खेचू पाहत आहेत. त्यासाठी ते एकमेकांवर टोकाची टीक करत आहेत. पण त्यांच्या या फुटीचा फायदा ना शिवसेनेला होत आहे, ना मनसेला. तो अन्य पक्षांना होत आहे. त्यामुळे हे दोन्ही भाऊ आणि दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात भूमिका घेऊन आपले नुकसान करून घेत आहेत.

राज ठाकरे निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतात. त्यामुळे शिवसेनेची मते फुटतात. पण त्याच वेळी मनसेलाही लोकांचा फार प्रतिसाद मिळत नाही. त्यामुुळे दोन्ही पक्षांचे नुकसान होते. आपल्या पक्षाने महाराष्ट्रात शिवसेनेची जागा घ्यावी, अशी राज ठाकरे यांची महत्त्वाकांक्षा आहे. पण बाळासाहेबांनी शिवसेनेचा अगोदरच भक्कम पाय घालून ठेवला आहे. त्याला सहजासहजी सुरुंग लागणे शक्य नाही. राज बाळासाहेबांची आणि त्यांचा पक्ष शिवसेनेची जागा घेऊ पाहत आहेत. त्यासाठी राज यांची धडपड सुरू आहे. व्यंगचित्र हे ठाकरे घराण्याचे पारंपरिक शस्त्र आहे. त्याचा जोरदार वापर करण्यास राज यांनी सुरुवात केली आहे. पण शिवसेना आणि मनसे यांच्यात दुभंगलेला मराठी माणूस त्यांना किती यश देऊ शकेल, याविषयी शंका घ्यायला बराच वाव आहे. कारण बाळासाहेबांचा काळ आणि आताचा काळ यात बराच फरक आहे. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले आहे.

First Published on: November 11, 2018 5:37 AM
Exit mobile version