विचार करायला लावणारा संस्कार

विचार करायला लावणारा संस्कार

प्रत्येक समाजामध्ये रूढी परंपरा, संस्कार इत्यादी असतात. त्यांचे पालन करताना बदलणारा काळ, होणारी प्रगती आणि समाजात होणारे बदल यांचा जराही विचार न करण्याची बर्‍याच लोकांची वृत्ती असते. ती बदलण्यास ते फारसे अनुकूल नसतात. समाजात अनेक प्रकारच्या जाती वा घटक असतात आणि त्यांच्यावरील संस्कार, त्यांच्या रूढी, परंपरा याही वेगवेगळ्या असतात, तरी त्यांचे निष्ठेने पालन करणारे मात्र प्रत्येक समाजात असतातच. आज काल तर आपली परंपरा, रूढी, संस्कार यांचा (खरे तर त्यातील सोयीस्कर बाबींचाच) अभिमान बाळगणारी एक नवीच जमात उदयाला आली आहे, आणि त्यांच्यामुळे ठराविक समाजघटकांना प्रचंड उपद्रव होत आहे, नव्हे, दिला जात आहे. पण त्यांच्याविरुद्ध कारवाई होत नाही, फार तर त्यांचे हे करणे योग्य नाही, आम्हाला ते मान्य नाही अशी गुळमुळीत भाषा त्यांचे बोलवते धनी -सत्ताधारी करत असतात.

संस्कार या नावाची एक कादंबरी यू. आर. अनंतमूर्ती यांनी 1965 मध्ये लिहिली होती. ते इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी 1957 मध्ये निर्माण झालेला प्रख्यात दिग्दर्शक इंगमार बर्गमन यांचा ‘द सेव्हंथ सील’ नावाचा चित्रपट पाहिला. त्यांच्या मनावर त्या चित्रपटाचा प्रचंड प्रभाव पडला होता. आपले शिक्षक माल्कम ब्रॅडबरी यांच्याशी बोलतना त्यांनी हे सांगितले. त्यावर ब्रॅडबरी यांनी त्यांना, अरे, मग तू ही तुमच्या देशातील अनेक स्तर असलेल्या समाजातील अशा अनुभवावर वा रूढीवर लिही, असे सांगितले आणि अनंतमूर्ती यांना ते पटले. त्यांनी त्याप्रमाणे ‘संस्कार’ या नावाची कादंबरी लिहिली. तिचे हस्तलिखित त्यांनी त्यांचे भारतातील स्नेही गिरीश कार्नाड यांच्याकडे पाठवले.

ती वाचल्यानंतर कार्नाड चांगलेच प्रभावित झाले आणि लगेच त्यांनी मद्रास (आताचे चेन्नई) मधील त्यांचे स्नेही, मद्रास अ‍ॅक्टिंग ग्रुपचे पट्टाभिराम रेड्डी आणि चित्रकार एस. जी. वासुदेव यांच्याशी संपर्क साधला. कादंबरीच्या विषयामुळे प्रभावित झालेल्या रेड्डी यांनी त्यावर चित्रपट तयार करून त्याचे दिग्दर्शन करण्याचे ठरवले. वासुदेव कला-दिग्दर्शक बनले आणि त्यांनी त्यांच्यासह छायाचित्रकार टॉम कोवन यांना आणले. ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ डॉक्युमेंटेशन डिव्हिजनमध्ये काम करणार्‍या कोवनला आपल्याबरोबर यायला सांगितले. कोवन आपला मित्र, संकलक, स्टीव्हन कार्टलॉ यालाही घेऊन आले. कलाकारांची प्राथमिक निवड मद्रास ग्रुपमध्येच करण्यात येऊन बाकीचे बंगलोर (आता बेंगळुरू) येथे केली गेली.

‘संस्कार’ची कथा ही कर्नाटकाच्या पश्चिम घाटातील दुर्वासपूर नावाच्या लहानशा खेडेगावातील आहे. त्यातील एका रस्त्यावर राहणारे बहुसंख्य लोक मध्व (ब्राम्हणांतील एक पोटजात) आहेत. ते प्रामुख्याने धार्मिक, पारंपरिक विचारसरणीचे आणि रूढी परंपरा कटाक्षाने पाळणारे आहेत. प्राणेश्वराचार्य हे कथानायक आणि नारायणप्पा या दोन प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. प्राणेश्वराचार्य हा श्रद्धाळू ब्राम्हण आहे. तो वाराणसी येथे वैदिक शिक्षण घेऊन दुर्वासपुरात परतला आहे. आता त्याला दुर्वासपूर आणि आजूबाजूच्या गावांतील ब्राम्हणांचा नेता समजण्यात येते. मात्र प्राणेश्वराचार्याचे उद्दिष्ट मात्र मोक्ष प्राप्तीचे आहे. त्यासाठी तो काहीही करण्यास तयार आहे. आपले ध्येय नेहमी आपल्या डोळ्यासमोर राहावे ही त्याची इच्छा आहे. म्हणूनच त्याने लग्न केले आहे, तेही एका विकलांग महिलेबरोबर. तेही केवळ ब्रम्हचर्य जतन करण्यासाठी.

