बदलत्या ग्रामीण जीवनाची ‘कुरवंडी’

बदलत्या ग्रामीण जीवनाची ‘कुरवंडी’

–नारायण गिरप

सिंधुदुर्गमधील वृंदा कांबळी यांची ‘कुरवंडी’ ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. पेशाने शिक्षिका असलेल्या वृंदा कांबळी यांचे याअगोदर बरेच साहित्य प्रकाशित झाले आहे. नाते मातीचे, रंग नभाचे, भरलेले आभाळ, अंतर्नाद हे कथासंग्रह तर अतर्क्य, प्राक्तनरंग, मागे वळून पाहता, प्रतिबिंब इत्यादी कादंबर्‍या आणि वळणवेड्या वाटा, वाटेवरच्या सावल्या हे ललितलेख संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. सिंधुदुर्गातील वेंगुर्ला येथे आनंदयात्री वाङ्मय मंडळाची स्थापना करून त्यांनी त्रैवार्षिक साहित्य संमेलनाची सुरुवात केली आहे. याच मंडळातर्फे त्या विविध साहित्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात.

‘कुरवंडी’ या कादंबरीत बदलत्या ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब उमटले आहे. कोकणात पर्यटन व्यवसाय वाढत आहे. खेडोपाडीही अनेक उद्योगधंदे सुरू होताहेत. कोकणच्या बाहेरील लोकही येथे हातपाय पसरत आहेत. ग्रामीण जीवनाचा चेहरामोहरा फार झपाट्याने बदलत आहे. नागरी संस्कृतीचे आक्रमण फार झपाट्याने वाढत आहे. फॅशनच्या नावाखाली चालीरिती, सणवार, उत्सव, परंपरा यांचा विसर पडत आहे. ग्रामीण संस्कृतीचे एक वेगळेच रूप दिसत आहे. ऐहिक सुखांचा माणसांचा हव्यास वाढत आहे. नाविन्याच्या नावाखाली अनेक गोष्टी खेडोपाडी पसरत आहेत. तरुण मुलींचे रेकॉर्ड डान्ससारखे कार्यक्रम व स्पर्धा गावागावातून होत आहेत. पालकही आपल्या मुलींना डान्ससाठी प्रवृत्त करीत आहेत.

कला म्हणून त्याकडे पाहणे हे ठीक आहे, पण पैसा व प्रसिद्धीचा हव्यास आणि कलासक्ती यातील सीमारेषा अंधूक आहे. ती समजून घेतली जात नाही. बेसावध राहिले तर तरुण मुलगी शोषणाची कशी बळी होते हे या कादंबरीत प्रभावीपणे दाखविले आहे. यशस्वी वाटत असणारी तरुणीच्या जीवनाची वाटचाल एका निसरड्या मार्गावरून कधी सुरू होते हे समजतच नाही. नायिका घरासाठी एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्टची नोकरी स्वीकारते. मागच्या भावंडांचे शिक्षण व घरखर्च भागून वडिलांना आपण आधार होतोय हा तिचा आनंद फार काळ टिकू शकत नाही. नोकरीच्या ठिकाणी आपण पूर्णपणे जाळ्यात अडकलो आहोत हे तिच्या लक्षात येईपर्यंत खूप उशीर होतो. कुटुंबाच्या कल्याणासाठी ती आपल्या जीवनाची कुरवंडी देते.

नायिकेच्या जीवनाची कहाणी कुरवंडी ही कादंबरी वाचूनच समजून घ्यावी. नायिकेच्या जीवन प्रवासाबरोबरच कादंबरीत अनेक व्यक्तिरेखा आल्या आहेत. त्यावरून मानवी स्वभावाचे लेखिकेचे निरीक्षण दिसून येते. भोवतालचा निसर्ग, लोक, लोकांच्या समजुती, सणवार, उत्सव, फळे-शेती इत्यादीचे तपशिलाने वर्णन आल्यामुळे एक काल्पनिक गाव लेखिका समोर उभे करते. ग्रामीण भाषाही मधून मधून डोकावताना निदर्शनास येते. लेखिकेची भाषा ओघवती, साधीसोपी आणि सरळ आहे.

कादंबरीचा घाट मुख्य व्यक्तिरेखेबरोबर जाणार्‍या व्यक्तिरेखा घेऊन कथानक पुढे सरकत जाते. आई, वडील, भावंडे, गावकरी, हॉटेलचा मालक, मैत्रिणी, हॉटेलमधील कर्मचारी अशा अनेक व्यक्तिरेखा ठळकपणे येतात. फसवली गेलेली मैत्रीण, आत्महत्या करणारी दुसरी मैत्रीण अशी उपकथानकेही कादंबरीत रंग भरतात. मानवी मनाचे अनेक रंग विविध व्यक्तींमधून दिसतात. श्रीकृष्ण ढोरे यांनी रेखाटलेलं मुखपृष्ठ समर्पक आहे.

-कुरवंडी – वृंदा कांबळी
-प्रकाशक – विघ्नेश पुस्तक भांडार, कणकवली सिंधुदुर्ग
-पाने – २३०, किंमत – ४२० रुपये

First Published on: January 8, 2023 4:30 AM
Exit mobile version