आरक्षणावर हुकमी ‘फण्टा’स्टिक तोडगा?

आरक्षणावर हुकमी ‘फण्टा’स्टिक तोडगा?

-अरविंद जाधव

जुनी नाटके पुन्हा नव्याने येण्याचा ट्रेन्ड काही काळ होता. अलीकडेही तो दिसून येतो, मात्र काही नाटके इतकी कालातित असतात की त्यांचा ब्रॅण्ड तयार झालेला असतो किंबहुना त्यांच्या विषयाच्या वास्तवाला काळाची मर्यादा नसते. अशी काही बहुचर्चित अर्थात गाजलेली नाटकं असतात. त्यातील मोजकीच नाटकं आहेत.

त्यातील एक नाटक म्हणजे नुकतंच नव्यानं रंगभूमीवर आलेलं संजय पवार लिखित ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ नवनीत आणि सुबोध पंडे प्रॉडक्शनने हे नाटक रंगभूमीवर आणलं आहे. पूर्वी ज्याप्रमाणे यशस्विता या नाटकाने मिळवली होती तशी आताही शक्यता व्यक्त करायला लावणारी उत्सुकता आहे. मुळात नाटकाच्या आशयाचा विचार करता विचारप्रधान, विवेचनात्मक किंवा चर्चा नाटक असे आपण म्हणतो.

असे असेल तर त्या नाटकातील गंभीर क्लिष्ट संवाद असू शकतील असे काहींना वाटते, परंतु संजय पवार यांच्या लेखनशैलीचा व विषयाचा आवाका पाहता विषयाचा थेटपणा, संवादातील सहजपणातून अलगद प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो. ते स्तंभलेखक, पटकथा, संवाद लेखक तसेच बहुमाध्यमिक जाणतं व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. आम्ही जातो आमच्या गावा, चोख्याच्या पायरीवरून, दोन अंकी नाटक, साती साती पन्नास, सती, १९४७ टू एके ४७, गाईच्या शापाने अलीकडील ठष्ट, बाई वजा आई यांसारख्या नाटकांतील त्यांचे विचार उत्तम आधुनिक अनुबंध जोडतात.

‘कोण म्हणतं टक्का दिला?’ हे १९९० च्या काळातील नाटक होय. त्या काळात लोकप्रियता मिळविणारं हे नाटक आरक्षणावर भाष्य करणारं होतं. मंडल आयोग आणि त्यानिमित्त होणारी चर्चा यामुळे नाटकाच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. त्यावेळी उपेंद्र लिमये यांनी या नाटकात मुख्य भूमिका साकारली होती. आजही आरक्षणाचा विषय ऐरणीवर असताना पुन्हा नव्याने या नाटकाने रंगभूमीवर पदार्पण करणं म्हणजे पुन्हा आपल्याला आरक्षण, जातीयता, धार्मिकता, वर्गवारी, वाढती सामाजिक दरी व त्याची भीषणता याचा गंभीर विचार करायला लागणारं, प्रत्येक काळातील वर्गभेदाला प्रश्न विचारणारं हे नाटक आहे असं वाटतं.

पहिल्या अंकात पौराणिक मिथकावर आधारित कथा सांगितली आहे. राक्षस कुळातील दानवांचे गुरू शुक्राचार्य यांना संजीवनी विद्या ज्ञात होती. ती विद्या मिळवण्यासाठी कच राक्षस लोकात येतो. कच हा देवकुळातील असतो. तिथे शुक्राचार्यांची कन्या देवयानीच्या प्रेमात पडतो. हे समजल्यावर राक्षस त्याला मारतात व त्याची पावडर करून शुक्राचार्यांच्या दारूत मिसळतात. त्याला जिवंत करावं म्हणून देवयानी विनंती करते. मुलीच्या प्रेमाखातर शुक्राचार्य संजीवनी मंत्राद्वारे कचाला जिवंत केल्यावर आधीच पोटातून संजीवनी विद्या घेऊन आल्यावर कच पुन्हा देवयानीस नकार देऊन पुन्हा देवलोकात जातो. याचवेळी शुक्राचार्यांचा मृत्यू झालेला असतो.

