पाठ्यपुस्तकांना धर्माचा रंग नको

पाठ्यपुस्तकांना धर्माचा रंग नको

बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणा-या इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात असलेल्या ईदगहा पाठाच्या अनुषंगाने नुकताच आक्षेप नोंदविला गेला. त्या पाठातून एका विशिष्ट धर्माच्या विचाराचा प्रसार व प्रचार होतो अशा आशयाचा तो आक्षेप होता. बालभारतीच्या संचालकानी तात्काळ त्यासंदर्भाने खुलासाही केला. पाठ्यपुस्तकातील आशय वादग्रस्त का केले जातात हा खरा प्रश्न आहे. सरकारी पाठ्यपुस्तकांकडे एका विशिष्ट नजरेतून पाहून चालणार नाही. पुस्तकातील आशयाकडे समग्रतेने पाहण्याची गरज आहे. पाठ्यपुस्तकांचे विश्लेषण विवेकबुध्दीने व्हावला हवेच. प्रत्येकजण आपल्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक दडलेल्या भावनेने पाठ्यपुस्तकातील आशयाकडे पाहू लागेल तर प्रत्येक आशयात वादग्रस्त काहींना काही सापडण्याची शक्यता अधिक असते. कोणत्याही देशातील पाठ्यपुस्तके हे भविष्याच्या उज्ज्वल पेरणीसाठी असतात.

पाठयपुस्तकांकडे निरपेक्षतेने पाहिले नाही तर भविष्यात अंधारच पेरला जाण्याची शक्यता अधिक आहे. आपल्याला भविष्यातील समाज कसा हवा आहे? त्यासाठी पाठ्यपुस्तकातील आशयाची निर्मिती केली जाते. सरकारी व्यवस्थेत पाठ्यपुस्तक निर्मितीत अनेक निकषाचे काटेकोर पालन करावेच लागते. त्यामुळे खासगी पुस्तकांसारखे एखाद्या विशिष्ट विचाराकडे झुकणे असे सरकारी पाठ्यपुस्तकात होणे अशक्यच असते. शिक्षणाला राजकीय विचारधारेच्या नजरेतून पहाण्याचा प्रयत्न झाला तर त्या देशाचे भविष्य कधीच प्रकाशमान असण्याची शक्यता नाही. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत तरी राजकीय रंग देऊन चालणार नाही.

शिक्षण प्रक्रियेत पाठ्यपुस्तक संकल्पना अस्तित्वात आली. त्यानंतर जगभरात पाठ्यपुस्तके कमी अधिक प्रमाणात सर्वच देशांनी ती उपयोगात आणली. पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून नेमका काय आशय शिकवायचे आहे हे तरी शेवटच्या स्तरापर्यंत पोहचविण्यास मदत होत असते. देशात अभ्यासक्रम तयार केला जात असला तरी,समग्रतेने अभ्यासक्रमाचा विचार करून स्वतंत्रपणे अध्ययन, अध्यापन करणार्‍या शाळा आणि शिक्षकांची संख्या एक टक्का तरी आहे का, असा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर नाही असेच आहे. शिक्षणासाठी उपयोगात आणली जाणारी पुस्तके ही जगभरात वेगवेगळ्या स्वरूपात उपयोगात आणली जातात. त्यात प्रामुख्याने काही देशात पाठ्यपुस्तके खासगी स्वरूपात प्रकाशित केली जातात.

काही देशात तेथील सरकार केवळ पुस्तकांची शिफारस करते. काही देशात सरकारच स्वतः पुस्तके प्रकाशित करीत असते. आपल्या राज्यात सरकारच पाठ्यपुस्तके प्रकाशित करते. त्यासाठी स्वायत्त असलेल्या बालभारतीची निर्मिती करण्यात आली आहे. बालभारतीच्या वतीने प्रकाशित केली जाणारी पाठ्यपुस्तके राज्यातील शालेय शिक्षणात उपयोगात आणली जातात. पाठ्यपुस्तके प्रकाशित करताना त्या अगोदर राज्यात अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात येते. अभ्यासक्रमाची निर्मिती करते वेळी केंद्र सरकार देशाची गरज, परिस्थिती, आव्हाने, विविध प्रकारचे शिक्षणा संदर्भातील येणारे अहवाल या सर्व परीस्थितीनुसार दिशादर्शक भूमिका घेतली जाते.

