प्रतिसाद

प्रतिसाद

Letter

यंदाचा उन्हाळा, उष्णतेच्या झळा
राज्यातील बहुतांश भागांमध्ये उन्हाची मोळी झळ जाणवत आहे. जागतिक तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, बदलते ऋतुमान व मानवनिर्मित निसर्गाची केलेली कुरघोडी यामुळे उन्हाळ्याची तीव्रता जाणवत आहे. प्रखर उन्हाच्या झळा सर्वांच्याच जीवावार परिणाम करीत आहेत. उष्णतेच्या लाटेचा प्रकोप व त्याचा अनुभव शहर आणि परिसरात वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आता मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट आल्याने त्याचा सर्व प्राणीमात्रांवर विपरित परिणाम होत आहे. या भागांमध्ये आतापर्यंतच्या कमाल तापमानाचा अनुभव लोकांना घ्यावा लागतो. कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही लक्षणीय वाढ झाल्याने रणरणते ऊन आणि घामाच्या धारांनी जीवाची काहिली होत आहे. कमालीचा उकाडा सहन करण्याची मानसिकता लोकांना करावी लागणार आहे. वाढते तापमान हा सध्याचा सर्वात घातक असा वातावरणातील बदल आहे. कडक उन्हाचा मानवी जीवनावर झालेला विपरित परिणाम म्हणजे उष्माघात, परंतु गेल्या तीन वर्षांत पृथ्वीवर झालेली बर्फवृष्टी आणि तापमानात झालेला बदल पाहता त्यांच्या निरीक्षणाला पुष्टी मिळते. वातावरणातील या बदलांची कारणमीमांसा करणे ही काळाची गरज आहे.
कमलाकर जाधव बोरीवली

मंत्री पाटलांच्या तोंडाला आवर घाला
देवेंद्र फडणवीसांच्या राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडाला कोणीतरी आवर घालण्याची गरज आहे. त्यांना मंत्रिमंडळात ज्येष्ठत्वाचा मान आहे, पण या मानात ते कधीच नसतात. उलट अवमान होईल, अशी वक्तव्य करत हे पाटील स्वत:चे हसे करून घेतात. कधी ते अजित पवारांच्या अंगणात पोलीस पोहोचले आहेत, असे म्हणतात तर कधी तटकरेंच्या दारात इडीचे अधिकारी पोहोचलेत असली वक्तव्य करत स्वत:ची तुलना ते रावसाहेब दानवेंबरोबर करू लागले आहेत. निवडणुकीत हार जीत हा प्रकार नियमानुसार असतो, पण चंद्रकांत पाटील हे यातला निर्णय घरी बसूनच देऊ लागले आहेत. ईव्हीएमबाबत विरोधी पक्षांचा आक्षेप आहे. ते सत्ताधारी भाजपवर याबाबत स्पष्ट आरोप करत असताना अमुकएक हरणार म्हणजे हरणारच असे पाटील सांगतात, याचा अर्थ काय? चंद्रकांत पाटलांना हे कोणी सांगितलं? की ते ज्योतिषाच्या भूमिकेत काम करू लागलेत. जणूकाही यासंबंधीचा निर्णय आपल्याच घरी झाल्यासारखे पाटील बोलत आहेत. आता तर त्यांनी दुष्काळावरही खडे फोडायला सुरुवात केली आहे. उस्मानाबादच्या दौर्‍यावर असताना शरद पवार यांनी सरकारवर टीका केली. दुष्काळी कामात खोट असेल तर विरोधकांनी सरकारची वाहव्वा करायची असे चंद्रकांत पाटलांना वाटते काय? पवार आणि त्यांच्या पंटरांबरोबर चौकात बोलण्याची तयारी आहे, असे सांगणे म्हणजे पाटलांनाही सत्तेचा माज आलाय की काय, असे वाटल्याहून राहवत नाही. फडणवीसांनी या पाटलांना समज दिली पाहिजे, नव्हे त्यांच्या तोंडालाच आवरच घातला पाहिजे.
संजय सोनकर लोणावळा, पुणे

आता भटक्या गुरांचे काय कायचे?
राज्यातल्या आणि केंद्रातल्या सरकारने मोठा गाजावाजा करत राज्यात आणि देशात गोहत्या बंदीचा कायदा केला. हा कायदा करताना दोन्ही सरकारच्या प्रमुखांनी भटक्या गुरांसाठी गोशाळा निर्माण करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर रस्त्यावर येणारी मोकट गुरे आता गोशाळेत जातील अशी अपेक्षा होती. पण गोशाळा निर्माण करणार्‍या घोषणा नेहमीप्रमाणे ओस पडणार्‍या झाल्या यामुळे गोशाळाही ओस पडल्या. रस्त्यावरच्या मोकट गुरांमुळे देशात हजारो टन धान्याची नासाडी होते. ही नासाडी टाळावी म्हणून या गुरांची विल्हेवाट करण्याची अपेक्षा होती. पण ती झाली नाहीच. उलट नसत्या भावनेच्या आधारे सरकारने गोहत्येचे खुळ काढले आणि रस्त्यावरच्या गुरांना राजाश्रय मिळाला. आज या गुरांना कोणीही हात लावू शकत नाही. ही गुरे रात्री शेतात शिरून उभ्या अन्नाची नासाडी करतात. शेतकर्‍यांची होणारी नासाडी कशी थांबवणार. सरकारच्या या उफराट्या निर्णयाने शेतकरी अधिकच खायित चाललाय. आधीच मेटाकुटीला आलेला हा उद्योग भटक्या गुरांमुळे अधिकच लयास जाईल हे सांगायला नको.
उदय भोसले सिडको, नासिक

First Published on: May 13, 2019 4:40 AM
Exit mobile version