चोरी…एक मानसिक अतृप्तता

चोरी…एक मानसिक अतृप्तता

संध्याकाळी रोजच्याप्रमाणे मैदानाला फेर्‍या मारत होतो. आजूबाजूला अनेक वयोवृद्ध बसले होते, त्यांची सध्याच्या राजकारणावर चर्चा चालू होती. काहीजण तावातावाने सध्याच्या सरकारवर आपला रोष प्रकट करत होते, काहीजण गप्प बसून त्यांचे वादविवाद ऐकत होते. या सर्व वादविवादाचे अनेक प्रेक्षक आजूबाजूला जमले होते. हे मैदान म्हणजे एक कोडंच आहे. अनेकजण अनेक उद्योग येथे एकाचवेळी करत असतात. कोणी आजीबाई आपल्या नातवांना खेळवत असतात. कोणी आजोबा आपले धार्मिक पुस्तक वाचत बसलेले असतात. आया आपल्या मुलांना तिथल्या खेळाच्या साधनांवर खेळवत असतात. प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतलेला असतो. एखादे प्रेमीयुगुल त्याठिकाणी गुंजारव करत असते, एकूण याठिकाणी गजबज आहे.

याचवेळी मैदानाच्या मागील बाजूने एक मुलगा धावत मैदानात आला त्याच्यामागे चारपाचजण धावत आले. कोणतरी पकडो ….उसको ..पकडो. वो चोर है म्हणत ओरडत धावत होते. मैदानातल्या कोण सद्गृहस्थाने त्या मुलाला पकडले. तेवढ्यात ते चारपाचजण तिथे आले आणि ये लडका चोर है, म्हणत त्या गृद्गृहस्थाकडूनन त्या मुलाला आपल्याकडे खेचत होते. तेव्हा त्या गृहस्थाने चौकशी केली की, या मुलाने नक्की काय केलं?

सर्व चौकशी केल्यानंतर कळलं की, हा मुलगा रोज त्या ढाबा असलेल्या ठिकाणी भीक मागतो. आज त्या दुकानदाराने त्याला भीक म्हणून खायला द्यायला नकार दिला. तरी हा मुलगा तिथेच बसून राहिला, शेवटी दुकानदाराचं लक्ष नाही बघून त्याने त्या खाण्यातली दाबेली उचलली. ते तिथे असलेल्या लोकांनी बघितलं आणि दुकानदाराला सांगितलं तेव्हा तो दुकानदार आणि इतर काहीजण ह्या मुलाला पकडायला धावले. त्यापैकी अनेकांचं मत हे होतं की, एवढ्या लहानवयात जर चोरीची सवय लागली तर पुढे हा मोठा गुन्हेगार होईल. व्यावहारिकदृष्ठ्या ते बरोबर होते.

त्या सद्गृहस्थाने त्या लोकांना थांबवून त्या मुलाची बाजूदेखील समजून घेऊया म्हणत त्या मुलाला विचारले. तेव्हा तो मुलगा म्हणाला, त्याचे आईबाबा कचरा गोळा करतात. त्यातून कधी जेवण मिळतं कधी नाही मिळत. त्या मुलाला कोणी काम देत नाही. आज त्याच्या मित्रांनी ज्या दुकानातून त्याने चोरी केली त्या दुकानातून दाबेली खाल्ली आणि त्या दाबेलीच्या चवीची प्रशंसा केली. साहजिकच त्या मुलाला ती दाबेली खावीशी वाटली. तो मुलगा त्या दुकानाजवळ गेला आणि तेथे येणार्‍या गिर्‍हाईकांजवळ दाबेली द्या म्हणून याचना करू लागला. त्याला कोणी दाबेली दिली नाही. आयुष्यात कधीही दाबेलीची चव न चाखलेल्या त्या मुलाला शेवटी पर्याय उरला नाही. त्याच्या बालमनाने समोरची दाबेली उचलली. त्या मुलाने हा प्रसंग वर्णन केला. त्या गृहस्थाने खिशातील दहा रुपयाची नोट काढून त्या चार-पाच माणसात उभा असलेल्या त्या दुकानमालकाला देऊ केले. त्या दुकानदाराने ते पैसे घेतले नाहीत, ती चार-पाच माणसे निघून गेली. बाकीची माणसं त्या गृहस्थाजवळ आणि त्या मुलाच्या जवळ उभी राहिली.

त्या मुलाचं खाण संपलं. थोड्यावेळाने कोणी दोन दाबेली मागून त्या मुलाला देऊ केल्या. तो मुलगा निघून गेला. त्या मुलाकडे बघून मला मधुभाई कर्णिक यांच्या गोकुळ या कथेतला लहानगा बाळकृष्ण आठवला. ही कथा मी आधी वाचली होती, पण माझ्या लहानपणी ती कथा दूरदर्शनवर लागत असलेल्या ‘एक कहाणी’ या सिरिअलमध्ये बघितली होती. ती कथा मनावर आजही गारुड करून राहिली होती. ती कथा थोडक्यात अशी होती.

