संस्कृतीची प्राणधारा : दक्षिणगंगा गोदावरी…

संस्कृतीची प्राणधारा : दक्षिणगंगा गोदावरी…

-डॉ .अशोक लिंबेकर

भारतीय महाकाव्य, पुराणग्रंथ, महाकाव्यादी, साहित्यातून भारतातील विविध नद्यांचे उल्लेख आले आहेत. या सर्व नद्या म्हणजे आपल्या जीवनदायिनीच! नद्यांचा आणि मानवी जीवनाचा अन्योन्य सबंध हा अनादी आहे. आदिम काळापासून ते माणसाच्या प्रगत अवस्थेपर्यंत या सरितेनेच माणसाची सोबत केली आहे, किंबहुना माणसाचे जीवन बहरले, फुलले, स्थिरावले आणि मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा पाया रचला गेला तो ही नद्यांच्या काठावरच! नदीच्या काठीच माणसाने आपली पहिली वस्ती केली, शिकारीकडून शेतीकडे त्याचा प्रवास झाला तो नदीच्या सान्निध्यानेच.

त्यामुळेच माणसाला प्रगत आणि सुसंस्कृत बनवण्यात नद्यांचा सहभाग मोठा आहे. असे कोणतेही गाव नाही, शहर नाही की जिथे नदीचे अस्तित्व नाही. आपल्या भौगोलिक, धार्मिक, आध्यात्मिक, कृषी, औद्योगिक क्षेत्रात म्हणजेच पर्यायाने आपल्या समग्र सांस्कृतिक जीवनातच, नदीचे स्थान अनन्यसाधारण आहे. आपल्या जीवनातील विविध पैलू नदीच्या अस्तिवाशी निगडित आहेत; म्हणूनच आपल्या संस्कृतीने जलपूजनाचे महत्व अधोरेखित केले.

नदीच्या प्रवाही लयीवर युगानुयुगे मानवी जीवनाचा प्रवास अखंडपणे चालू आहे. मानवी संस्कृतीचा हा इतिहास पाहता नद्या या त्या-त्या राष्ट्राच्या जीवनदायिनीच असतात. जसे की नाईल नदीच्या काठावर ईजिप्शीयन संस्कृती बहरली, तसेच सिंधू आणि गंगा नदीचे माहात्म्य. भारतीय नद्यांचा सांस्कृतिक इतिहास पाहता गंगा, यमुना या नद्यानंतर अनेक पुराण आणि प्राचीन ग्रंथात गौरविण्यात आलेली नदी म्हणजेच गोदावरी.

गोदावरीची संगमगाथा अपूर्व अशीच आहे. श्रीराम आणि रावण यांच्यातील सांस्कृतिक संघर्षाप्रमाणेच उत्तरेकडून आलेले आर्य आणि दक्षिणेतले अनार्य यांच्यातील संघर्षही याच परिसरात घडला. त्या दृष्टीने गोदातीरावरील सांस्कृतिक अभिसरण ही घटनाही महत्त्वाचीच आहे. पूर्वीचा दंडाकारण्याचा भाग असलेल्या या गोदाखोर्‍यात विपुल अशी वनसृष्टी आणि प्राणी सृष्टी आढळते.

या खोर्‍यात निर्माण झालेले सुपीक काळ्या मातीचे थर शेती करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले आणि या उपयुक्ततेच्या आधारानेच गोदाखोर्‍यात नागर संस्कृतीचा पाया रोवला गेला. नागर संस्कृतीच्या या पाऊलखुणा नाशिक ते राजमहेंद्रीपर्यंत दिसून येतात. दायमाबाद, कावसान, आपेगाव, पैठण, जोर्वे, नेवासा या ठिकाणी झालेल्या उत्खननातून हे सिद्ध झाले आहे.

महाराष्ट्रातील गोदावरी आणि कृष्णा या नद्यांना महाराष्ट्राच्या गंगा यमुना म्हटले जाते. पुरातत्वीय, मानववंशशास्त्र, पौराणिक, धार्मिक, सांस्कृतिक दृष्टीने गोदावरीचे महत्व अनन्य साधारण आहे. सह्याद्रीपर्वत रांगेतून उगम पावणार्‍या आणि बंगालच्या उपसागराला मिळणार्‍या या नदीचा प्रवाह १४६५ किमी इतका आहे. महाराष्ट्र, आंध्र आणि तेलंगणा या तिन्ही राज्यातील ही महत्त्वाची नदी आहे.