पुढे कचाच्या या वागण्यावरून देवयानी त्याला शाप देते की, विसाव्या शतकाच्या अखेरीस मानवलोकात, भूतलावर कचास मागासवर्गात जन्म घ्यावा लागणार, मात्र कायद्याने सवर्णांच्यात वाढावे लागणार व संजीवनीचा मोह धरल्याचा पश्चाताप होईल. अशी मिथक कथा उभी केली आहे. आरक्षणाच्या सवलतीस ५० वर्षे झाल्याने केंद्र सरकारने एक अध्यादेश काढला की सवलतींमुळे समाज वर्णवर्गविरहित झाला तरी एकात्मता साधली गेली नाही. ती साधण्यासाठी प्रत्येक उच्चवर्णीय कुटुंबात एक मागासवर्गीय पुरुष किंवा स्री ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे.

त्याशिवाय रेशनकार्ड, गॅस, पासपोर्ट उपलब्ध होणार नाही, असं अध्यादेशात सांगण्यात आलेलं असतं. त्याचं कमलाकर आराध्ये या कुटुंबालाही पालन करायचे असते. त्यानुसार त्यांच्या कुटुंबात ‘कचर्‍या धीवार’ नावाचा मागासवर्गीय राहायला येतो. त्या कुटुंबातील कमलाकर आणि त्यांची मुलगी सुकन्या पुरोगामी विचारांची तर पत्नी विमलाबाई व मुलगा सुदर्शन याविरुद्ध विचारसरणीचे असतात. सुकन्या कचर्‍याचे नामकरण ‘कच’ असे करते. तो या कुटुंबात मिसळतो. त्याचे व सुकन्याचे प्रेमसंबंध जुळतात, मात्र विमलाबाई व सुदर्शन त्याला जाती व संस्कृतीवरून बोलत असतात.

कच-देवयानी व आधुनिक काळातील कच-सुकन्या यांचा समान धागा गुंफत फॅण्टसीने नाटकाचा आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. आरक्षणापलीकडे सामाजिक समता निर्माण होण्याकामी दलिताने सवर्णांच्या घरात राहून कुटुंबाचा भाग बनणे ही कल्पना काहींना पचनी पडणारी नसली तरी त्यातून जातीधर्म, वर्णभेदविरहीत समाज उभा राहिला पाहिजे आणि प्रत्येकाने माणूस म्हणून जगले पाहिजे असा विचार मांडला गेला आहे.

यातून लेखक उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय दांभिकतेवरही कोरडे ओढतात. कमलाकर आराध्ये यांचं शांत संयत आधुनिक विचारसरणीचं असणं हा अपवादात्मक वर्तनभेद अतिशयोक्ती नाही. मिसेस नाडकर्णींच्या बोलण्यातील विडंबन विनोद असला तरी वास्तव नाकारत नाही. कचर्‍याचं अध्ययनशील विचारवंत असणं व तसे बेधडक परिवर्तनवादी विचार मांडणं, सुकन्याचं पुरोगामीत्वाला प्रत्यक्ष अंगीकारणं, विमलाबाई व सुदर्शन यांचं आधुनिक काळातही जातीयतावादी असणं ही समाजातील प्रातिनिधिक रूपं जरी उभी केलेली असली तरी ती काळाप्रमाणे कमी-अधिक असणारच आहेत.

सामाजिक-सांस्कृतिक राजकारणाने ढवळून निघणारी परिस्थिती आणि यावर विचारवंतांचे विदग्ध विचार प्रेरक ठरतात. तसे रंजनातून लोकांना अधिक सहजपणे मनात विचार रुजवण्यासाठी वैचारिक नाटकांची गरज पूर्ण करणार्‍या नाटकांत हे नाटक येतं.

नाटकातील काही प्रसंग कचर्‍याला कुटुंबाचा सदस्य स्वीकारायला सुदर्शन तयार नसतो, तेव्हा तो म्हणतो, प्रत्येक जातीजमातीचं स्वत:चं असं एक अंगभूत सौंदर्य असतं. या मताचा विचार करून तो कायद्याने दलित कुटुंब सदस्याविरोधात स्टे यावा म्हणून सुप्रीम कोर्टात जातो. विमलाबाई त्याला दुजोरा देते. कमलाकर-सुदर्शन पिता- पुत्रातील वैचारिक भेदातील संघर्ष कथानकाला साजेसा भाग तसे मुलीचे विचार खूप स्वातंत्र्य मुक्त आहेत. येथे एकाच कुटुंबातील विचारांचा विरोधाभास एकाच देशातील लोकांच्या विचारांसारखा मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