कोकणातील एक सुतार कुटुंब होते, जे सुतारकी करून आपला उदरनिर्वाह करत असे. पण त्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होते.त्यामुळे त्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती होते. त्या कुटुंबाची मालकीण मजुरी करून मुलांचे संगोपन करत असते. तिचा मोठा मुलगा नोकरीसाठी मुंबईला गेलेला असतो. हा एक मोठा आधार त्या कुटुंबाला असतो. त्या घरची एक म्हैस थोड्या दिवसात विणार असते, अर्थात मुलांच्या मनात म्हशीचं दूध पिण्याचे इमले बांधायला सुरुवात होते. थोड्या दिवसात म्हैस विते, त्या कुटुंबाची मालकीण दुकानातून उदारीवर सामान आणून खरवस बनवते. तेवढ्यात मुंबईहून मोठ्या मुलाची नोकरी गेल्याचं पत्र येते. त्याक्षणी ती मालकीण दुधाचा रतीब हॉटेलवाल्याला द्यायचा ठरवते. रोज थोडा मोठा मुलगा आणि सोबत तो लहान मुलगा, बाळकृष्ण दुधाचा रतीब द्यायला हॉटेलला जातात.

असे सातआठ दिवस गेल्यानंतर एक दिवस छोटा बाळकृष्ण आपल्या मोठ्या भावाला दुधाची चव कशी असते म्हणून विचारतो. त्यावर मोठा भाऊ आपल्या लहान भावाला विचारतो की, तू दुधाची चव कधी चाखली नाहीस का? त्यावर तो लहान, बाळकृष्ण आपण दूध कधी पियालो नाही असे मोठ्या भावाला सांगतो. तेव्हा तो मोठा भाऊ आपल्याकडील दूध बाळकृष्णाला प्यायला सांगतो. तो छोटा बाळकृष्ण ते दूध पितो. त्याबरोबर तो मोठा भाऊ बाळकृष्णाला शेजारच्या कोणाबरोबर घरी पाठवतो आणि स्वतः मात्र पाणवठ्यावर जाऊन उरलेल्या दुधात पाणी टाकून दुधाचे भांडे काठोकाठ भरतो. कथा तिथेच संपते. मग मनात प्रश्न उभे राहतात. खरोखरच मोठ्या मुलाचं वागणं बरोबर होतं का ? तो छोट्या भावाची समजूत घालू शकत नव्हता का ? किंवा त्या भीक मागणार्‍या मुलाला ते गृहस्थ समजावून देऊ शकत नव्हते का ? या दोन्ही प्रसंगात मुलांनी केलेल्या चोरीचं समर्थन केलेले आढळते. दोन्ही प्रसंग हे साधर्म्य साधताना दिसतात. मग ह्या दोन्ही प्रसंगात मुलांना दोष देता येत नाही.

बालमानसशास्त्र देखील हेच सांगते की, एखादी गोष्ट मुलांना मिळत नसेल तर त्यांच्या मनात त्या वस्तूची अभिलाषा निर्माण होते. त्यातून ती वस्तू मिळवण्यासाठी त्यांच्याकडे जेव्हा पर्याय रहात नाही तेव्हा ते चोरीचा मार्ग अवलंबतात. यासाठी पालकांना तरी किती दोष द्यावा? ह्या दोन्ही प्रसंगातली मुलं भूक या एका संज्ञेसाठी धडपडताना दिसतात. पण समाजात वावरत असताना असे अनेक प्रसंग अनुभवास येतात. भूक ही प्राथमिक गरज असते. पण चैनीची वस्तू चोरी करताना देखील हीच मानसिकता दिसून येते. एखादी गरज पालक भागवू शकत नाहीत तर मुलं सर्रास वाममार्गाने ती वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करतात.

याप्रसंगी चूक कोणाची ? कुवतीबाहेर पालक खर्च करू शकत नाहीत तर त्यांची? की, पालकांची परिस्थिती समजून न घेता त्यांना वेठीस धरणार्‍या मुलांची? की एकंदरीत समाजाची? पालक म्हणून आपण ह्या गोष्टीचा किती विचार करतो.आपण जेव्हा पालक म्हणून एखादं महागडं ग्याजेट मुलांना देतो तेव्हा इतर मुलांना काय वाटेल याचा कितपत विचार करतो? केवळ आपल्या पालकांनी आपले असे लाड केले नाहीत किंवा आपल्याला असे महागडे खेळ आपल्या पालकांना घेऊन देता आले नाहीत, आता आपली परिस्थिती आहे म्हणून मी माझ्या मुलाला का देऊ नये? ही मानसिकता समाजरचना बिघडवायला जबाबदार नाही का ?

दुसर्‍या बाजूने जेव्हा हा विचार करतो की, लहानपणी अनेक गुन्हे करणार्‍यांपैकी 3 टक्के मुलचं गुन्हेगारीकडे वळतात हे सांंख्यिकीय प्रमाण लक्षात घेता, शेकडा तीन मुलं हे प्रमाण तसं फार नाही, पण ही प्रवृत्ती निर्माण होण्यासाठी समाज तेवढाच जबाबदार आहे. कारण गुन्हेगारीची शिक्षा भोगून आल्यावर किती लोकांना समाज आपले मानतो? एकदा तो ठप्पा लागला की, त्या माणसाचं जगणं असह्य होतं. काल मी बघितलेला प्रसंग असो किंवा मधुभाईंची कथा असो, दोन्ही प्रसंग प्राथमिक गरज भागवण्यासाठी किंवा उत्सुकता शमवण्यासाठी चोरीचा आधार घेतात. म्हणून ती चोरी नाही असे म्हणता येत नाही. बालगुन्हेगारांना भेटल्यावर ह्यासारखे छोटे छोटे गुन्हे त्यांच्या परिस्थितीला कारणीभूत असल्याचे चित्र पहायला मिळते. हे सत्यदेखील विदारक आहे. समाज रचना बिघडवून टाकायला कारणीभूत आहे, हे मात्र नक्की.

First Published on: July 11, 2021 3:30 AM
Exit mobile version