बँकिंग संबंध

बँकिंग संबंध

–राम डावरे

१. व्यवसाय/उद्योगाचे करंट अकाऊंट बँकेमध्ये ओपन करा :
तहान लागली की विहीर खोदणे ही मराठीत एक म्हण आहे. त्यानुसार आपल्याला कर्जाची गरज लागली की मग बँक आठवते. तसे न करता व्यवसाय सुरू झाला की लगेच एखाद्या चांगल्या बँकेमध्ये आपले करंट अकाऊंट ओपन करा. जसे आपण लग्न करताना मुलीची किंवा मुलाची सखोल चौकशी करतो त्याप्रमाणे बँकेमध्ये खाते खोलताना बँकेची सखोल चौकशी करा. बँक बुडण्याचे प्रमाण हल्ली खूप वाढले आहे. योग्य वेळी बँक शोधताना तुमच्या चार्टर्ड
अकाऊंटंटचा सल्ला जरूर घ्या.

२. बँकेतर्फे मिळणार्‍या विविध सेवांची माहिती घ्या :
बँक तिच्या ग्राहकांसाठी विविध सेवा देत असते. त्या सर्व सेवांची माहिती करून घ्या. आजच्या इंटरनेटच्या युगात बँकेच्या वेबसाईटवर ही माहिती सहज उपलब्ध आहे. प्रत्यक्ष बँकेच्या शाखेत जाऊन त्याची खात्री करून घ्या. काही सेवा फ्री, तर काही चार्जेबल असतात. त्याची अगोदरच माहिती करून घ्या, नाहीतर बँक चार्जेसमुळे आपल्या खात्यातील रक्कम हळूहळू कमी होत जाईल.

३. तुमच्या व्यवसायाबद्दल मधून मधून बँक मॅनेजरसोबत चर्चा करा :
नुसते बँकेमध्ये खाते खोलले म्हणजे झाले असे होत नाही. बँकेच्या मॅनेजरसोबत चर्चा करा. तुमचा बँकेमध्ये खाते खोलण्याचा उद्देश काय आहे याची त्यांना कल्पना द्या. तुम्हाला जर भविष्यात कर्ज लागत असेल तर त्यावरही चर्चा करा.

४. छोट्या कर्जापासून सुरुवात करा :
खाते खोलले आणि लगेच करोडो रुपयांचे कर्ज बँक देते किंवा देईल या भ्रमात राहू नका. कोणतीही बँक लगेच मोठे कर्ज कुणाला देत नाही. तुमचे संबंध बँकेसोबत कसे आहे, किती दिवसांचे आहे, तुमच्या खात्यावर व्यवहार किती झाले हे सर्व बघितले जाते.

५. चेक बाऊन्स करू नका :
बर्‍याच वेळेस आपण कुणाला तरी चेक देतो आणि तो बँकेमध्ये पैसे नसले की बाऊन्स होतो. चेक बाऊन्स बँक
पासबुकमध्ये दिसणे ही फार चांगली बाब नाही आणि असे वारंवार होत असेल तर बँकसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे काळजी घ्यावी.

६. कर्जाचे हफ्ते वेळेवर भरा :
तुम्ही बँक पतसंस्था किंवा कोणत्याही फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले असेल तर त्याचे हफ्ते वेळेवर भरा. कर्ज
थकीतमध्ये जाऊ देऊ नका. आता तुम्ही बँक व फायनान्स कंपनीकडे कर्जासाठी अर्ज केला की त्यांना लगेच कळते तुम्ही आतापर्यंत किती कर्ज कुणाकडून घेतले, वेळेवर फेडले की नाही, कर्ज थकीत होते किंवा नाही ही आपली सगळी कुंडली सिबील (CIBIL) ह्या संस्थेमार्फत लगेच समजते. त्यामुळे आता बँकेला वेड्यात काढणे सोपे राहिले नाही.

७. कोणत्या तरी एका बँकेसोबतच व्यवहार करा :
तुमच्या व्यवसायाचे बँक खाते कुठल्या तरी एका बँकेतच सुरू ठेवा. काही जण अनेक बँकांमध्ये खाते सुरू ठेवतात व त्यावर व्यवहार करतात. लक्षात ठेवा बँकिंग रिलेशनमध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे बँकेचा विश्वास संपादन करणे. त्यासाठी कुठल्या तरी एका बँकेसोबतच प्रामाणिक राहा.

८. बँकेमधून रोख रक्कम काढणे व भरणे याबाबत नेहमी सतर्क राहा :
सेविंग अकाऊंट हे फक्त सेविंग करण्यासाठी असते. त्यात रोख रक्कम भरताना काळजी घ्या. आयकर कायद्यात याबाबत वेळोवेळी वेगवेगळ्या तरतुदी आहेत. त्याची माहिती बँक मॅनेजर किंवा तुमच्या चार्टर्ड अकाऊंटंटकडून करून घ्या. तसेच व्यवसायाच्या करंट अकाऊंटमध्येही रोख रक्कम भरणे व काढणे याला आयकर कायद्यात काही मर्यादा आहेत. त्याची माहिती करून घ्या. काही विशिष्ट मर्यादेनंतरचे रोख व्यवहार आयकर खात्याला कळविणे बँकेलासुद्धा बंधनकारक आहे. मग नंतर आयकर खात्याच्या चौकशीला सामोरे जावे लागेल. आधीच काळजी घ्या.

९. तुमच्याकडे काही सरकारी कराचे देणे थकले असेल जसे की आयकर, जीएसटी, कर्मचारी प्रॉव्हिडंट फंड तर संबंधित डिपार्टमेंट आपले व्यवसायाचे बँक खाते सील करू शकते. तसा कायदेशीर अधिकार त्यांना आहे. त्यामुळे अशी देणी थकणार नाही याचीसुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे.

१०. सुक्ष्म व लघु उद्योगांनी घेतलेल्या कर्जावर असलेल्या व्याजावर सरकार काही सबसिडी देत असते. त्यासंबंधी बँकेला लागणारी कागदपत्रे जसे की उद्यम आधार तुमच्या बँकेला द्या, तसेच सदर व्याज साबसिडी बँकेने आपल्या कर्ज व्याजाला दिली आहे का हे कर्ज स्टेटमेंट काढून खात्री करून घ्या.

११. तुम्ही सुरू केलेले इसीएस कोणत्या तारखेला बँकेमध्ये डेबिट पडणार आहे याच्या तारखा नीट लक्षात ठेवा. त्या तारखेला जर तुमच्या अकाऊंटमध्ये बॅलन्स नसेल तर असे इसीएस परत जातात. मग ते कर्ज हफ्ते म्युचल फंड,
एसआयपी किंवा इन्शुरन्सचे असू शकतात.

First Published on: April 23, 2023 4:00 AM
Exit mobile version