मिसेस नाडकर्णी-विमला संवादातून एकमेकांच्या घरातील दलित व त्याच्या वेगळेपणावर त्या बोलतात. टोराला घरी आणण्याचे कारण तो जिम्नॅस्टिकचे प्रयोग करून ऑलम्पिकला एखादं मेडल आणू शकेल, असं सांगतात, तर कच मात्र फक्त डिबेट करतो, असे विमला सांगतात. कचर्‍या आधुनिक विचारांचा दलित युवक आहे. उच्चवर्णीयांमध्ये पश्चातापापेक्षा उपकाराची भावना दिसते म्हणून तो म्हणतो, तुम्ही नुसतेच बदललो म्हणता, चुकलोय म्हणतच नाय.

यात अपराध ज्या वृत्तीचा तिने तो स्वीकारावा असे सांगण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय सुदर्शन बुद्ध इथलाच म्हणणारा तो बौद्ध होण्यास तयार नाही. तत्त्वज्ञान स्वीकारतो यातून दुहेरी वर्तन दाखवतो. सुदर्शनचं हे एकाच तागडीत शंकराचार्य आणि बुद्ध, सावरकर आणि आंबेडकर ठेवणे कचर्‍याला पटत नाही. या अशा अनेक वैचारिक भेदातून संघर्ष वाढलेला दिसतो. कचर्‍याचा स्वसंघर्षही तितकाच आहे. माणसं देवाचं नाव घेऊन राक्षसासारखी वागतात. माणूसच माणसाला स्वीकारायला तयार नाही.

विचार मांडणीसाठी विशिष्ट आावाज देहबोली याचा समन्वय साधल्याने भूमिकेची छाप पडावी असा प्रयत्न होताना दिसतो. सर्व टीमचे प्रयत्न योग्य आहेत. एखाद्या नाटकाला विषयाच्या वेगळेपणामुळे उंची मिळते ती बहुधा भाषा, संवाद व विचार याच्या बळावर तसे या नाटकाच्या बाबतीत होऊ शकते. या नाटकाच्या पुन्हा रंगभूमीवर येण्याविषयी समाजमाध्यमांवर लेखक संजय पवार सांगतात, हे नाटक लिहिलं तेव्हा मंडल आयोग लागू झाला होता.

मंदिर-मशीद वाद होता. मंडल आयोगाची सामाजिकता बाजूला सारून प्रत्येक जातीला आपली संख्या कळली. या काळातच एकपक्षीय राजवट मागे पडून बहुपक्षीय सरकारं सत्तेत यायला लागली. अंकगणिताला महत्त्व आलं. प्रत्येक जातीला वाटू लागलं आपल्या जातीची इतकी मतं आहेत. त्यामुळे नंतरच्या काळात मंडल आयोगाचा सगळा सामाजिक बाज पूर्णपणे राजकीय होत गेला. आता जी सगळ्यांना आरक्षणं हवी आहेत, ती राजकारणासाठी हवी आहेत या लेखकाच्या विधानावरून लक्षात येते की या नाटकाद्वारे लेखकाने सामाजिक दरी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रत्येक काळात माणसाला संधी हवी आहे. त्यात संधीसाधू असणारच. जात संपली असं म्हटलं जातं, पण ती जात नाही. आरक्षणाने त्यात फरक पडू शकतो असं वाटतं. सर्वांना समान संधीचा अधिकार खरंतर हवा आहे. नाटकातून एका फँटसीद्वारे भेदाच्या भिंती दूर करण्यासाठी आरक्षणाच्या तिढ्यावर कालातित ‘फँटा’स्टिक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. प्रायोगिक ते व्यावसायिक रंगभूमीवर हे नाटक वैचारिक उत्सव साजरा करीत आले आहे, करीत राहील, असे यानिमित्त म्हणायला हरकत नाही.

नवनीत प्रॉडक्शन निर्मित व सुबोध पंडे, प्रॉडक्शन्स प्रकाशित, नाटक : कोण म्हणतं टक्का दिला?, लेखक : संजय पवार, दिग्दर्शक : सुबोध पंडे, नेपथ्य : संदेश बेंद्रे, संगीत : अजित परब, प्रकाशयोजना : शीतल तळपदे, कलाकार : प्रिया मराठे, सुबोध पंडे, संयोगिता भावे, राहुल पेठे, पल्लवी वाघ-केळकर आणि अनिकेत विश्वासराव.

First Published on: April 7, 2024 5:00 AM
Exit mobile version