पॉलिटिकल आयडॉल

पॉलिटिकल आयडॉल

शूर आम्ही सरदार,आम्हाला काय कोणाची भीती !
देव देश अन धर्मासाठी, फूट जाहली मोठी !!
सेनेच्या तालमीत मिळाली झुंजायाची रीत,
तलवारींचं चिन्ह लाभलं तिज ढालीची साथ
लाख टीकांना सोसून टिकवू जुनी आमची नाती !!

या दमदार परफॉर्मन्स नंतर माईक सावरत येत आहेत आपले पुढील स्पर्धक देवेंद्रजी फडणवीस

एकाच या टर्मी जणू
फिरुनी पुन्हा जन्मेन मी,

आशा पदाची डोळ्यात माझ्या
फुलतील कोमेजल्या वाचूनी
मुख्य असो वा उपमुख्य जरी
या चालणार्‍या खेळातूनी
हरवेन मी, जिंकेन मी
किती लावा जोर तरी पुन्हा येईन मी!

या बहारदार गीतानंतर आपलं गीत सादर करण्यासाठी येत आहेत, आपले पुढचे स्पर्धक उद्धवजी ठाकरे

उद्धवकाळ येता येता, काळरात्र झाली
अरे बाण-धनुष्यांच्या या बनवूया मशाली

आम्ही बंड सरण्याची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्यांची वाट का पहावी
कशी कमळाबाई तिकडे हसत आहे गाली
अरे बाण धनुष्यांच्या या बनवूया मशाली

वाह ! वाह! या नंतर ह्या एपिसोडला आणखी रंगतदार करण्यासाठी येत आहेत रंगाशी नाते असलेले आपले पुढचे स्पर्धक राजजी ठाकरे!

रंगुनी रंगात सार्‍या, रंग माझा वेगळा,
गुंतुनी पक्षात सार्‍या पाय माझा मोकळा,

कोण जाणे कोठुनी ही पक्षास आली अवकळा
लाख जणांच्या सभा तरी मतपेटीतुन खुळखुळा
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा भाषणाचा सोहळा

या दर्दभर्‍या गीतानंतर पुढील गीत सादर करण्यासाठी येत आहे, अजितदादा पवार..!!

टिक टिक वाजते डोक्यात
धडधड वाढते ठोक्यात
कधी आघाडी कधी युती,
संपते अंतर झोक्यात
नाही जरी खुर्चीवरी तरी असे तिथे माझ्या मनाने
कोणी असो सत्तेवरी काम चालते जोमाने
नुसते पदांचे शो-पीस नको
कधी दिसेल मी ‘वर्षा’त ?

ह्या गीतानंतर एक हिंदी गीत सादर करण्यासाठी येत आहे, आपले पुढील स्पर्धक दस्तुरखुद्द श्री. नरेंद्रजी मोदी..

चल चला चल
फकीरा चल चला चल

जिसने लिया संकल्प सभीके
अच्छे दिनोको लाने का
उसपे हंसा जग उसने कभी
ना पाया साथ ज़माने का

ले ले अमितभाय का साथ
थाम के नितीनजी का हाथ
निर्मलाको भी लेके देशके बजेटको संवार
हिम्मत न हार
चल चला चल
अकेला चल चला चल
फकीरा चल चला चल

या राजकीय गीतांच्या बहारदार मैफिलीचा समारोप करण्यासाठी येत आहेत, एक सामान्य मराठी माणूस!

मी भोंगा लावला नाही,
मी डीजे लावला नाही
मी भजनातून, दिंडीतून
कधी टाळ वाजवला नाही
भवताली संगर चाले.
ती ब्रेकिंग न्यूज पाहताना
कोणी सेनेला भिडताना
कोणी राष्ट्रवादी लढताना.
मी घंटी होऊनी पडलो
आरतीच्या ताटी जेव्हा
ती वाजवायला देखील
मज कोणी उचलले नाही

–सौरभ रत्नपारखी

First Published on: October 23, 2022 3:00 AM
Exit mobile version