देशप्रेमी…

देशप्रेमी…

– सुनील शिरवाडकर

शिशिर, हेमंत, शरद, वसंत, वर्षा, ग्रिष्मा, विशाखा आणि त्यांच्या समविचारी मुलंमुलीचं देशप्रेम वरचढ ठरलं. त्यांनी कदाचित झेंडावंदन केलं नसेल. ते मंदिरात पण गेले नसतील.. त्यांनी उपासही केला नसेल..त्यांनी प्रदक्षिणा पण पूर्ण केली नसेल.. पण त्यांना मिळालेलं पुण्य इतरांपेक्षा अधिक होतं. कारण ते पर्यावरण प्रेमी होते.. आणि निसर्गावर प्रेम करणारे होते.. जागरूक नागरिक होते.. आणि म्हणून तेच खरे देशप्रेमी होते.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा नुकताच संपन्न झाला. पंतप्रधानांनी केलेल्या ‘हर घर तिरंगा’ या आवाहनाला देशभरात प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी आपल्या घरावर तीन दिवस तिरंगा फडकवला. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे लोकही उत्साहात होते. सकाळी बाहेर पडलो तेव्हाचे दृश्य खूप छान होते. झेंडावंदन समारंभाला जाणारे ऑफिस मधील..कंपन्यांमधील लोक गाड्यांवर निघालेले होते.. काही जण मुलांना शाळेत सोडविण्यासाठी निघाले होते..काही जण ऑफिसमध्ये झेंडावंदन करुन परत निघाले होते.. चौकाचौकात तिरंग्याची विक्री करणारी मुले उभी होती. कागदी झेंडे..शर्टला अडकवण्यासाठी छोटे झेंडे.. बाईकवर लावण्यासाठी झेंडे..तिरंगी फुगे.. कितीतरी प्रकार होते. बाईकच्या हँडलला तर कितीतरी जणांनी झेंडे लावले होते. वेगात जाताना ते मोठ्या डौलाने फडकत होते.

आज जसा 15 ऑगस्ट..तसाच तिसरा श्रावणी सोमवारसुध्दा होता. शिवभक्तांनी सकाळपासून शिवमंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. ‘मेरे देशकी धरती..’ सोबतच ‘ओम नम: शिवाय’ ची धुनही स्पिकरवरुन ऐकायला येत होती. जागोजागी ग्रामीण भागातून आलेले गरीब आदिवासी बेलपत्रांचे ढीग विक्रीसाठी घेऊन बसले होते. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्रिंबकेश्वरात तर अलोट गर्दी लोटली होती. ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी असलेलं त्रिंबक राजाचं मंदिर..वरती ब्रम्हगिरीतून उगम पावणारी गोदावरी..कोसळणारा पाऊस..हे सगळं भक्तांना आणि अर्थातच पर्यटकांना अतीशय आकर्षून घेणारं. या दिवशी ब्रम्हगिरीच्या डोंगराला प्रदक्षिणा घालणे म्हणजे मोठेच पुण्याचे काम. त्यामुळे शेकडो शिवभक्तांनी काल रात्रीपासूनच त्रिंबकेश्वराकडे जाण्याची तयारी केली होती. उपवास असल्याने सोबत वेफर्सचे पुडे..फळे. पाण्याच्या बाटल्या..आणि अर्थातच गुटख्याच्या पुड्या घेऊन बाईकवरून सुसाट निघाले होते.

आज सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे प्रदक्षिणेला खूपच गर्दी होती. अगदी शिवभक्तांचा पुरच. प्रदक्षिणेच्या वाटेवर जागोजागी छोट्या छोट्या विक्रेत्यांची दुकाने होती. काही सेवाभावी संस्थांनी मंडप टाकले होते. तेथे साबुदाण्याची खिचडी, केळीचे वाटप सुरू होते. या प्रदक्षिणा मार्गावर अनेक छोटी गावे..पाडे आहेत. त्यांना हे दिवस दोन पैसे देऊन जातात. रॉकेलच्या स्टोव्हवर चहाचे पाणी उकळत कितीतरी जण बसले होते. अशा पावसाळी हवेत चहाची तल्लफ तर येणारच. टवके उडालेल्या कपबशीतून मिळणारा तो काळसर चहाही प्रदक्षिणा घालणार्‍यांना एनर्जी देत होता.

