सेल्फीचा नाद खुळा !

सेल्फीचा नाद खुळा !

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात पावसाने थैमान घातले आहे. जोरदार पाऊस झाल्याने सगळीकडे हिरवळ पसरली आहे. धबधबे, धरणं, समुद्रकिनारे, किल्ले, घाटपरिसर पर्यटकांनी गजबजली आहेत. निसर्गाचे खुललेले रूप पहाण्यासाठी पर्यटक शेकडो किलोमीटरचे अंतर पार करत पर्यटनस्थळ गाठताना दिसून येतय. या सर्वात पर्यटक आनंद घेण्यासोबतच बेशिस्त वर्तन करतानाही नजरेस पडतात. मागच्या काही दिवसांपासून ओमानच्या समुद्रकिनार्‍यावरचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हीडिओत एक कुटुंब उसळलेला समुद्राच्या किनार्‍यावर निसरड्या जागेवर उभ राहून सेल्फी घेत मौजमजा करताना दिसतात. पण त्या कुटुंबाने स्वप्नातही विचार केला नसेल असे काही एका क्षणात घडून गेले. सेल्फी घेण्याच्या नादात लाटेच्या प्रवाहात सापडून या कुटुंबातील दोन चिमुरड्यांसह एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. आपल्याला असे वाटले ते विदेशी नागरिक होते, परंतु ते विदेशी नागरिक नसून ते सांगली जिल्ह्यातील रहिवासी होते. अभियंता शशिकांत म्हमाणेंसह त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

हे झाले एक उदाहरण पण अशा हजारो घटना रोज घडत असतात. एका संशोधनातून असे समोर आले की पावसाळ्यात घडणार्‍या या अपघातांचे मुख्य कारण म्हणजे ‘सेल्फी’ आहे. सेल्फी ही संकल्पना आजकालची नाही तर तब्बल दोनशे वर्षांपूर्वी सेल्फीचा शोध लागला होता.परंतु आता सेल्फी ही प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा एक भाग झाल्याच समोर आलंय. मोबाईलच्या शोधामुळे सर्व जग बदलून गेल हे खरंय, पण मोबाईलचा शोध ज्या प्रयोजनातून लागला होता तो हेतूच जनतेने बदलून टाकलाय. जगाच्या पाठीवर कोठेही कोणाशीही सहज संपर्क करण्यासाठीच्या या प्रभावी तंत्रज्ञानाने आज इतकी भुरळ घातली आहे की, हे तंत्रज्ञान आता लोकांच्या जीवावर बेतू लागलंय. तंत्रज्ञानाचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होऊ द्यायचा हे पूर्णपणे आपल्या हातात असते, पण मानव त्या तंत्रज्ञानात इतका गुंतलाय की तंत्रज्ञान मानवासाठी आहे की तंत्रज्ञानासाठी मानव आहे याचे उत्तर मिळवणे खूप अवघड झालंय. अलीकडच्या मॉडर्न मोबाईलचा वापर फक्त संपर्क करण्यासाठीच नव्हे इतरही प्रकारे करून घेता येऊ शकतो.

या मोबाईलचा वापर उत्तम फोटो काढण्याची लोक करू शकतील अशी सोय असते. मग काय फिरायला गेल्यावर युवक-युवतींबरोबरच अगदी पन्नाशीच्या व्यक्तींमध्येही सेल्फीचे भूत संचारते. पूर आलेली नदी असो किंवा उधाण आलेला समुद्र असो हे सेल्फीवीर धोकादायक ठिकाणी जाऊन कोणाच्याही कॅमे-यातून वाटेल तिथे, हव्या त्या ‘बॅकग्राऊंड’सह एकट्याचा किंवा मित्र मैत्रिणींसोबत फोटो काढण्याच्या नादात अपघात होऊन जीवाला मुकतात. एक वेळ हे फोटो दुसर्‍याने काढणं सुरक्षित असू शकते, पण या सेल्फीविरांना तर फिल्टर लाऊन इंस्टाग्राम,स्नॅपचॅटला वेडेवाकडे चेहरे करून विशिष्ट हॅशटॅग वापरुन फोटो टाकायचे असतात. सोशल मीडियावर लाइक मिळवण्याच्या नादात हे भान हरपून जीवाचा धोका पत्करतात. प्रशासनाच्या वतीने नो सेल्फी झोन ठरवून दिलेल्या जागी ही नागरिक बेशिस्तपणे फोटो काढतात आणि त्या नादात जीवाला मुकतात.आपल्या मागे आपल्या परिवाराचे काय..? याचा जराही विचार यांच्या मनात येत नाही.

