रामराज्य

रामराज्य

संपादकीय

अयोध्येत प्रभू श्री रामाचे अस्तित्व कालपर्यंत एका भगव्या कपड्यात लपटलेले होते, त्याचे दुःख देशातील बहुसंख्याक हिंदू समाजाला होते, न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेला हा वाद अनेक दशकानंतर तो २०१९ ला सुटला. हा ऐतिहासिक निर्णय होता. त्यानंतरही मंदिराच्या निर्माणाची प्रक्रिया कधी सुरु होईल, याची प्रतीक्षा होती. त्यातच कोरोनाचे संकट देशावर ओढावले. त्यामुळे श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सुरुवातीचा मुहूर्त रद्दही करावा लागला. न्यायालयीन प्रक्रियेतून प्रस्तावित श्री राम मंदिराची सुटका झाली आणि कोरोना महामारीत अडकली. मात्र विश्वाचा तारणहार श्री विष्णूचा अवतार श्री रामाला या महामारीचा कसला अडसर. अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजनाचा दुसऱ्यांदा मुहूर्त निश्चित करण्यात आला, त्यातही अनेकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, कुणी म्हटले कोरोनाच्या संकटात इ भूमिपूजन करा, कुणी म्हटले २ महिन्यानंतर कार्यक्रम घ्या, काही जण कोरोनाच्या संकटाला इतके घाबरले की त्यांनी स्वतःहूनच माझे या कार्यक्रमासाठी निमंत्रकांच्या यादीतून नाव वगळा, असे म्हणाले. खरे तर श्री राम हा जितका आस्थेचा विषय आहे, तितकाच श्रद्धेचा. त्यामुळे सर्व खबरदारी घेऊन या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणे अनेकांना शक्य झाले असते, पण शेवटी पुन्हा हा ज्याच्या त्याच्या श्रध्देचा विषय येतो. 

कोरोनाच्या महामारीतही श्री राम जन्म भूमी मंदिर निर्माण न्यासाचे निमंत्रण स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी नियोजित दिवशी अर्थात 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत आले आणि भक्ती भावाने श्री राम मंदिराचे भूमिपूजन केले, संत, महंत यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला, २ वर्षे ८ महिने इतक्या कालावधीत हे श्री रामाचे भव्य मंदिर उभे राहील, असे न्यासाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या नियोजित वेळेत हे मंदिर उभे करणे हे आता पुढील आव्हान आहे. मंदिर निर्माणाच्या कार्यात आजवर अनेक अडथळे आले आहेत, मुळातच हा विषय राजकीय आखाड्यावरील अग्रभागी राहिला, त्यामुळे या ना त्या कारणाने कायम या विषयात अडथळे येत गेले, आता तरी ही अडथळ्यांची शर्यत संपेल, अशी आशा करायला हरकत नाही, कारण खुद्द पंतप्रधानांनी भूमिपूजन केले आहे, तसेच सध्याचे सरकार स्पष्ट बहुमतावर असून श्री राम मंदिर निर्माण हे सत्ताधारी पक्षाचाही अजेंडा आहे. त्यामुळे हे मंदिर नियोजित वेळेत आणि ठरविल्याप्रमाणे तितकेच भव्य उभे राहील, अशी आशा आहे.

ही घटना खरोखरीच ऐतिहासिक आहे, या घटनेनंतर भारतीय राजकारण भविष्यात काय वळण घेणार याचे गुपित या घटनेच्या गर्भात दडले आहे. ज्या काळात काँग्रेसला सर्वाधिक बहुमत प्राप्त झाले त्या राजीव गांधी यांच्या काळापासून काँग्रेसने अल्पसंख्याकांच्या एकगठ्ठा मतांच्या राजकारणाने टोक गाठले होते, त्याआधीही काँग्रेसच्या राजकारणाचा हाच पाया होता, त्यामुळे आणीबाणीच्या काळात चार भिंतीत इंदिरा गांधी यांनी घटनेत दुरुस्ती करून धर्मनिरपेक्ष हा शब्द टाकून एकगठ्ठा मतांच्या राजकारणाला राजाश्रय मिळवून दिला, पुढे त्याच्याच आधारे राजीव गांधी यांनी शहबानो प्रकरणात टोक गाठले, काँग्रेसच्या अल्पसंख्याकांना गोंजारण्याच्या राजकारणाने जोर धरला आणि भारतीय समाजव्यवस्थेत अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक अशी फूट पडली. तेंव्हापासून हिंदू मतांच्या एकीकरणाच्या राजकारणाला जोर आला, आज जे मोदी सरकार आहे, त्यायोगे जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवला जाणे, त्याच्या वर्षपूर्ती दिनीच अयोध्येत श्री राम मंदिराचा भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडणे, मागच्या वर्षी नागरिक कायदा दुरुस्ती विधेयक चर्चेला आणणे आणि आता समान नागरी कायद्याची चर्चा हिंदू समाजात सुरू होणे हे काँग्रेसच्याच एकगठ्ठा मतांच्या राजकारणाचा परिणाम आहे. त्यामुळे श्री राम मंदिर भूमीपूजनाच्या या कार्यक्रमानंतर भारतीय राजकारण बहुसंख्यांकवादी बनणार की नरेंद्र मोदी समतोल राखणार हे पाहावे लागणार आहे.