ज्यावेळी अभ्यासक्रम विकसित केला जाणार असेल तेव्हा निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन मार्गदर्शक तत्वे मांडली जातात. त्याचबरोबर अभ्यासक्रम आराखडा तयार होत असतो. गाभाघटक, जीवन कौशल्य, मूल्ये,21 व्या शतकाची कौशल्य यांचा विचार अभ्यासक्रमात निर्मिती करताना केला जातो. त्या त्या राज्यातील विद्या प्राधिकरण स्वतंत्रपणे अभ्यासक्रम विकसित करत असते. अभ्यासक्रमाला राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतरच पाठ्यपुस्तकाची निर्मिती केली जाते. यासाठी मोठ्या प्रक्रियेला सामोरे जावे लागते. राज्यातील त्या त्या विषयातील तज्ज्ञ समिती अत्यंत गांभिर्यपूर्वक अभ्यासक्रम तयार करीत असते. त्या अभ्यासक्रमावरती आधारित पाठ्यपुस्तक निर्मिती करताना पुन्हा शासन नियुक्त तज्ज्ञांची समिती पाठ्यपुस्तकातील पाठ, कविता, त्यातील आशयाची अत्यंत जबाबदारीचे भान ठेऊन निवड करते असते. अभ्यासक्रमाची चौकट न मोडता आणि देशाच्या संविधानिक मूल्यांना धक्का न लावता हे घडायला हवे असते. शेवटी त्यातच देशाचे भले आहे.

पाठ्यपुस्तके निर्माण केल्यानंतर त्यातील पाठ, आशयाकडे आपण कसे पहातो हे महत्वाचे आहे. साधारणपणे समाजात रूढ असलेल्या संवाद प्रक्रियेवरती ते अवलंबून असणार आहे. पाठ्यपुस्तकातील आशयाने संविधानिक मूल्यांना धक्का न लावता भविष्यासाठीच्या पिढीसाठी मार्गक्रमण करायचे असते. आपल्या राज्यघटनेत धर्मनिरपेक्षतेचे तत्व अनुसरले आहे. स्वातंत्र्य,समता,बंधुत्वाचा विचार प्रतिबिंबीत आहे. त्याचबरोबर आपल्या देशात विविध जाती, धर्माचे, पंथाचे लोक एकत्रित नांदत आहेत. भाषेतही विविधता आहे. अशावेळी पाठ्यपुस्तक हे केवळ एका धर्माचे, जातीची भूमिका घेणारे असता कामा नये. तसे झाले तर संविधानिक मूल्याचे हणन होईल. त्यातून एकात्मतेला धोका पोहचण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकांतून मानवी मूल्यांचे दर्शनही घडायला हवे. मात्र जगातील धर्माची ओळख व्हायला हवी. त्या त्या धर्माचे संस्थापक, संत, दूत, ग्रंथसंपदा यांच्या विचाराच्या माध्यमातून ओळख करून देताना सत्याची कास न सोडता हे घडायला हवे असते. सत्याची प्रतारणा पाठ्यपुस्तकात होणार नाही हे प्रत्येक संस्थेचे आणि सरकारचे कर्तव्य ठरते.

भारतात आलेली पाठ्यपुस्तके ही इस्ट इंडिया कंपनीने कारभार हाती घेतल्यानंतर आली. 1854 साली चार्ल्स वूड यांच्या तत्कालीन शिफारशीवर आधारित आजची शिक्षण व्यवस्था उभी राहिली. त्यांनी त्यावेळी घेतलेल्या निर्णयात पुस्तकांची जन्मकथा दडली आहे. त्यात प्राथमिक शिक्षणापासून प्रत्येक टप्प्यावरती अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक निर्मिती आणि शिक्षक प्रशिक्षण नोकरशाहीचे नियंत्रण असेल. त्यातून भारतीय मनाचे सांस्कृतिकीकरण करणे. नोकरशाहीतील तळाशी आणि मधल्या पायरीवरील कामासाठी लागणारी कौशल्य शिकविण्याचा हेतू राखण्यात आला होता. सांस्कृतिकीकरणासाठी इंग्रजी भाषेचा उपयोग करणे. भारतातील शाळांना शासकीय मदत हवी असेल तर त्यांनी शासकीय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके स्वीकारणे बंधनकारक असेल. मूळच्या या हेतून येथील मातीत पुस्तके आली. पाठ्यपुस्तकाची संस्कृती रूजली. आरंभी पुस्तके म्हणजे विशिष्ट विचार पुढे घेऊन जाणारी व्यवस्था असेच मानले जात होते.

काही अंशी ते आरंभी ते खरेही असेल. 1868 मध्ये ‘स्टेट्समन’ नियतकालिकामध्ये एक पत्र प्रकाशित करण्यात झाले होते. पुस्तके सर्वत्र सारखी असावीत या सबबीखाली भ्रष्टाचार होत असल्याच्या आशयाचे ते पत्र होते. त्यामुळे सुरूवातीला मिशनरी संस्था आपले हितसंबंध अत्यंत प्रभावीपणे जोपासत असल्याचे म्हटले आहे. ते आरंभी खरे असेल पण 1921 ला प्रशासकिय सुधारणा भारतात झाल्या आणि त्यातून भारतीय मंत्री नेमले गेले. त्यामुळे त्या मूळच्या विचारधारेतही बदल झाले. त्यानंतर स्वातंत्र मिळाले आणि त्या पाठोपाठ देशाचा कारभार राज्यघटनेनुसार सुरू झाला. आपली विचाराची प्रक्रिया, आव्हाने पुन्हा नवे होते.

