गं भा नको, स्त्री म्हणून जगू द्या

गं भा नको, स्त्री म्हणून जगू द्या

विधवा महिलांचा उल्लेख ‘गंगा भागीरथी’ असा करण्यात यावा, असा प्रस्ताव महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केला . यामागे राज्यातील महिलांना सन्मान मिळवून देण्याचा स्वच्छ हेतू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे, पण या प्रस्तावाला महिला संघटनांकडूनच कडाडून विरोध होत आहे. विधवाच नाही तर सौभाग्यवती आणि कुमारिकांचाही यावर समाजाला एकच प्रश्न आहे. विधवा महिलांच्या नावापुढे गं भा लावून काय होणार आहे? त्याने काय फरक पडणार आहे? आपला समाज बदलणार आहे का? गं भा लावल्याने सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे का? नाही ना? मग कशाला या नसत्या उठाठेवी? असाच सूर समस्त महिला वर्गाने लावला आहे. महिलांच्या या संतापामागच्या भावना पाहता खरचं नावापुढे गं भा लावल्याने त्या विधवेच्या आयुष्यात काही फरक पडेल, असे दृश्य सध्या आपल्या समाजात दूरदूरपर्यंत तरी दिसत नाही.

उलट ती विधवा आहे हे तिचा रिकामा गळा आणि मोकळं कपाळ जितके कोकलून सांगू शकणार नाही तितकं तिच्या नावापुढची गं भा ही विशेषण दुनियेला बोंबलून ही बघा विधवा बाई, नवरा नसलेली, समाजात एकटी पडलेली असं सांगायच काम करतील यात शंका नाही. म्हणूनच विधवा, सिंगल, परित्यक्त्या महिलांना अशा विशेषनामांची आताशा काही तशी गरज उरलेली नाहीये. आपण एकाकी पडलोय अशा असहायतेच्या कुबड्या घेऊन दुसर्‍याच्या जीवांवर जगणारी किंवा जगू पाहणारी आजची स्त्री नाहीये. उलट आजची स्त्री ही खंबीर आहे. सत्य स्वीकारून पुढे जाण्याची तिच्यात हिंमत आहे. पतीची साथ संपणे, त्यानं सोडून देणं म्हणजे आयुष्य संपणे नाही, तर काहीसा पॉझ घेऊन, पतीवियोगाचे दु:ख पचवून पुन्हा नव्याने मुलांच्या कुटुंबाच्या जबाबदार्‍या स्वीकारून ती पुढे जगू पाहत आहे. आजची स्त्री खंबीर आहे. तिला उगाच गं भा वगैरे विशेषण लावून स्पेशल ट्रीटमेंट देण्याचा खटाटोप करण्याची खरं तर काही एक गरज नाहीये. जर सरकारला खरचं या महिलांसाठी काही करायचे असेल तर ते त्यांच सक्षमीकरणं करावं.

वर्षभरापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथेवरच बंदी घालण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला. त्यानंतर हेरवॉर्ड पॅटर्न राज्यभर राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. नंतर विधवा महिलाही सामान्य महिलांप्रमाणे कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र घालू शकतात. यावर समाजाकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले. गावात विधवा महिलांचा मान सन्मान केला जाऊ लागला. त्यानंतर कोल्हापूरमधील देवाळे येथे तर विधवा महिलांनी वटपौर्णिमाही साजरी केली. प्रामुख्याने पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वडाची पूजा करते, पण विधवा महिलांनी मात्र सौभाग्याचे लेन परिधान करून वडाची साग्रसंगीत पूजा केली.

याचेही राज्यभरातच नाही तर देशभरात कौतुक केले गेले. खरंतरं या चळवळीमागचा हेतूही तसा उद्दात आहे, कारण आपल्या समाजात आजही विधवा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन फारसा बदलेला नाही. विधवा महिलांना कार्यक्रमांना बोलावणे अशुभ मानले जाते, पण जसा काळ बदलला. तशी समाजाची मानसिकताही बदलत आहे, पण जे शहरात राहणार्‍यांना जमले नाही ते कोल्हापूर मधील शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावाला जमले. हेच विशेष आहे. छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभेमध्ये ‘विधवा प्रथा बंदी’चा ठराव मांडण्यात आला, त्यावर गावाने एकमुखाने मंजुरी दिली.