प्राणेश्वराचार्याबरोबर दुसरी व्यक्तिरेखा नारायणप्पा ही आहे. नारायणप्पा हा अगदी आचार्याच्या विरुद्ध टोकाचा आहे. तो कोणत्याही रूढी परंपरा पाळत नाही, मद्यप्राशन करतो आणि चंद्री नावाच्या वेश्येबरोबर राहतो. देवाच्या तळ्यातले मासे पकडून शिजवून खातो. गावातले ब्राम्हण त्यामुळे अस्वस्थ होतात. भयंकर चिडतात आणि नारायणप्पाला गावाबाहेर काढण्यास सांगतात. पण आचार्याला हे टोकाचे पाऊल मान्य नाही. नारायणप्पाला समजावून सांगितल्यास तो सुधारेल असे त्याला वाटत असते. त्याला वाटते की शिमोगाला जाऊन आला की नारायणप्पा बदलेल. एकदा नारायणप्पा खरोखरच शिमोगाला जातो आणि परततो तो खूप ताप घेऊनच. त्या तापातच तो मरण पावतो.

त्याचे अंत्यसंस्कार ब्राम्हणानेच करायला हवे असतात. पण कोणीही ब्राम्हण त्याच्यावर अंत्यसंस्कार करायला तयार नसतो. तसे केले तर ते पाप स्वतःच्या अंगावर येईल, असे त्यांच्यातील प्रत्येकाला वाटत असते. कारण नारायणप्पानेे कोणतेच ब्राम्हणी संस्कार आयुष्यात पाळलेले नसतात. असे असले, तरी रूढीनुसारच त्यांना मृतावर अंत्यसंस्कार झाल्याखेरीज अन्नग्रहण करता येत नाही. त्यामुळे त्यांना उपाशीच राहावे लागते. नारायणप्पाच्या भावाला त्याच्या सोन्याचा मोह पडलेला असतो. म्हणून तो संस्कार करायला तयार होतो. त्या बदल्यात नारायणप्पाच्या सोन्यावर हक्क सांगतो. तू त्याला घराबाहेर काढले होतेस त्यामुळे त्याच्या सोन्यावर तुझा नाही तर चंद्रीचा हक्क आहेे, असे सांगून आचार्य त्याला नकार देतो. तोही मग मी संस्कार करणार नाही, असे सांगतो.

यामुळे मोठाच पेच निर्माण होतो. कारण यावर मार्ग काय ते त्यांना सुचत नाही. ते प्राणेश्वराचार्यांना उपाय शोधायला सांगतात. त्याला पुस्तकांमध्ये त्यावर उपाय सापडत नाही, म्हणून तो मारुतीकडे कौल मागायचे ठरवून देवळात जातो. तेथे तो देवाच्या दोन्ही बाजूंना एकेक फूल ठेवतो आणि उजवीकडेचे फूल पडले तर मी स्वतःच अंत्यसंस्कार करीन, असे सांगतो. पण दिवसभर देवळात थांबूनही त्याला कौल मिळत नाही, म्हणून तो देवाची विनवणी करतो, माझी परीक्षा का घेतोस? असा प्रश्न अगदी कळवळून करतो. पण तरीही मध्यरात्रीपर्यंतही कौल न मिळाल्याने निराश होऊन घरी जायला निघतो. बाहेर पडताच त्याला चंद्री दिसते. तिची समजूत घालतानाच त्याला तिच्या तारुण्याची आणि सौंदर्याची भूल पडते.

त्यातच ते हरवून जातात. आचार्य जागा होतो तेव्हा आपण चंद्रीच्या मिठीत असल्याचे त्याला दिसते आणि त्याला खंत वाटते. चंद्री घरी जाते. पण प्राणेश्वराचार्याला मात्र आपल्या पापाची कबुली द्यायची लाज वाटते. त्यामुळे गप्प राहायचे ठरवून तो गाव सोडतो. मात्र तेथेही त्याला अपराधी वाटतच राहते आणि शेवटी तो आपल्या कृत्याची फळे भोगायची असे ठरवून गावी परत येतो. मात्र चित्रपट येथेच संपतो. पुढे काय झाले ते प्रेक्षकांनीच ठरवावे, असे दिग्दर्शकाचे म्हणणे …

या चित्रपटात प्राणेश्वराचार्याच्या भूमिकेत गिरीश कार्नाड आहेत. चित्रपटात काम करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ. तरीही त्यांचे काम इतके प्रभावी आहे की, त्यांची छाप चित्रपटभर आहे. चंद्रीची भूमिका स्नेहलता रेड्डीने अत्यंत समरसून वठवली आहे. जयराम पी. लंकेशने नारायणप्पा प्रभावी केला आहे. इतर कलाकार प्रधान, दाशरथी दीक्षित, लक्ष्मी कृष्णमूर्ती आदींनी आपापल्या भूमिका यथोचित केल्या आहेत.

