‘माणूस जोडो यात्रा’ कधी निघणार !

‘माणूस जोडो यात्रा’ कधी निघणार !

–प्रदीप जाधव

सगळीकडे माणसंच माणसं असतात, परंतु त्या माणसांमध्ये माणुसकी आहे का, हा खरा प्रश्न असतो. ‘सत्य’ कवितेत कवी अत्यंत मार्मिक शब्दांत प्रश्न विचारतो…

आमच्याही घरात माणसं आहेत
माणसांनाही मन आहे;
मनात माणुसकी आहे काय?
तेवढे मात्र विचारू नका…

जगात केवढी मोठी उलाढाल सुरू आहे, राहील. सर्व प्रक्रिया माणूसच करतो केवळ सत्ता संपत्तीसाठी. तरीही काही माणसांना किंमत नाही हे सत्य मात्र नाकारता येणार नाही. प्रत्येकजण स्पर्धा करतो सत्तेसाठी, पैशांसाठी. स्पर्धा मात्र माणुसकीसाठी होत नाही ही एक शोकांतिक आहे. ती शोकांतिका अरुण घोडेराव यांना अस्वस्थ करते आणि ती कवितेच्या माध्यमातून जगासमोर येते. जगात अनेक मोर्चे निघतात, धरणे होतात, आंदोलने होतात. कोणी ‘भारत जोडो यात्रा’ काढतो पण ‘माणूस जोडा यात्रा’ काढली तर निश्चितच माणसांमधला दुरावा, भेद मिटला जाईल. माणसांमधला संवाद वाढेल. भारतामध्ये विविध जातधर्म, पंथाची लोकं राहत असतात. त्यामुळे असाही मोर्चा निघावा की ‘जाती तोडा माणसं जोडा.’ माणसांचं राष्ट्र हे श्रेष्ठ आहे.

अनेकदा दोन समूहांमध्ये दंगल होत असते. दंगलीचं कारण वेगवेगळं असू शकतं. संवाद तुटला की दंगलीला सुरुवात होते. दंगल या कवितेत कवी अत्यंत सूचक शब्दांत विचारतो…

दंगल सुरू झाली अन्
दंगलखोरांनी देवांच्या हातातली शस्त्रे
आपापल्या हातात घेतली,
देव गप्प राहिले
त्यांची मूक संमती गाभार्‍यात हसली,
धर्मातील कोणत्या मंगळ तत्त्वासाठी
दंगल सुरू झाली?

कवी म्हणतो की, हे कोडं मला उलगडलं नाही. मी पाहत राहिलो आणि माणसांचं हे जंगल दंगलीच्या वनव्यात बेचिराख झालं. दंगली साधारणतः जातीय, धार्मिक तेढ, तणाव निर्माण झाल्यानेच होत असतात. दंगलीमध्ये खूप मोठा विध्वंस होऊन सामाजिक आणि आर्थिक दोन्ही स्वरूपाची हानी होते. त्यामुळे विषमता गाडली पाहिजे आणि समता आणण्यासाठी आता वेळ आली आहे. समतेच्या नांगराची, शास्त्रे-पुराणे जाळण्याची. समतेसाठी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्रांतीला सुरुवात केली. विषमतेविरुद्ध बंड पुकारला. सामाजिक समतेसाठी लढा दिला. आम्ही राष्ट्रपुरुषांना आदर्श मानतो. हीच आमची संस्कृती आहे. हेच आमचे संस्कार आहेत. आम्हाला या संस्कृतीचा अभिमान आहे. ही संस्कृती आम्हाला जपायची आहे. राष्ट्रपुरुषांच्या संवादाने, विचाराने माणसे जोडायची आहेत. संस्कृती या कवितेत कवी लिहितो…

दगडांचा मारा खात अन्
शेण अंगावर झेलित,
हातात पुस्तक बाळगणार्‍या चेहर्‍यात
आमची संस्कृती आहे.

