गाणे असते वार्‍याचे …!

गाणे असते वार्‍याचे …!

माझ्या पहिल्यावहिल्या लेखनात माझ्या अंतरंगातील गाण्याचे बोल शब्द घेऊन प्रकटले. या कवितेचे मोल किती? ते मला तेव्हा समजले नाही. अर्थात त्या कॉलेजच्या दिवसात असे कोणते काव्यसंस्कार झाले होते? शब्द जुळवण्याचाच हा प्रकार होता. नंतरच्या जीवन संघर्षात कविता समजत गेली. अनेक कवी ग्रंथालयात भेटत गेले. गाण्यातील कविता तर अखंडपणे माझ्या कळत्या वयापासून सोबत करत होतीच. गाणे म्हटले की आपल्याला आठवतात ते शब्द, सूर, ताल आणि लय. त्यात संगीत असते. संगीताच्या सुरावटीने शब्दच भिजून गाणे गाऊ लागतात.

गाणे आणि कविता या इतरांना वेगळ्या वाटत असल्या तरी मला त्या वेगळ्या दिसत नाहीत. उलट काव्याच्या गर्भात असलेल्या संगीताच्या लयीनेच अनेक कविता रसिकांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. ही संगीतमय काव्यशिल्पे मराठी मनाला किती निखळ आनंद देतात. मराठी भावगीत हा त्यातलाच प्रकार. मराठी भावगीताने मराठी मनाला कोणते दर्शन घडवले नाही? सर्व ऋतू, प्रहर, जीवनाच्या, मनाच्या अवस्था, सर्व निसर्गातील विभ्रम आणि मानवी मनातील भावविभ्रम या गाण्यातूनच आपल्यासमोर मूर्तिमंत झाले. पुनवेचा चंद्र असो की अवसेची भयान रात हे आपल्यासमोर गाण्यातूनच वाहत आलेले असते.

कवितेला लाभलेला हा गेयतेचा आयाम मला नेहमीच प्रभावित करत आला आहे. गाणे ऐकता ऐकता ते माझ्या अंगात कधी मुरले ते मला समजले नाही. गाणे माझ्या सदैव सोबत असते. मनात असते. जेव्हा मी एकटा असतो, तेव्हा तर त्याचा आणि माझा अधिक संवाद होतो हे मात्र खरे. एकटा असल्यावर मी गाणे म्हणतोच. लहानपणी मी एकटाच मळ्यात जायचो. तेव्हा माझाच प्रतिध्वनी मला ऐकायला यायचा. मला याची भारी मज्जा वाटायची. मी मोठ्याने गाणे म्हणायचो. त्या रानात मी मुक्तपणे त्या रानपाखराप्रमाणेच मनसोक्त गायलो. सर्व ऋतूंचे, पशुपक्ष्यांचे, गाय-वासरांचे, नदीचे-रानाचे, वार्‍याचे, झाडांचे, आकाशभर व्यापलेले हे मातीचे स्वर ऐकतच आपण मोठे होतो नाही का?

तेव्हा बहुतेक गावातील बर्‍याच मंडळींकडे रेडिओ असायचे. हे रेडिओ गावातील दुकाने, ओटे, मंदिरे, अनेक बैठकीच्या जागांवर सुरू असायचे. पाच-सहा श्रोते तरी ते ऐकायला असायचेच. तो काळ रेडिओ, सायकल, घड्याळाचा होता. रेडिओ तर अनेकांना आपला सखाच वाटायचा. अनेक गुराखी, शेती काम करणारे तेव्हाचे तरुण हमखास हे माध्यम करमणुकीसाठी ऐकायचेच. गावभर रेडिओच्या गाण्याचे दळण सुरू असायचे. विविध स्टेशनवर वेगवेगळे कार्यक्रम. त्यामुळे सारे संमिश्र वातावरण. कुठे अभंगवाणी, तर कुठे भक्तिगीते. कुठे लोकसंगीत, तर कुठे नाट्यगीते. गावात एक चक्कर मारली तर ज्यांना जे आवडते तसे कार्यक्रम सुरू असत.

