रंगभूमीवरील सौभाग्याचे अभिजात स्मरण

रंगभूमीवरील सौभाग्याचे अभिजात स्मरण

निर्माते यशवंत देवस्थळी आणि नाट्यसंपदा यांची निर्मिती असलेले हे नाटक रचनेत एखाद्या गीतगंगेसारखे आहे. मात्र त्यातील खुसखुशीत निवेदनाची जागा, नटी- सूत्रधार सदृश प्रसंग रचनेतून झालेली आहे आणि गायक आपले गीत साभिनय सादर करतात. प्रत्येकी दीड तासांचे दोन अंकी असलेले हे नाटक संगीतप्रधान असले तरी नाटकांतील गाजलेल्या स्वगतांचे, क्वचित प्रसंगी तुकड्यांचे सादरीकरण करत, रंगभूमीच्या दीड शतकी देदीप्यमान कालखंडाचा वेध घेऊ पाहते. हे तसेही कठीण काम होते आणि त्यासाठी संशोधनपूर्वक निवड आवश्यक ठरते. इथे हे संशोधनाचे काम चंद्रकांत मेहेंदळे यांनी केले आहे. त्यांनी संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळातील महत्वाचे पर्व, सुसंगतपणे समोर आणले आहे. ते सादर करण्यासाठी निवडलेली गायक – कलाकारांची फळी तरुण आहेच पण त्यांचे गायनही तोडीसतोड आहे. नाटकाचा पहिला अंक मोठा असला तरीही संगीत नाट्यवेड्या रसिकांचे पुरेपूर स्मरण रंजन करतो हे नक्की. नाटकाचा दुसरा अंक कालानुरूप पुढे सरकल्याने त्यात प्रवेश येत जातात.

नाटकाची सुरुवात कल्पकतेने केलेली आहे, जी इथे सांगण्यात रसभंग होईल. ती प्रत्यक्ष अनुभवावी अशी आहे. त्या पाठोपाठ गाजलेल्या नाट्यपदांची एक मालिकाच एका पाठोपाठ एक याप्रमाणे बरसू लागते. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (सं. स्वयंवर) गोविंद बल्लाळ देवल (सं. शारदा), राम गणेश गडकरी (सं. एकच प्याला) यानंतर बालगंधर्व काळातील देवल, रांगणेकर (कुलवधू), खाडिलकर (सं. मानापमान) आणि पुन्हा स्वयंवर अशी अविरत बरसात, नचिकेत लेले हे बालगंधर्व वेषात करतात. त्यांचे दिसणे आणि गायन दोन्हीही बालगंधर्वी नोस्टल्जियात अगदी नेमके फिट होते.
गायक कलाकार नचिकेत लेले, केतकी चैतन्य, अवधूत गांधी, शमिका भिडे हे सारेच तरुण गायक कलाकार उत्तम काम करतात आणि त्याहून सुंदर गातात.

दुसर्‍या अंकातील नाट्य प्रवेशात एकच प्याला मधील तळीराम, पोएटिक- वाहतो ही दुर्वांची जुडी, नटसम्राट अशी पाखरे येती, तो मी नव्हेच, ती फुलराणी आणि कौंतेय असा प्रवास आपण पाहतो. यात अमोल कुलकर्णी, रेणुका भिडे, अनिरूद्ध देवधर, संपदा जोगळेकर आणि राहुल मेहेंदळे वेगवेगळ्या भूमिकेतून नाट्य इतिहासातील पताका प्रवेश सादर करतात. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन संपदा जोगळेकर यांचे आहे. लिखाणात त्यांनी समृद्ध भाषेसोबत निवेदन किश्शातील खुसखुशीतपणा देखील पेरला आहे. नाट्य प्रसंग मालिकेला जोड म्हणून त्यांनी रंगभूमी आणि रसिकराज प्रेक्षक ही दोन पात्रे साकारली असून त्या स्वत: रंगभूमी आणि राहुल मेहेंदळे रसिकराज साकार करतात. दुसर्‍या अंकात नवी रंगभूमी म्हणून शर्वरी कुलकर्णी येतात. तर राहुल मेहेंदळे यांचा लखोबा, नटसम्राट आणि कर्ण उल्लेखनीय.

या स्मरण रंजनाचे संगीत वर्षा भावे आणि संयोजन कमलेश भडकमकर यांचे आहे. ऑर्गन आणि तबल्याची साथ केदार भागवत आणि सुहास चितळे यांची आहे. सचिन गावकर – नेपथ्य, शीतल तळपदे – प्रकाश आणि नीता पणशीकर – वेषभूषा, हे नाटकाची तांत्रिक बाजू उत्तम ठेवतात.

नाट्यप्रवेशात कानेटकर, दळवी ते आजची रंगभूमी यांना सामावून घेणे कठीण झाले असावे तसेच लोकनाट्य संगीताचा समावेश, नाटकाच्या प्रकृतीशी विसंगत ठरला असता म्हणून असेल, त्याचा समावेश झालेला नाही. रचनेच्या दृष्टीने हे योग्य असले, तरी नाटकाच्या दीर्घ अंकांमध्ये त्यांचा समावेश कदाचित वैविध्य आणू शकला असता आणि शतकाचा वेधही परिपूर्ण झाला असता. तसे होत नसल्याने दोन्ही अंक शेवटाकडे थोडे लांबल्यासारखे वाटतात. अभिजात नाट्य आणि गीत रसिकांसाठी मात्र हे नाटक मस्ट वॉच ठरावे.

 


– आभास आनंद (लेखक नाट्य अभ्यासक आहेत)

First Published on: August 23, 2018 12:46 PM
Exit mobile version