उम्र का पता ही नहीं चलता

उम्र का पता ही नहीं चलता

– अर्चना दीक्षित

आप की त्वचा से आप की उम्र का पता ही नहीं चलता है। झालं हे एक वाक्य ऐकण्यासाठी अहो बायका काय
पुरुषदेखील तितकेच उत्सुक असतात बरं का.आजकाल फॅशनप्रमाणे राहणे सगळ्यांना आवडते आणि मी म्हणते का नाही राहायचं. जरूर आपण याप्रमाणे राहायलाच हवं. जसं जग बदलत आहे तसं स्वतःमध्ये बदल घडवायला हवे. मग हे सौंदर्य जपण्यासाठी विविध उपाय करण्याचे मार्गसुद्धा उपलब्ध आहेत.

‘अग भावना ऐक ना मी काय म्हणतो मी ना आता ऑनलाईन शॉपिंगवर काही गृहोपयोगी वस्तू मागवत आहे. तर बघ ना मला ना एक भारी फेस क्रीम आणि फेस लोशन दिसले आहे. खास पुरुषांसाठी. एवढ्यात जरा स्किन उन्हामुळे काळवंडलेली दिसते. काय म्हणते मागवून टाकू का. मागच्या आठवड्यात परश्याने पण बोलता बोलता म्हटले होते या प्रोडक्टविषयी आणि पाहा ना आज सहज ऑनलाईन शॉपिंग करताना मला हे दिसले. जरा मागवून बघतो.’
‘हो हो मागवाच बाई. एवढ्यात खरंच तुम्ही काळवंडल्यासारखे वाटता हं. वापरून बघा. नाही आवडली तर देऊन टाका कोणाला,’ अशी चर्चा काही ठिकाणी सुरू असते.

तर कुठे नवरा घरी आल्यावर क्षणाचा विलंब न करता बायको विचारते, ‘अहो काय मग आज मी कशी दिसते आहे?’
नवर्‍यापुढे मोठ्ठा प्रश्नच उभा राहतो. तो थोडा वेळ विचार करून म्हणतो, ‘अरे वाह भारीच की. परिस्थिती चाचपडत आज पार्लरमध्ये गेली होतीस वाटतं. मस्त ग मस्तच.’ त्यावर बायको खूश होत म्हणते, ‘अय्या, कसलं ओळखता हो तुम्ही. मान गए आपको, पण खरं सांगू का, मी ना पार्लरमध्ये नव्हते गेले. अहो त्या रेवाची आई आहे ना, तर त्या ना घरगुती सौंदर्य प्रसाधने तयार करून विकतात आणि किंमतदेखील आवाक्यातील आहे हो. म्हणून म्हटले घेऊन जरा वापरून बघावं. मला पण छान वाटत आहे हे.’

तर काही घरांमध्ये तर ब्रँडला महत्त्व दिले जाते. ‘ज्याचं नाव त्यालाच भाव,’ असं मानतात. हो मी कुठे काही हरकत घेत आहे. बिलकुल चालेल कोणतेही सौंदर्य प्रसाधन. काय हवं ते वापरा. आता याचा अर्थ चुकीचा नका घेऊ. वाट्टेल ते वापरा, असा अर्थ नका हं घेऊ.

कारण काय असतं, प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेचा रंग, त्वचेची रचना, ऋतूनुसार होणारे त्वचेतील बदल, काही कारणांमुळे हवामानामुळे त्वचेवर होणारा परिणाम या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मगच आपल्याला सौंदर्य प्रसाधने निवडावी लागतात. बरेच वेळा काहींची त्वचा संवेदनशील असते. कोणतेही क्रीम त्यांना लावून चालत नाही. योग्य मार्गदर्शन घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रसाधन वापरणे योग्य आहे.

नाहीतर टीव्हीवर जाहिरात बघून लगेच तेच छान आहे. ‘मग बघा ना करीना कपूर तेच वापरते. मी पण हेच विकत घेणार,’ असं किंवा शाहरूख खान जे चेहर्‍यावर क्रीम लावतो ते जगात भारी. आपण पण तेच लावणार ना भो, असं म्हणणं अयोग्य आहे हो.एवढेच काय पण आपण सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानात जातो आणि त्यांनाच विचारतो, ‘सध्या कोणते प्रोडक्ट्स जास्त छान हो भाऊ?’ मला तर बाई शुगर, नायका, मेबीलिन अशी नावे माहीत आहेत. दुकानदार काय त्याला विकायच्याच आहेत त्याच्या दुकानातील वस्तू. तो अजून अजून महाग प्रोडक्ट दाखवत आणि त्याविषयी अगदी पटवून सांगत आपला माल विकत असतो.

तर काही लोक ऑनलाईन शॉपिंग स्वस्त पडते म्हणून त्यांच्या नादाला लागतात. ‘कुठे त्या दुकानात जा, गाडीचे पेट्रोल खर्च करा, त्यापेक्षा हे ऑनलाईन शॉपिंग बरं बाई किंवा बरं बुआ. मस्त घरबसल्या हातात येते आणि शिवाय स्वस्त पडतं. कोणते का प्रोडक्ट असेना. आपल्याला काय चेहर्‍यावर, हाताला काहीतरी क्रीम फासले म्हणजे झाले. इथे कोणाला एवढा फालतूचा वेळ आहे राव.’ इथेच आपण जरासे चुकतो हो. मग त्याचा दुष्परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो. म्हणून तर स्वतःची काळजी स्वतःला नीट जाणून घेऊन, योग्य मार्गदर्शन घेऊन घ्या. काय मग स्वतःसाठी वेळ काढायला तयार ना?

First Published on: June 11, 2023 4:25 AM
Exit mobile version