विषमतावादी संस्कृती गाढण्यासाठी आम्हाला महापुरुषांचे विचार पेरावे लागतील. जातीयवाद गाडावा लागेल आणि ‘माणुसकीचा विजय असो ’अशी घोषवाक्ये तयार करावी लागतील. मुंबईची ट्रेन किंवा लोकलला जीवनवाहिनी म्हटलं जातं. हजारो, लाखो प्रवासी दररोज लोकलने लोंबकळत, लटकत प्रवास करतात. सर्वसामान्यांना परवडणारी लोकल असली तरी जीवघेणा प्रवास लोकलनेच केला जातो. अगदी श्वास गुदमरतो, परंतु पर्याय नाही. किती गाड्या सोडायच्या स्टेशनवर थांबून हाही प्रश्न. म्हणून लटकत अर्धे बाहेर, अर्धे दरवाजात, श्वास गुदमरेपर्यंत माणूस लोकलने प्रवास करतो. पहाटे सुरू होणारी लोकल रात्री, मध्यरात्रीपर्यंत चालूच असते. लोकलचे वर्णन ‘लोकल’ या कवितेत अत्यंत हृदय हेलावणार्‍या शब्दांमध्ये केले आहे. आपण जेव्हा लोकलमध्ये प्रवास करतो तेव्हा रुळांच्या दोन्ही बाजूला सकाळी सकाळी बायका-पोरं, लहान-मोठी, आबालवृद्ध प्रात:र्विधीसाठी बसलेली पाहतो. झोपडपट्टी, खाडी, गटार सगळ्याचा वास घेत घेत सिग्नल आला की थांबते दुर्गंधीत. कवी अरुण घोडेराव म्हणतात…

हिरवा सिग्नल! तिच्या चाकातून वीज धावते,
तेवढ्यात साखळीच्या हिसक्यावर तिचा आजका अन्
त्रयस्थ सुस्कारा, अरेरे! पडला बिचारा,
जांभया देत येतात चौघेजण.

मुंबईमधील लोकलने प्रवास करणार्‍यांना दररोज ही चित्रे पाहावयास मिळतात. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ असं हे चित्र मुंबईच्या प्रवाशांना अजिबात नवीन नाही. संध्याकाळी परतताना वेगळे चित्र बघायला मिळतं. चौपाटीवरचे रंगीबेरंगी हृदय, अंधुक प्रकाशात जवानीचे रंग खरवडणार्‍या काळाच्या हातभर शिकारी! डोळेझाक तरी किती करावी, लोकांना आपलं स्टेशन येईपर्यंत पाहावं लागतं निमूटपणे. लाखो लोंबकळलेली पोट घेऊन लोकल धावत असते. माणसाचा प्रवास केव्हा, कुठे, कधी थांबेल काही सांगता येत नाही. लोकल सिग्नलला थांबते. माणसाचा सिग्नल केव्हा बिघडेल याचा नेम नाही.

अरुण घोडेराव सामाजिक चळवळीत काम करणारा कार्यकर्ता. पुरोगामी संस्था, संघटनांशी, चळवळीशी घट्ट नातं असल्याने त्यांच्या कवितेचा केंद्रबिंदू हा माणूस आहे. त्यांनी प्रत्यक्ष जीवन जगताना डोळे उघडे ठेवून जे पाहिलं, जे अनुभवलं ते सगळं या कवितेच्या रूपात मांडलं आहे. व्यवस्थेचे दांभिक रूप, संस्कृतीचा दुटप्पीपणा हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे. त्यातून निर्माण होणारी चीड, संताप शब्दांत व्यक्त करतात.

त्यांची कविता समता, मानवता, सामाजिक शांततेचा पुरस्कार करते. अरुण घोडेरावांची कविता ही माणुसकीचं गाणं गाते हे मात्र अंतिम सत्य आहे.

आपल्या मनोगतात ते लिहितात की, माणसाची व मानवाची निकोप व नैसर्गिक वाढ होण्यासाठी त्याच्या पायात व डोक्यात धर्मशास्त्राच्या शृंखला नसाव्यात आणि त्या असल्या तरी तटातट तुटाव्यात किंवा तोडाव्यात अशी माझी भावना आहे.

First Published on: February 12, 2023 1:30 AM
Exit mobile version