या तीन राज्यांखेरीज मध्य प्रदेश छत्तीसगड, कर्नाटक, ओरिसा या राज्यांच्या सीमांनाही स्पर्श करून ती बंगालच्या उपसागरास मिळते. गोदावरीला गौतमीगंगा, वरदगंगा, वृद्धगंगा, गोयावरी, गोला, गोलाई, गोलवई, पार्वती इत्यादी नावाने संबोधले जाते. द्रविड भाषेतील गोदा या शब्दापासून हे नाव प्राप्त झाले असून त्याचा संस्कृत अर्थ गायी किंवा पाणी देणारा असा होतो. गोदावरीची मुख्य दोन खोर्‍याची विभागणी बालाघाट व अजेंठा सातमाळा या दोन डोंगररांगांच्या दरम्यान होतो. दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही बाजूने अनेक उपनद्या गोदावरीस येऊन मिळतात.

पैठण ते नांदेडपर्यंतचा पठारी भाग काळ्या गाळाने युक्त अतिशय सकस मातीने तयार झाला आहे. ही निर्मिती होण्यास कोट्यवधी वर्षांचा कालावधी लागल्याचे संशोधन उपलब्ध आहे. आद्य मानवाच्या अस्तित्वाचा पहिला पुरावाही पैठण जवळील मुंगी या गावी गोदातिरावरच मिळाला आहे. म्हणूनच गोदासंस्कृतीचा अभ्यास म्हणजे मानवी विकासाचा, मानवी कर्तृत्वाचाच अभ्यास ठरतो, असे गोदावरीचे अभ्यासक डॉ. अरुणचंद्र पाठक म्हणतात ते याच अर्थाने.

गोदावरीच्या काठावर अनेक वसाहती जशा निर्माण झाल्या, तशाच अनेक राजवटीही इथेच नांदल्या. या राजवटीत सातवाहन राजांची महत्त्वाची. ही राजवट महाराष्ट्राच्या विकासाची सर्वोच्च राजवट म्हणून मानता येते. सातवाहन राजाच्या काळात महाराष्ट्रातून विदेशापर्यंत होणारा व्यापार सर्वश्रुत आहे, त्या मार्गावरचे अनेक पुरावेही उपलब्ध झाले आहेत. सातवाहन राजानेच गाथा सप्तशतीसारख्या ग्रंथातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची पायाभरणी केली आहे.

सातवाहन राजाची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण या नगरीत होती. आपल्या वैभवाची साक्ष सातवाहन राजांनी गोदावरीलाच विचारली. नदीला आपल्या संस्कृतीत आईच्या रुपात पाहिले जाते. त्यामुळे तिच्याकडे काही मागणे, तिला काही विचारणे, तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे ओघानेच आले. यातूनच निर्माण झालेल्या अनेक रूढी -परंपरा अजूनही प्रचलित आहेत. नदीच्या उगमापासून ते तिच्या संगमापर्यंत अशा अनेक रूढी-परंपरा, दंतकथा सांगितल्या जातात. नदीच्या तीरावर भटकंती करून लोकसंस्कृतीच्या अभ्यासाच्या दृष्टीने त्या समजून घेणे म्हणूनच महत्त्वाचे असते.

गोदावरीच्या खोर्‍यात अशी वैविध्यपूर्ण संस्कृती आढळून येते. त्यामुळेच चक्रधरांनी आपल्या शिष्यांना उपदेश करताना इतर कोणत्याही राज्यामध्ये निवास न करता महाराष्ट्रात वसावे असा उपदेश केला होता आणि विशेष म्हणजे चक्रधरांची भ्रमंती आणि निवास तसेच महानुभाव पंथीयांची अनेक स्थाने गोदावरीच्या काठावर गोदाखोर्‍यातच वसलेली दिसतात. या दृष्टीने विचार केला असता हा प्रदेश सात्विक सहिष्णू असा प्रदेश असल्याची खूण पटते.