भूमिपूजन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात म्हणाले की, श्री रामाचे मंदिर आपल्या राष्ट्रीय भावनेचे, आस्थेचे, कोट्यवधी लोकांच्या सामुहिक संकल्पाचे प्रतीक बनेल. भावी पिढ्यांना आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा हे मंदिर देत राहील. आज फक्त नवा इतिहास घडत नाही, तर इतिहास पुन्हा घडतोय. ज्या प्रमाणे मावळ्यांनी छत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेत निमित्त झाले, ज्याप्रमाणे गरीब, आदिवासी अशा समाजातल्या प्रत्येक वर्गाने स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींनी सहयोग दिला, त्याचप्रमाणे आज देशभरातल्या लोकांच्या सहकार्याने राम मंदिर निर्माणाचे हे पुण्यकार्य सुरू झाले आहे. आम्हाला माहिती आहे की ज्याप्रमाणे दगडांवर श्री राम लिहून रामसेतून बनवला गेला, तशाच प्रकारे घराघरातून, गावागावातून पूजन केलेल्या शिला इथे आल्या. हे न भूतो, न भविष्यती असे आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात या मंदिर निर्माण कार्याच्या घटनाक्रमाची स्वातंत्र्य लढ्याशी बरोबरी केली. कुठेही हिंदू शब्दाचा उल्लेख न करता समस्त भारतीयांना त्यांनी या कार्यात गृहीत धरले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रभू श्री रामचंद्रांच्या भव्य मंदिराचे अयोध्येत भूमीपूजन केले त्या मर्यादा पुरुषोत्तमाचा राज्यकारभार त्यांच्यासमोर आदर्श म्हणून ठेवतील, ज्या रामाने असुरांचा नाश केला, सर्वसामान्य, ऋषीमुनी यांना अभय दिले आणि जागोजागी योग्य व्यक्तीला राज सिंहासनावर बसवले, सदैव जनतेच्या मतांचा आदर केला, त्यावेळी श्री रामाने आपल्या स्वकीयांनाही दूर ठेवले.

भारत हा विविध भाषा, संस्कृती, विविध धर्म, पंथ यांनी नटलेला आहे, काँग्रेसने स्वार्थपोटी बहुसंख्याकांना सापत्न वागणूक देऊन अल्पसंख्याकांचे हित जोपासले, आज मोदी काँग्रेसच्या काळातील बहुमत उपभोगत आहेत, ते मात्र काँग्रेसचा कित्ता न गिरवता या देशातील सर्व घटकांचे हित पाहतील, अशी अपेक्षा करूया. भारतीय राजकारणाला म्हणूनच ही घटना एका महत्वाच्या वळणावर घेऊन जाणारी आहे, असे म्हटले जात आहे. नरेंद्र मोदी यांची सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी ही आक्रमक आहे, मात्र आता त्यांच्यात बराच संयम, सर्वसमावेशकता, देशहित, सर्वांगीण विकास या गुणांची वृद्धी दिसते, देशहिताला प्राधान्य देणारे मोदी जे निर्णय घेतील ते भारतीय राजकारणाला पोषक असतील, अशी या निमित्ताने आशा करायला हरकत नाही.

First Published on: August 6, 2020 11:33 AM
Exit mobile version