ती दोन धृवावरची

ती दोन धृवावरची

आमची ओळख झाली ती मी बी. एस्सीच्या दुसर्‍या वर्षाला शिकत असताना. आमच्या कॉलेजमध्येच होती ती. मला तब्बल पाच-सहा वर्षे सिनिअर. आमच्या वयाचे आणि तिच्या वयाचे देखील तिला मीना दीदी म्हणायचे. दीदी म्हणण्याएवढी पात्रता तेव्हा तिने कमावली होती. बी एस्सीच्या पहिल्या वर्षाला असताना मी दीदीला बघितलं होतं. आमच्या कॉलेजच्या एनसीसीच्या कामात स्वतःला झोकून देत काम करताना. तिचा मूळचा पिंडच समाजसेवेचा होता. एनसीसी हे फक्त तिला समाजापर्यंत पोहचण्याचं माध्यम होतं. मीना दीदीचं राहणीमान अगदी टापटीप. अंगावर झळझळीत कपडे. बहुतेक जीन्स आणि टी शर्ट पण खांद्याला असलेली शबनम ह्या पेहरावात विसंगत वाटायची.

मी कॉलेजमध्ये असताना साहित्य संघात आम्ही कसल्यातरी कार्यक्रमाची तयारी करत होतो. रात्री आठ-साडेआठ वाजता कार्यक्रमाची तालीम आटोपली आणि चर्नीरोड स्टेशनकडे मी चालत निघालो. मागून मला कोणी हाक मारली म्हणून मागे वळलो तर मीना दीदी. मी तिला इकडे कुठे असं विचारताच तिने अरे काही नाही इथल्या कामाठीपुरातल्या वेश्या व्यवसाय करणार्‍या स्त्रियांच्या लहान मुलांना दररोज संध्याकाळी मी शिकवायला येते. मी मीनादीदीकडे बघतच राहिलो. ही तेवीस- चोवीस वर्षांची मुलगी ह्या भागात जिथे धुवट समाज पाठ फिरवतो, तिथे संध्याकाळी फक्त स्त्रिया देहविक्रय करतात तिथल्या भागात चक्क मुलांना शिकवायला जाते! पण ती मीनादीदी होती. प्रवाहाबरोबर गेली तर ती कसली. प्रवाहाच्या विरोधात जाण्यात तिची खरी ओळख होती. कॉलेजमध्ये असताना ती कोणा गरजू मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी कुठल्या ना कुठल्या सेवाभावी संस्थेच्या फॉर्मची माहिती आणून कॉलेजच्या नोटीस बोर्डवर लावायची, कुठे अनाथ आश्रमात जाऊन तिथल्या मुलांना गोष्टी सांगून यायची. एवढी माहिती तिच्याबद्दल होती.

पण त्यादिवशी ती जे सांगत होती ते तेव्हा माझ्यासाठी अनाकलनीय होतं. मला त्यादिवशी तिच्याशी नक्की काय बोलावं हे कळत नव्हतं. चर्नीरोड स्टेशनला आम्ही पोहचलो तेव्हा तीच म्हणाली अरे त्या वस्तीत गेलं म्हणजे आपण बिघडलो असं काही नसतं रे, तिथल्या वस्तीतल्या प्रत्येक स्त्रीला काहीतरी न विसरता येणारा भूतकाळ आहे. तिथल्या प्रत्येकीला आतलं एक मोठ्ठ दुःख आहे. एवढं म्हणत असताना स्टेशनजवळच्या पानवाल्याच्या दुकानातून तिने छोटा गोल्ड फ्लेक घेतला आणि तिथे असलेल्या लायटरने सिगारेट शिलगावत एक मोठा धुराचा लोळ हवेत सोडत चल मला नऊ सतराची अंधेरी लोकल पकडायची आहे असं म्हणत माझ्या उत्तराची वाट न बघता मीनादीदी स्टेशनचा ब्रिज चढून गेली सुद्धा. मी मनात विचार करत होतो अरे बापरे, ती पोरगी भलतीच पुढे गेली आहे पण ती तशी बंडखोर होती. वादविवाद झाले की तिच्या विचारांची खोली किती खोलवर झिरपली होती याचा अंदाज यायचा.

