लोकांसाठी पैसा खर्च करणारे नेते

लोकांसाठी पैसा खर्च करणारे नेते

विजेच्या मीटरचं रिडींग घेण्यासाठी तो दर महिन्याला नियमितपणे येत असतो. मीटरचा फोटो काढायचा..आणि जायचं..पुढच्या आठवड्यात वीज बील आणून द्यायचं..हे त्यांचं काम. त्या दिवशी मला जरा रिकामपण होतं..त्याच्याकडेही वेळ होता. मग बसलो गप्पा मारत. त्याच्या बोलण्यातून समजलं..असे रिडींग घेण्याचं काम साधारण दोनशे जण करतात.आणि हे सगळं चालवण्यासाठी जी एजन्सी आहे त्याचा मालक एक मोठा राजकीय पुढारी आहे. तसं आपण ऐकून असतोच..या या पुढार्‍यांचा हा असा बिझनेस आहे वगैरे..त्यामुळे मला फारसं आश्चर्य वाटले नाही. हे जगभरच चालतं. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुशदेखील एका मोठ्या तेल कंपनीचे मालक होतेच.कित्येक क्रिकेटपटू, अभिनेते हॉटेल व्यावसायिक असतात हेही ऐकून असतो. या एवढ्या पैशाचं ते करतात तरी काय असा सामान्यांना प्रश्न पडतोच. उपजीविकेसाठी काही उद्योग धंदा करणे वेगळे.. आणि हे वेगळे.

या पार्श्वभूमीवर मला आठवले लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक..त्यांची देशभक्ती..त्यांचं कार्य याबद्दल आपण सगळेच जण जाणून आहोत. पण टिळक उपजीविकेसाठी नेमकं काय करत होते हे फारसं कोणाला माहीत नाही.केसरी हे वर्तमान पत्र ते चालवत, पण त्याकडे टिळकांनी व्यवसाय म्हणून कधीच बघितले नाही.

काही काळ त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली, पण आगरकरांशी काही वाद झाल्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडली. टिळक घरचे तसे खाऊन पिऊन सुखी होते, पण सार्वजनिक कामांसाठी अतिरिक्त पैसा हा लागतोच. त्यासाठी मग काय करावे असा त्यांना प्रश्न पडला. टिळकांना कायद्याचे ज्ञान उत्तम प्रकारचे होते.त्यांनी ठरवलं. आपण विद्यार्थ्यांना वकिलीचे शिक्षण द्यायचं..वकिलीच्या शिक्षणाचे क्लास काढायचे..त्यातून पैसा उभा करायचा.

पुण्यातील हा बहुधा पहिला खासगी कोचिंग क्लास. सुरुवातीला त्यांच्यावर टीकाही झाली..पण त्यांनी मनाची तयारी केली होतीच. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून कायद्याचं शिक्षण घ्यायला मुले येऊ लागली. कायद्याच्या शिक्षणासोबतच टिळक आपल्या विद्यार्थ्यांना अप्रत्यक्षरित्या राजकारणाचे धडेही देऊ लागले. टिळकांच्या तालमीत तयार झालेली ही तरुण मुले आपापल्या गावी जाऊन वकिली करता करता राजकारण पण करु लागले. थोडक्यात काय तर..टिळकांना त्यांच्या राजकारणासाठी एक भक्कम यंत्रणा क्लासच्या माध्यमातून उभारता आली.. आणि हे सगळं उत्तम प्रकारे अर्थार्जन करता करता.

तशीच गोष्ट महात्मा फुले यांची. फुले यांनी फारसं राजकारण केलं नाही, पण समाजकारण मात्र केलं. सामाजिक कामे करत असताना.. समाजसेवा करत असताना महात्मा फुल्यांनी आपल्या शेतीवाडीकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही. शेतीत त्यांनी अनेक नवनवीन प्रयोग केले. पुण्यातील मांजरी शिवारात त्यांची जमीन होती. दहा बारा माणसं कायमस्वरूपी कामासाठी होती..आणि गरज पडली तर अजूनही मजूर रोजंदारी वर असायचे. शेतीच्या कामासाठी १५-२० बैल होते. झालंच तर २-३ गायी होत्या. दरमहा शेकडो रुपयांचे उत्पन्न त्यातून जोतिरावांना मिळत होतं. पुण्यातून मोठ्या रुबाबात ते कधी घोड्यावरुन..तर कधी घोडागाडीतून शेतीची पाणी करायला येत.

विदेशी भाज्या,फळे लावण्याच्या बाबतीत लोकांमध्ये गैरसमज होते, पण जोतिरावांनी जेव्हा कोबी, फुलकोबी, टॉमेटो, मोसंबी, अंजीर, डाळींब अशी वेगवेगळी पिके घेतली.. त्यातून चांगला पैसा कमावला..ते पाहून आजूबाजूचे शेतकरीही त्यांचं अनुकरण करु लागले.

जोतिराव बांधकामांचे ठेकेदार होते. येरवडा येथील पुलाच्या बांधकामाचा ठेका त्यांनीच घेतला होता. बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यांनी सर्व मजुरांना आपल्या मांजरी येथील बागेत मोठ्या थाटात जेवण दिलं होतं. खडकवासला येथील तलावाच्या बांधकामासाठी दगड पुरवण्याचे कंत्राट जोतिरावांनी घेतले होते. पुण्यातील गंजपेठेतील आपल्या दुकानवजा ऑफिसमध्ये बसून जोतिराव हे सगळे व्यवहार करत.

टिळकांनी काय.. किंवा जोतिरावांनी.. राजकारण, समाजकारण करताना पैसे कमावण्यासाठी जे केलं ते सचोटीने. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांनी मिळवलेला पैसा केवळ लोकांसाठी.. विशेषत: विद्यार्थ्यांसाठी वापरला होता. केवळ स्वत:साठी.. स्वत:च्या गोतासाठी व्यवसाय.. उद्योगधंदे करणारे.. साम्राज्य उभे करणारे आजचे हे राजकीय पुढारी..त्यांच्या तुलनेत समाजासाठी आपला पैसा खर्च करणारे, पदरमोड करणारे शंभर वर्षांपूर्वीचे राजकीय, सामाजिक नेते म्हणूनच महान वाटतात.

–सुनील शिरवाडकर.

First Published on: December 11, 2022 4:06 AM
Exit mobile version