जिथे जिथे आकाशवाणी आहे ती शहरे आम्हाला नावानिशी परिचयाची झाली आणि ही सर्व स्टेशने तेव्हा काही काळ आमच्या गावात निवासाला येत असत असे मला वाटायचे. एक मात्र घडले या रेडिओनेच आमचा कान तेव्हा तयार केला. गाणे म्हणजे काय? हा परिचय रेकॉर्ड, टेपरेकॉर्डर ऐकण्यापूर्वीच आम्हाला झाला. जेव्हा गावात लग्न असायची तेव्हा त्या लाऊडस्पीकरवर दिवसभर गाणी सुरू असत. तेव्हा कानावर पडलेली काही गाणी आज लागली तरी मला ती गाणी त्या गावात आणि घरात घेऊन जातात. त्या उंच जागेवर ठेवलेला तो रेडिओ मला दिसू लागतो आणि त्या काळाचे संगीत माझ्या मनात रुंजी घालू लागते.

त्या काळात सुधीर फडके, अरुण दाते, वाटवे यांच्या भावगीतांशी माझा ऋणानुबंध जोडला गेला तो कायमचाच. रेडिओवरच्या उद्घोषणा ऐकून गायक, संगीतकार, गीतकार माहीत होत गेले. यातील गीतकारांपेक्षा अधिक लक्षात राहिले ते गायकच. नंतर कॉलेजला गेल्यावर पाडगावकर, खानोलकर, करंदीकर, बोरकर, शेळके, ग्रेस, भट, महानोर अशी या क्षेत्रातली दिग्गज मंडळी मला ग्रंथालयातील पुस्तकात भेटली. पुढे उच्च शिक्षणासाठी शहरात आलो. गाण्याचे वेड असल्याने अनेक गाण्यांचे कार्यक्रम ऐकायला मिळू लागले. एकीकडे दर्जेदार कवितांचे वाचन तर दुसरीकडे शहरातील सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे अभिजात संगीताची आवड आणखीनच बळावत गेली. इथेच प्रभाकर कारेकर, अजय पोहनकर, अजित कडकडे, जितेंद्र अभिषेकी, शौनक अभिषेकी, हृदयनाथ मंगेशकर, झाकीर हुसेन यांचे कार्यक्रम ऐकायला मिळाले. या प्रतिभावंतांच्या दर्शनाने आणि त्यांच्या संगीताच्या मैफलीत माझा कान तयार होत गेला. मी गानसेन झालो नसलो तरी कानसेन मात्र नक्कीच झालो. या गाण्याने माझे आयुष्य समृद्ध केले, सुंदर केले.

मला लहानपणापासून सुधीर फडके आणि अरुण दाते यांची गाणी खूप आवडायची. त्यातील फडके यांचा कार्यक्रम मी प्रत्यक्ष ऐकला नाही, त्यांना पाहिले नाही. श्रीधर फडके यांचा कार्यक्रम मी ऐकला. अरुण दातेंचा तर मी भक्तच. पाडगावकर, संगीतकार यशवंत देव आणि अरुण दाते यांच्या गाण्यांनी माझे भावविश्व फुलले. योगायोग असा की कॉलेजच्या पहिल्याच वर्षात मला पाडगावकरांचा ‘जिप्सी’ हा काव्यसंग्रह अभ्यासाला होता. तो फक्त माझ्या परीक्षेचा विषय न राहता माझ्या आयुष्याचाच विषय झाला. मी नंतर कवितेने झपाटून गेलो. खूप कविता वाचल्या. नगरच्या वास्तव्यात पाडगावकर एका कार्यक्रमासाठी आले तेव्हा त्यांची भेट झाली. त्यांना दुरूनच पाहिले.

एका छोट्याशा खेड्यात रेडिओवर गाणी ऐकली. ती गाणी गुणगुणत आम्ही लहानाचे मोठे झालो. पुढे वयात आल्यावर याच गाण्यातील आणि आवाजातील मोहकता, माधुरी आमच्या मनाला आल्हाद देत गेली. या भावमधुर गीतांसोबतच आम्ही आमच्या तारुण्यातील अनेक स्वप्ने रंगवली, ती फुलवली? खूप गाणी ऐकली. ग्रेस, खानोलकर आणि सुरेश भटांच्या गजलांनी आयुष्य आणखीनच सुंदर केले. भीमराव पांचाळे यांची गजल ऐकत आलो. आयुष्यातून गाणे वजा केले तर काय राहील? असे माझ्या जगण्यासोबत गाणे जोडले गेले, या कवितेतील ओळीप्रमाणेच…

गाणे असते वार्‍याचे, पहाटच्या तार्‍याचे, गाणे सांगा येते कुठून? डहाळीतून ओंकार फुटून.

— अशोक लिंबेकर 

First Published on: July 24, 2022 3:00 AM
Exit mobile version