चित्रीकरणासाठी स्थानिक ब्राम्हण वस्ती असलेले खेडे हवे होते म्हणून वैकुंठपूरची निवड केली गेली. हे गाव श्रुंगेरीजवळ आहे. तेथील शारदा पीठाने विरोध केला, पण स्थानिकांनी मात्र चित्रणासाठी चांगले सहकार्य दिले. इतके की, तेथील अग्रहरा महिलांनी टॉम कॉवनला थेट स्वयंपाकघरातही प्रवेश दिला होता, असे, अनंतमूर्ती यांनी 2014 मध्ये टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. स्थानिकांनी कथा काय हे माहीत असते तर चित्रीकरणाला कदाचित परवानगी दिलीच नसती, असेही ते म्हणाले होते. कदाचित ती दिल्याबद्दल चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांना पश्चात्तापही झाला असेल. पण एक गोष्ट खरी की, या चित्रपटामुळे ते गाव प्रसिद्धीच्या झोतात आले, असेही अनंतमूर्ती यांनी सांगितले होते. आणखी एक (आज) आश्चर्यकारक वाटणारी बाब म्हणजे हा चित्रपट केवळ 30 दिवसांत आणि 90,000 रु.मध्ये तयार झाला होता.

पट्टाभिराम रेड्डी यांनी तयार केलेला संस्कार हा पहिलाच कन्नड चित्रपट. त्याआधी त्यांनी फक्त तेलुगुमध्येच चित्रपट केले होते. कार्यकारी दिग्दर्शक सिंगीतम श्रीनिवास राव हे होते. मेकअपचा फारसा वापर न करणारा हा पहिलाच कन्नड चित्रपट होता. त्याचप्रमाणे संगीत आणि नृत्याचाही फारसा वापर नव्हता. सारे कलाकार हौशी होते हे आणखी एक वैशिष्ठ्य. मात्र या चित्रपटाला मान्यता देण्यास तत्कालीन मद्रास सेन्सॉर बोर्डाने 1969 मध्ये बंदी घातली. मात्र त्यासाठी कोणतेही कारण देण्यात आले नव्हते. बहुधा या चित्रपटामुळे मोठा तणाव निर्माण होईल, अशी भीती त्यांना वाटत असावी. नंतर ही बंदी केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाने उठवली. काव्यगत न्याय असा की या चित्रपटाला 1970 मध्ये सर्वोत्कृष्ठ चित्रपट म्हणून राष्ट्रपती पदक मिळाले. 1972 मध्ये लोकार्नो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ब्राझ लिओपार्ड हे पारितोषिक मिळाले आणि 1992 मध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवले गेले. कर्नाटक सरकारने मात्र त्याला क्र्रमांक दोनचे पारितोषिक दिले.

नारायणप्पाच्या मृत्यूनंतरची समाजात आलेली अस्वस्थता, भुकेमुळे त्यांचे व्याकुळ होणे, एका वयस्कर ब्राम्हणाने भूक असह्य होऊन गुपचुप, कुणाच्या नकळत, दुसरीकडे जाऊन जेवणावर ताव मारणे, नारायणप्पाच्या भावाची सोन्याची हाव, त्यामुळे त्याच्या बायकोला आलेला राग, त्यानंतर गावात पडू लागलेले उंदीर आणि घिरट्या घालणारी गिधाडे पाहून तिचे हे माझ्या मुलासाठी अपशकुन आहेत, असे सांगणे, चंद्रीचे आचार्यावरचे श्रद्धायुक्त प्रेम, आकर्षण हे अतिशय हळुवार आणि प्रभावीपणे चित्रित करण्यात आले आहे. तत्कालीन गावातील रस्ते, घरे, वाड्या वगैरेचे चित्रण भुलवून टाकणारे आहे. संगीत यथोचित आहे.

चित्रपटाचा विषय गंभीर असला तरी त्यात कोठेही आक्रस्ताळेपणा येणार नाही याची खबरदारी रेड्डी यांनी घेतली आहे व त्यामुळेच प्रभाव वाढायला मदत झाली आहे. शेवट आहे त्याप्रकारेच करणे योग्य होते असे वाटते. कारण आपले कोणतेही मत वा भूमिका प्रेक्षकांवर लादली जाणार नाही, याची खबरदारीच दिग्दर्शकाने जाणीवपूर्वक घेतली आहे. असा हा प्रभावी चित्रपट पाहताना पुन्हा एकदा आपल्याला विचार करणे भाग पडते. कित्येक रूढी कशा अन्याय्य आणि अवमानकारक होत्या याची जाणीव नव्याने होते, जरी आता त्या जवळपास नाहीशा झाल्या असल्या तरी …

First Published on: November 3, 2019 5:43 AM
Exit mobile version