आपली उद्दिष्टे बदलली आणि त्याप्रमाणे शिक्षणाचा विचार करण्यास सुरूवात झाली. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा फारच अल्प असलेली साक्षरता उंचावणे आणि विकासाची प्रक्रिया गतीमान करण्याचे आव्हान शिक्षणापुढे होते. त्यादृष्टीने शिक्षणाचा प्रवास घडत होता. शैक्षणिक धोरणे घेतली जात होती. अशावेळी पाठ्यपुस्तकांची गरज विविधतेच्या पार्श्वभूमीवरती अधोरेखित होत होती. त्यातून आपल्या पाठ्यपुस्तकांची प्रक्रिया कायम राहिली. राष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची स्थापना झाली. त्यानंतर अनेक राज्यानी स्वंतत्र संस्था स्थापन करून महत्वाचे पाऊल टाकले गेले. त्यामुळे आपल्या गरजांचा विचार करून अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांची निर्मिती होऊ लागली, मात्र हेतू आणि उद्दिष्टांमध्ये आमूलाग्र बदल झाला हे नाकारता येत नाही.

स्वातंत्र्यानंतरही पाठ्यपुस्तकाची गरज दिवसेंदिवस अधोरेखित होताना पहावयास मिळत आहे. राज्यात विषयांच्या अनुषंगाने किमान काही पातळीवर समानता असायला हवी. नेमकेपणाने विद्यार्थ्यांपर्यंत काही पोहचायला हवे त्या दृष्टीने पाठ्यपुस्तके महत्वाची भूमिका बजावत असतात. देशात अद्यापही अनेक शाळांमध्ये पायाभूत सुविधा नाहीत. तेथे किमान समान म्हणून पाठ्यपुस्तके तरी पोहचत आहेत. त्यामुळे मूल्यमापनाची प्रक्रिया समान पातळीवर होण्यास मदतीची ठरते. वर्तमानात पाठ्यपुस्तके म्हणजे समाजात बदल घडवून आणण्यासाठीचे दूत ठरत असतात. अर्थात पाठ्यपुस्तकेच अंतिम आहेत असे अजिबातही नाही, त्यापलिकडे जात शिक्षणात काम होण्याची गरज वारंवार अधोरेखित झाली आहे. मात्र त्यासाठी लागणारी शैक्षणिक पार्श्वभूमी,स्वातंत्रदेखील महत्वाचे असते. पाठ्यपुस्तकांचे महत्व कमी करण्याच्या प्रयत्नांबद्दल बोलले जात असले तरी ते होण्यासाठी लागणारे वातावरण निर्माण होऊ शकलेले नाही.

शिक्षणातील प्रत्येक प्रक्रिया आणि त्यासाठीचा निवडलेला आशय महत्वाचा आहे. तो कोणाची बदनामी करणारा अथवा विशिष्ट हेतूने मुलांच्या समोर जाता कामा नये. त्या आशयाकडे राजकीय चष्म्यातून कोणी बघताही कामा नये. ईदगाह हा पाठ मानवी मूल्यांच्या एका अत्यंत संवेदनशीलतेच्या उंचीवरचा आशय असेलला पाठ आहे. त्या पाठातून पेरल्या जाणार्‍या मूल्यांचा विचार केला जायला हवा. त्यात धार्मिकता नाही आणि धर्माचा विचारही नाही तर केवळ मानवी जीवनाचा उन्नत करणारा प्रेम हाच विचार आहे. जगातील प्रत्येक धर्मात प्रेम हा अंतिम सत्याचा विचार अधोरेखित करण्यात आलेला आहे. तो रूजविण्यासाठी कोणताही धर्मविचार आडवा येता कामा नये. त्यामुळे पाठ्यपुस्तकांच्याकडे पहाण्याची दृष्टी बदलायला हवी. पाठ्यपुस्तकाच्या पलिकडे जात जगातील सर्व धर्माच्या मानवी उन्नतीचा विचार रूजविण्याची गरज आहे..ते पाऊल पडावे आणि अवघ्या समाजात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही भावना माणसांमाणसांत रूजवावी..तो दिवस जेव्हा येईल तेव्हाच समाजाचे भले होणार आहे..

First Published on: January 30, 2022 4:30 AM
Exit mobile version