याच गोदावरीच्या तीरावर महाराष्ट्रीय भाषेतील आद्यकाव्य जसे निर्माण झाले तसेच ज्ञानेश्वरीसारखा अभिजात ग्रंथ आणि अवघ्या विश्वाला प्रकाशमान करणारी, मानवी कल्याणाची वैश्विक मागणी करणारी प्रार्थना पसायदानाच्या रूपाने याच मातीत प्रकट झाली. ज्ञानदेवांचे मूळ गाव आपेगाव गोदातीरीच ज्या गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना गुरुदीक्षा दिली त्या ब्रह्मगिरीही येथे गोदेच्या उगमाजवळच. ज्ञानेश्वर आणि गोदावरी यांचे अनुबंध असे जिव्हाळ्याचे आहेत. किंबहुना ज्ञानबोधाचे हे क्षेत्र आहे. म्हणूनच गोदावरीचा गौरव पूर्वक उल्लेख त्यांनी ऐसी युगी परी कळी! आणि महाराष्ट्र मंडळी! श्रीगोदावरीच्या कुली! दाक्षिणली !! असा केला आहे.

अनेक संतांच्या अभंगातूनही तिच्या पावित्र्याचा महिमा मुक्त कंठाने गायला गेला.. संत नामदेव यांनी तर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, कुशावर्त स्नान या संदर्भात पुढील अभंग लिहून गंगेप्रमाणेच गोदावरीचे स्थानपावित्र्य अधोरेखित केले, ‘वाचे म्हणता गंगा, सकळ पापे जाती भंगा! दृष्टी पडता ब्रह्मगिरी! त्यासी नाही यमपुरी! कुशावरी करिता स्नान! त्याचे वैकुंठी राहणे! नामा म्हणे प्रदक्षिणा त्यांच्या पुण्या नाही गणना! असे विश्वासाने त्यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर या कवीने तर गोदेच्या वियोगातूनच गोदागौरव हे काव्य लिहून तिच्या रूपाची अप्रतिम महती वर्णन केलेली दिसते.

मराठी भाषेच्या उगम आणि विकासाच्या पाऊलखुणा गोदेच्या तीरावर सापडतात. प्राचीन साहित्यातील पुराणग्रंथ, रामायण, महाभारताचे तसेच बौद्ध, जैन वाङ्मयातूनही गोदावरीचे उल्लेख आलेले आहेत. या सर्व प्राचीन ग्रंथातून आणि मध्ययुगीन साहित्यातून गोदावरीचे चित्र ठळकपणे चित्रित झाले दिसते. भारतातील सप्तसिंधूपैकी पवित्र समजली जाणारी गोदावरी यामुळेच प्रात:स्मरणीय झाली. गोदावरीच्या तीरावरील अनेक स्थळांना धार्मिक महत्व आहे. तिच्या उगमस्थानापासून ते राजमहेंद्रीपर्यंतची ही स्थाने प्रसिद्ध आहेत. या स्थळांना गोदावरीची अष्टांगे असे म्हणतात.

त्यामध्ये शीर्षस्थान, त्रिंबकेश्वर, मुखस्थान, पुणतांबा, कंठस्थान पैठण, राक्षसभुवन, हृदयस्थान, मंजरथ, पुरुषोत्तमपुरी, नाभिस्थान, शंखतीर्थ नांदेड, जानुस्थान, धर्मापुरी, कटीस्थान, मंथनी, चरणस्थान , राजमहेंद्री यांचा समवेश होतो. मानवी अस्तित्वाच्या आणि त्याच्या प्रगतीच्या शोध घेण्यासाठी गोदा खोर्‍यात जोर्वे, इनामगाव नेवासा पैठण, दायमाबाद, नाशिक अशा अनेक ठिकाणी उत्खनन झाले. या उत्खननात ज्या वस्तू मिळाल्या त्यावरून या खोर्‍यात प्राचीन काळात मानवी वसाहती कशा पद्धतीने निर्माण झाल्या आणि ते कसे जीवन जगत होते, त्याचे अनेक संदर्भ, पुरावे सापडले आहेत. या संदर्भाने पाहता दक्षिण भारतीय संस्कृतीची प्राणधारा म्हणून गोदावरीचा निर्देश निश्चितच करावा लागतो.

-( लेखक साहित्य,समाज, संस्कृतीचे अभ्यासक आहेत)

First Published on: May 5, 2024 4:30 AM
Exit mobile version