गरीब मुले ‘खाऊ दे.. नाही तर पैसं दे’ म्हणत शहरी लोकांच्या मागे धावत होती. दरवर्षी नेमाने प्रदक्षिणा घालणार्‍यांना हे माहीत असतं. ते आपल्या सोबत बिस्कीटचे पुडे.. चॉकलेटस् घेऊनच येतात. त्या मुलांच्या हातावर खाऊ ठेवल्यावर त्यांचे चेहरे आनंदून जात होते. रविवारच्या मध्यरात्रीपासून तर सोमवारच्या संध्याकाळपर्यंत अक्षरशः लाखोंच्या संख्येने शिवभक्तांनी प्रदक्षिणा पूर्ण केली, आणि पुण्य कमावले.

आज मंगळवार 16ऑगस्ट…शिशिर, हेमंत, वसंत, शरद, ग्रिष्मा, वर्षा, विशाखा, उत्तरा, चित्रा आणि त्यांच्यांच विचारांचे अनेक तरुण मुलंमुली यांचा ग्रुप आज भल्या पहाटे बाहेर पडला. दोन गटात त्यांची विभागणी झाली. एक ग्रुप शहरातच रस्त्यारस्त्यावरुन फिरु लागला. रस्त्याच्या कडेला कितीतरी झेंडे पडले होते. ते उचलून बरोबरच्या गोण्यात टाकायला त्यांनी सुरुवात केली. सकाळी नऊपर्यंत त्यांचं हे काम सुरू होतं. बरोबर आणलेल्या सगळ्या गोण्या, पिशव्या भरल्यानंतर मात्र त्यांनी आपलं काम थांबवावं लागलं. आणि तसंही संपूर्ण शहरात ते फिरुही शकत नव्हते.

दुसरा ग्रुप थेट त्रिंबकेश्वराकडे गेला. त्यांनी बरोबर एका टेम्पो नेला होता. प्रदक्षिणेच्या वाटेवर ते पोहोचले. तेथील दृश्यष् बघून त्यांना खूप वाईट वाटले. जागोजागी प्रसादाचे द्रोण..वेफर्स, गुटख्याच्या रिकाम्या पुड्या, केळीची सालं पडली होती. कालच्या त्या सेवाभावी संस्थांचे मंडप तर कचर्‍याने भरुन गेले होते. सगळी मुलंमुली कामाला लागले. हातावर ग्लोव्हज चढवून कचरा गोळा करायला त्यांनी सुरुवात केली. पाण्याच्या बाटल्यांचा तर खच पडला होता. सकाळी आठ वाजता त्यांनी कामाला सुरुवात केली. पण बारापर्यंत ते जेमतेम अर्ध्या वाटेवरचाच कचरा गोळा करु शकले. अखेर त्यांनाही मर्यादा होत्या. बरोबर आणलेले दोन्ही टेम्पो भरले, तेव्हा नाईलाजाने त्यांनी परतीची वाट धरली.

खरंच.. कोणाला देशभक्त म्हणावं? कोणाला शिवप्रेमी म्हणावं? खूप जण स्वातंत्र्य दिनी झेंडावंदनासाठी गेले..मुलांना पण शाळेत घेऊन गेले. त्यांना राष्ट्राविषयी प्रेम होतंच. श्रावणी सोमवारी उपवास करणार्‍यांनी.. प्रदक्षिणा करणार्‍यांनी पण पुण्य कमावलंच.

पण या सगळ्यांपेक्षा शिशिर, हेमंत, शरद, वसंत, वर्षा, ग्रिष्मा, विशाखा आणि त्यांच्या समविचारी मुलंमुलीचं देशप्रेम वरचढ ठरलं. त्यांनी कदाचित झेंडावंदन केलं नसेल. ते मंदिरात पण गेले नसतील.. त्यांनी उपासही केला नसेल..त्यांनी प्रदक्षिणा पण पूर्ण केली नसेल.. पण त्यांना मिळालेलं पुण्य इतरांपेक्षा अधिक होतं. कारण ते पर्यावरण प्रेमी होते.. आणि निसर्गावर प्रेम करणारे होते.. जागरूक नागरिक होते.. आणि म्हणून तेच खरे देशप्रेमी होते.

First Published on: August 28, 2022 3:00 AM
Exit mobile version