धक्कादायक बाब म्हणजे संपूर्ण जगाच्या तुलनेत सेल्फी काढताना मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. गेल्या दहा वर्षामध्ये जगभरात तब्बल ८०० जणांचा ‘सेल्फी’ घेताना मृत्यू झाला आहे. त्यात २०० पेक्षा जास्त जण भारतातील असल्याचे ‘जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर’ या नियतकालिकाने नमूद केले आहे.‘सेल्फी’ मृत्यूमध्ये भारतापाठोपाठ रशिया, अमेरिका आणि पाकिस्तान चा नंबर लागतो. मरण पावलेल्यांमध्ये २० ते २९ या वयोगटातील युवक सर्वाधिक प्रमाणात आहेत. भारतात तलावामध्ये किंवा समुद्रात बुडून मरणा-यांचे प्रमाण जास्त आहे. धावत्या रेल्वेगाडीपुढे येणे, हिंस्त्र जनावरांपुढे जाऊन फोटो काढताना अनेकांनी प्राण गमावले आहेत. ‘सेल्फी’च्या नादात जीव गमावणार्‍यांमध्ये ७५ टक्के पुरुष आहेत. सेल्फी काढण्यात महिला आघाडीवर असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाल आहे. मात्र, महिला ‘सेल्फी’साठी जीव धोक्यात टाकत नाहीत. पण तरुण -तरुणी सेल्फीसाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात.

सेल्फी घेण्याची सर्वाधिक ‘क्रेझ’ सेल्फी स्टिक आल्यापासून जास्तच वाढली आहे. काही ‘तुफानी’ करताना किंवा सोशल मीडियावर लाइकसाठी सेल्फी काढण्याच्या नादात जीवावर बेतल्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. काहींना तर सेल्फीचं अक्षरश: व्यसन लागलंय. सेल्फीचं अतिवेड वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातही घातक ठरू लागल्याचं दिसून येतंय.अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनने त्यांच्या वेबसाइटवर सेल्फी हा मानसिक आजार असल्याचं सांगत त्याला ‘सेल्फीटीज’ हे नाव दिलंय. या आजाराच्या जाळ्यात युवक-युवती जास्त अडकत असल्याचे त्यांच्यातर्फे सांगण्यात आलंय. सार्वजनिक ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकणार्‍यांबद्दल काय करता येईल यावर जगभरामध्ये वेगवेगळ्या स्तरावर चर्चा आणि संशोधन सुरू आहे. काहीतरी वेगळ करण्याच्या नादात हे घडत असल्यानं समोर येतय. मुळात स्वतःवर संयम ठेवणं आवश्यक झाल्याचं मत मानसोपचारतज्ज्ञांकडून व्यक्त केलं जातंय.

भारतात २० फेब्रुवारी २०२० ला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्‍यावर आले असताना मोटेरा स्टेडियमच्या उद्घाटन प्रसंगी एका मुलाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सेल्फी काढला होता आणि हा सेल्फी आत्तापर्यंतच्या लोकप्रिय ठरलेल्या सेल्फींमध्ये येतो. सेल्फी काढणे वाईट नसून फक्त तो काढताना आपण आपल्या मनावर ताबा ठेवणे गरजेचे असते.

–प्रमोद उगले

First Published on: July 17, 2022 2:50 AM
Exit mobile version