नंतर अनेक गावांमध्ये, शहरांमध्ये विधवा महिलांचे हळदीकुंकू समारंभही पार पडले. त्याकडे सरकारचे लक्ष वेधले आणि राज्य सरकारनेही विधवा प्रथेवर बंदी आणली. खरं तर हा निर्णय फार मोठा आहे. जो समाज एकेकाळी पती निधनानंतर महिलेच जगणं निरर्थक समजत होता, तिच्यावर सती जाण्याची सक्ती करत होता, तिचे केशवपण करून तिला घरात डांबून ठेवत होता. तोच समाज आज तिला पुन्हा नव्याने जगण्याची उमेद देत असेल तर हे नक्कीच स्वागतार्ह आहे. मग हे सगळं सुरूळीत सुरू असताना गं भा ची गरज काय? कोणता उ्ददेश डोळ्यासमोर ठेऊन हा प्रस्ताव मांडण्यात आला? हे पण विचार करण्यासारखे आहे. यामागचा हेतू स्वच्छ महिलांना सन्मान देण्याचा आहे, असे जरी असले तरी विधवेच्या नावापुढे ती विधवा असल्याची जशी बिरुदावली लावण्यासाठी सरकारची धडपड आहे तशी धडपड कधी विधूर पुरुषाच्या नावापुढे सरकार करत असल्याचे कधी ऐकले आणि वाचलेही नाही. त्याबद्दल कोण आणि केव्हा बोलणार?

हे सगळं एकीकडे सुरू असताना विधवा महिला पुन्हा नव्याने जगू पाहत असताना त्यांच्या नावापुढे गं भा लावण्याचं कारण काय? म्हणजे एकीकडे तुम्ही विधवा महिलांना सामान्य महिलांप्रमाणे जगण्याचा, राहण्याचा अधिकार देता आणि दुसरीकडे तिच्या नावापुढे ती ‘गंगा भागीरथी’ आहे हे दाखवण्याचा हट्ट करता. बर ते करून त्यातून काही मिळणार आहे का? तर काहीच नाही, पण त्या महिलेची मात्र मानसिक कुचंबणा होणार. जोडीदार कायमचा सोडून जाणे खरंतर हे अगाधं दु:खच आहे, पण म्हणतात ना वक्त हर चीज का मर्ज है, यामुळे माणसं जोडीदार गेल्यानंतरही निसर्गनियमानुसार काळाच्या प्रवाहात स्वता:ला झोकून देतात आणि जगतात. प्रिय व्यक्तीच्या वियोगाने ते आतून कितीही तुटले फुटले असले तरी ते जगतात. नव्हे त्यांना जगावंच लागंत. त्यातही जर ती स्त्री असेल तर पती निधनानंतर काहीजणींना समाजाकडून, जवळच्या व्यक्तींकडून तिच्या जबाबदारीच्या धास्तीने किती पद्धतशीरपणे साईडलाईन केलं जातं हे तिचं तिलाच ठाऊक. जरी आज काळानुरुप यात बदल होत असला तरी तो तसा वरवरचा आहे.

आजही आपला समाज एकाकी पडलेल्या स्त्रीकडे आणि सामान्य स्त्रीकडे विशिष्ट दृष्टीकोनातूनच बघतोय. कोल्हापूरकरांनी मोठ मनं करत या विधवा स्त्रियांना जगण्याच बळ दिलयं. त्यामुळे कमीत कमी ग्रामीण भागातही या महिलांबद्दल विचार करणारा समाज आकार घेत असल्याचं तरी जगासमोर आलयं. विशेष म्हणजे फक्त बाता न मारता त्यांनी विधवा महिलांसाठी थेट कृतीतूनच आपले विचार मांडले आहेत. याचा कित्ता आता सगळ्या समाजानेच खरं तर गिरवायला हवा. विधवा किंवा एकाकी महिलांच्या नावापुढे विशेषण लावत त्या पती नसल्याने सामान्य राहिल्या नाहीत याची जाणीव करून देण्यापेक्षा अशा महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने विशेष नावाच्या योजना आखाव्यात. ज्यामुळे या महिलांना पती गेल्यानंतर जी आर्थिक आणि सामाजिक कसरत करावी लागते त्यातून त्यांची सुटका तरी होईल. गं भा ची नाही त्यांना गरज आहे ती त्या सामान्य महिलाच आहेत, त्यांनाही इतर महिलेप्रमाणे जगण्याचा विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे हे प्रत्यक्षात दाखवून देण्याचे. यामुळे सरकारने विशेषणाचे कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्षात या महिलांसाठी भरीव कामगिरी करावी, अशी आजच्या महिलांची मागणी आहे.

First Published on: April 16, 2023 4:00 AM
Exit mobile version