माझे साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम चालू होते तेव्हा ती कुठल्याना कुठल्या कार्यक्रमात भेटायची. एकदा रविंद्र नाट्यमंदिरच्या गेटवर मीनादीदी भेटली आणि मी आठ दिवसांपूर्वी अमेयशी लग्न केलं एवढं म्हणाली. मी मख्खपणे तिच्याकडे बघत राहिलो. गळ्यात लग्न झालंय म्हणून मंगळसूत्र किंवा काही बांगड्या असं काही नव्हतं. मी अमेयला देखील ओळखत होतो, तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होता, तिच्यासारखाच अखंड समाजाला वाहून घेतलेला. कॉलेजमधलीच ओळख. अमेयने केमिस्ट्री विषय घेऊन बी.एस्सी केलं होतं. तो दक्षिण मुंबईत कुठल्यातरी फार्मा कंपनीत मेडिकल रेप्रेजेन्टीव्ह होता. ही देखील शिवडीला एका कंपनीत होती. कामावरून निघाले की दोघेही कुठे ह्या संस्थेत तर कधी त्या संस्थेत. एक कामाठीपुरात तिथल्या स्त्रियांचे प्रश्न सोडवतो आहे तर दुसरा ह्या कंपनीतल्या कामगारांचे प्रश्न घेऊन मोर्चा काढतोय. दिवस हे असेच जात होते. महिन्यातून ह्या दोघांपैकी कोणीतरी स्टेशनच्या आत बाहेर भेटायचा. दोघातला एकजण भेटला तरी दोघांची हालहवाल कळायची.

एकदा असाच दादरच्या धुरू हॉलमधून बाहेर पडलो आणि आयडीअलच्या जवळ अमेय भेटला. आपण बाप झाल्याची बातमी देत श्रीकृष्ण हॉटेलचे वडे खात आम्ही गप्पा मारत होतो. अमेयच्या बोलण्यातून कळलं की दोघांनी मिळून सेवाभावी संस्था उभारली आहे. हल्ली मीनादीदीची आई दोघांकडे राहायला आली आहे. हे माझ्यासाठी नवल होतं. परजातीतला आणि वयाने लहान असलेल्या मुलाशी लग्न केलं म्हणून जिचं तोंड बघणार नव्हती ती आई सध्या मीनादीदीकडे राहायला होती. चला एकूण दोघांचा संसार सुरू झाला म्हणायचा. पुढील तीनचार वर्षात दोघांचा काहीच संपर्क नव्हता. जगण्याच्या आणि लौकिकाच्या चक्रात मी देखील तेव्हा इतका अडकून गेलो की हे दोघे काय करत असतील याचा विचार मनाला कधी स्पर्श करून गेलाच नाही.

पुढे मित्राकडून अमेय फार आजारी असल्याचं कळलं. भेटायला जाऊ. आज नको, उद्या जाऊ असं करत असताना एक दिवस कळलं की, अमेय हे जग सोडून गेला. अमेय गेला तरी मीनादीदीने संस्थेचं काम चालू ठेवलं. नोकरी, घर, पदरात मुलगी आणि संस्था यात मीनादीदी भलतीच गढून गेली होती. मधल्याकाळात मीनादीदीच्या संस्थेला आणि स्वतः मीनादीदीला पुरस्कार मिळाल्याचे कळले. मी अभिनंदन करण्यासाठी फोन केला, तिच्याकडून कळलं मुलगी आता मोठी झालीय आर्किटेक्ट करतेय. फोन ठेवता ठेवता मीनादीदी बोलली, नुसतं लिहून काही होत नाही रे. ह्यासाठी मुळावर घाव घालावे लागतात. तिच्या बंडखोर स्वभावात काही फरक पडला नव्हता. सात-आठ वर्षांपूर्वी वाशीला कसल्यातरी निमित्त मीनादीदीचा कार्यक्रम होता. कार्यक्रमपत्रिका वाचून मी ह्या कार्यक्रमाला जाण्याचे ठरवले. कार्यक्रम झाला. मीना दीदीचा सत्कार झाला आणि निघताना मी मीनादीदीला भेटायला म्हणून हॉलच्या मागे थांबलो. थोड्यावेळाने दीदी आली. तिने मला बघितलं. मी उभा होतो तिथे आली.

मला म्हणाली कसा जाणार घरी? मी डेपोतून बस पकडून जाईन म्हणून सांगितलं तेव्हा मीनादीदी आणि मी कार्यक्रमस्थळावरून रिक्षा पकडून बस डेपोत आलो. आई आता माझ्याकडे रहात नाही. इथे भाऊ रहातो. तिच्याकडे असते. त्यावर मी भावाकडे जाणार का विचारताच मला म्हणाली, भावाकडे आज हळदीकुंकू आहे. मला कशाला बोलावतील. अमेय जिवंत असताना कुंकू कधी लावत नव्हते आणि आता काय. मला एक सांग, स्त्रीचं कर्तुत्व नवरा जिवंत असण्यावर आहे का रे ?…….नवरा गेल्यावर स्त्रीच कुंकू पुसण्यात किंवा तीच मंगळसूत्र काढण्यात काय परंपरा आणि संस्कृती जपता रे तुम्ही?. तिच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तरं माझ्याकडे नव्हतं. थोड्यावेळापूर्वी कार्यक्रमात बेधडक वाटणारी मीनादीदी आतून खूप दुखावली होती. समाजात मानाने मिरवणारी मीनादीदी कौटुंबिक मानसिकता बदलू शकत नव्हती. ती अशीच दोन धृवावरची होती.

First Published on: December 12, 2021 5:10 AM
Exit mobile version