अ‍ॅनिमल फार्म

अ‍ॅनिमल फार्म

–प्रशांत कळवणकर

प्रस्तुत कथेत एक गर्भ श्रीमंत परंतू एक व्यसनी शेतकरी असतो, त्याच्या कडे असंख्य जनावरे जसे बैल, गाई, शेळ्या, मेंढ्या, गाढवे, डुकरे व इतर प्राणी असतात. हा शेतकरी व्यसनी असल्यामुळे प्राण्यांना दिवसातून दोन वेळेस परंतू वेळेवर जेवण देत नसे. एक दिवस काही प्राणी आपण आपले प्राण्यांचे राज्य स्थापन करावे व हया शेतकर्‍याच्या तावडीतून मुक्त व्हावे हा विचार मांडतात. काही प्राणी माणसापेक्षा बहुतांश गोष्टीत आपण असमर्थ आहोत हया भीतीने हया स्वातंत्र्याच्या कल्पनेला विरोध करतात. पण ह्या प्राण्यांमधील काही धूर्त प्राणी त्यांना विविध खोटी प्रलोभने आणि आश्वासने देऊन अभासी देशप्रेम जागवतात. सतत अवास्तव काल्पनिक जगतात ठेवण्यासाठी ते वेळप्रसंगी खोटे बोलून प्राण्यांची दिशाभूल करतात त्यामुळे हया प्राण्यांना ही काल्पनिक परंतू अवास्तव स्वतंत्र जगाची कल्पना हळू हळू वास्तव वाटायला लागते.

प्राण्यांचे हे धूर्त नेते स्वतःच्या स्वार्थापाई व सर्व सत्ता सूत्रे आपल्या हाती रहावी म्हणून ही अवास्तव जगाची कल्पना प्राण्यामध्ये प्रभाविपणे रूजवतात व त्यासाठी हे नेते एक स्वातंत्र्य गीत सुद्धा तयार करतात. हळू हळू हा उन्माद सर्व प्राणीमात्रात पसरतो आणि एक दिवस हे सर्व प्राणी त्यांच्या अन्नदात्या शेतकर्‍याची हत्या करतात.

सर्व प्राणी आता आनंदी होत माणसापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हया भावविश्वात जगत त्या अवास्तव काल्पनिक जगाची स्वप्ने पाहू लागतात. काही दिवस आनंदात जातात परंतू मनुष्यापेक्षा आपण श्रेष्ठ नाहीत याची जाणीव काही जणांना व्हायला लागते. आधी वेळेवर जरी नाही तरी दोन वेळचे अन्न हया प्राण्यांना मिळत होते आतामात्र त्यांना एकवेळचे अन्न कसेबसे मिळू लागले.

बहुतांश प्राण्यांना वास्तवाची जाणीव होतं आहे ही बाब हया धूर्त प्राण्यांच्या नेत्यांच्या लक्षात येते. हे धूर्त नेते मग जे प्राणी हया सत्य परिस्थिती विरुद्ध आवाज उठवतात ते कसे राष्ट्रद्रोही विचाराचे आहेत, ते कसे स्वतंत्र प्राणीराष्ट्र स्थापन होऊ द्यायचे नाही हया साठी देशविरोधी कारवाया करतात हे खोटेनाटे बोलून सतत प्राण्यांना पटवून देण्याचे काम करायला लागतात. वेळ आली तर एकवेळ उपाशी राहू आपल्या सुराज्यासाठी त्याग करू पण ध्येय साध्य करू अशीही फुकाची आवाहनेही ही नेते मंडळी करतात. बरेच जण हया अपप्रचाराला सहज बळी पडतात कारण त्यांना ते अवास्तव कल्पनेतील जग हे सत्यतेत येईल असे असे सतत वाटत असते.

हळू हळू योग्य प्रशासनाच्या अभावामुळे त्यांची उपासमार व्हायला लागते अनेक गोष्टींचा तुटवडा भासायला लागतो. ते हे सर्व सहन करतात कारण त्याच्यावर स्वतंत्र प्राणी जगताची कल्पना धूर्त नेत्यांकडून प्रखरपणे बिंबवली जाते असते. चांगले दिवस येतील हया नेत्यांच्या खोटारड्या आश्वासणामुळे ते विरोध करणार्‍या लोकांची हेटाळणी करायला लागतात व स्वतंत्र प्राणिराष्ट्रासाठी आपण हे हाल सहन करून खरी देशसेवा करत आहोत हया फाजील भ्रमात रहाणे पसंत करतात.

आणखी काही दिवस जातात, हया प्राण्यांची परिस्थिती चांगली होण्याऐवजी आणखीनच हलाखीची बनत जाते. अनेक प्राण्यांची उपासमार होते विविध आजार-रोगराईमुळे व त्यावरील उपचाराच्या अभावामुळे अनेक प्राणी मृत्युमुखी पडतात. प्राणिसंख्या हळू हळू कमी होउ लागते. स्वतंत्र प्राणिराष्ट्राचा फुगा सरत शेवटी फुटतो. सर्व प्राण्यांना पश्चाताप होऊ लागतो परंतू आता वेळ गेलेली असते केवळ मृत्युची वाट पाहणे एवढेच नशिबी शिल्लक राहिलेले असते. वास्तवाचे भान ठेऊन कल्पनेच्या भावविश्वातून योग्यवेळी बाहेर न आल्यास व सत्य असत्य यातील भेद लक्षात घेण्याचा प्रयत्न न केल्यास केवळ आपण आपलेच नव्हे तर येणार्‍या पिढ्यांचेही नुकसान करतो हेच हया कथानकातून सिद्ध होते.

First Published on: April 16, 2023 3:15 AM
Exit mobile version