निरभ्र आकाशातील उल्कानृत्य!

निरभ्र आकाशातील उल्कानृत्य!

-सुजाता बाबर

आताचा मौसम हा खास आकाशप्रेमींचा असतो. याचे मुख्य कारण म्हणजे या दिवसात आकाश निरभ्र असते आणि दुसरे कारण म्हणजे या काळात रात्री आकाशदर्शन केले तर अतिशय सुंदर अशा प्रकाश शलाका किंवा फायर बॉल्स दिसतात. हे एक देखणे नृत्यच भासते. प्रचलित भाषेत याला तारा तुटला असे म्हणतात, परंतु तारा असा तुटत नसतो.

त्याच्या मृत्यूची प्रक्रिया वेगळी असते. या प्रकाश शलाकेला शास्त्रीय भाषेत ‘उल्का’ असे म्हणतात. या प्रकाश शलाका दिसतात त्यामागे तीन प्रकारचे कण कारणीभूत आहेत आणि त्यांना तीन वेगवेगळी नावे आहेत. अवकाशामध्ये अनेक लघुग्रह आणि धुळीचे कण आहेत. यातील एखाद्या लघुग्रहाचा तुकडा सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने त्याकडे खेचला जातो. या प्रवासात पृथ्वीकडे त्याचे काही तुकडे आणि अवकाशातील धुळीचे कण खेचले जातात. पृथ्वीवर आदळण्यापूर्वी अवकाशातील पोकळीमधून पृथ्वीच्या वातावरणात शिरतात.

जोपर्यंत लघुग्रहाचे तुकडे पृथ्वीच्या वातावरणात शिरत नाहीत तोपर्यंत त्यांना ‘उल्काभ’ असे म्हटले जाते. यांना ‘स्पेस रॉक्स’देखील म्हटले जाते. यांचा आकार अगदी लहान कणांपासून ते लहान लघुग्रहाइतका असू शकतो. हे तुकडे आपल्या वातावरणात शिरल्यावर पेट घेतात. हा तुकडा जर जळून खाक झाला तर त्याला ‘उल्का’ असे म्हणतात आणि जर हा तुकडा पेट घेऊन नष्ट न होता पृथ्वीवर आदळला तर याला ‘अशनी’ म्हणतात.

उल्का दिसतात फार सुंदर. कधी कधी उल्का शुक्रापेक्षाही उजळ दिसतात. तेव्हाच आपण त्यांना फायर बॉल म्हणतो. आपल्या वातावरणात रोज किती उल्का शिरत असतील? सुमारे दीड कोटी! अंदाजे ४४,००० किलोग्रॅम!! उल्का नेहमीच दिसतात, परंतु उल्कावर्षाव काही ठरावीक काळामध्ये दिसतात. आपल्या अवकाशामध्ये प्रचंड धूळ आहे. अवकाशातल्या धुळीमध्ये बर्फ, लहान लहान दगड, खडक असतात. धूमकेतूने सोडलेले डेब्रीस (कचरा) असतात.

हे गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे खेचले जातात. आपल्या वातावरणाबाहेर पोकळी असल्याने जेव्हा वातावरणात शिरतात तेव्हा त्यांचे माध्यम बदलते आणि त्यामुळे घर्षण निर्माण होते. घर्षण झाले की हे कण किंवा दगड पेट घेतात. धूमकेतू एका वेळी मोठ्या प्रमाणात डेब्रीस सोडत असतात. हे डेब्रीस त्यांच्या कक्षेमध्ये तसेच फिरत राहतात. यांची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा यांनी एकमेकांना छेदले की एकावेळी असंख्य डेब्रीस वातावरणात शिरून पेट घेतात आणि आपल्याला असंख्य उल्का दिसतात. इतक्या की जणू काही उल्कांचा पाऊस पडतोय की काय असेच वाटते. यालाच उल्कावर्षाव असेही म्हणतात.

आकाशात ज्या ठिकाणी उल्का उगम पावतात किंवा ज्या तारा किंवा नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर असतात त्यावरून उल्कावर्षावांना नाव दिले जाते. उदा. सिंह तारका समूहाच्या पार्श्वभूमीवरून दिसणारा उल्कावर्षाव म्हणजे सिंहस्थ उल्कावर्षाव! टेम्पल-टटलच्या धूमकेतूच्या डेब्रीसमुळे हा उल्कावर्षाव दिसतो. हा धूमकेतू दर ३३ वर्षांनी भेट देतो. तेव्हा हा वर्षाव अतिशय तीव्र होतो.

अवकाशातील फुटबॉल मैदानापेक्षा लहान खडक बहुतेक पृथ्वीच्या वातावरणात तुटतात. ताशी हजारो मैल वेगाने प्रवास करताना त्याच्या स्वतःच्या ताकदीपेक्षा जास्त बाह्य दाब आल्याने त्यांचे विघटन होते. परिणामी एक तेजस्वी भडका उडतो. सामान्यतः मूळ वस्तूच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात सामुग्री जमिनीवर पडते. आपल्याला सापडणारे उल्कांचे तुकडे, अशनी सामान्यत: गारगोटी आणि मुठीच्या आकारादरम्यान असतात. बरेचदा ते सामान्य खडकांपेक्षा वेगळे करणे अवघड असते, परंतु वाळवंटांमध्ये ते तसे वेगळे करता येतात आणि सापडतातही. अंटार्क्टिकासारख्या थंड, बर्फाळ वाळवंटात अशनीचे तुकडे शोधणे खूप सोपे आहे.

अशनी का महत्त्वाचे असतात?
पृथ्वीवर पडणारे अशनी काही मूळ, वैविध्यपूर्ण पदार्थांचे प्रतिनिधित्व करतात, ज्यांनी अब्जावधी वर्षांपूर्वी ग्रहांची निर्मिती केली. अशनीचा अभ्यास करून आपण सूर्यमालेची सुरुवातीची परिस्थिती आणि प्रक्रियांबद्दल शिकू शकतो. यामध्ये वेगवेगळ्या ग्रहांच्या बिल्डिंग ब्लॉक्सचे वय आणि रचना, लघुग्रहांच्या पृष्ठभागावर आणि आतील भागास प्राप्त झालेले तापमान आणि भूतकाळातील प्रभावांमुळे सामुग्रीमध्ये किती बदल झाला याचा समावेश आहे.

अशनी पृथ्वीच्या खडकांसारखे असतात, मात्र त्यांचा जळलेला बाह्य भाग चमकदार दिसतो. वातावरणातून जात असताना अशनीचा बाह्य पृष्ठभाग वितळल्यामुळे हे फ्यूजन क्रस्ट तयार होते. अशनीचे तीन प्रमुख प्रकार आहेत: ‘लोहयुक्त’, ‘खडकाळ’ आणि ‘लोहयुक्त खडकाळ.’ पृथ्वीवर पडणारे बहुसंख्य अशनी खडकाळ असले तरी पडल्यानंतर सापडलेले बहुतांश अशनी लोहयुक्त होतात. लोहयुक्त अशनी खडकाळ अशनीपेक्षा जड आणि पृथ्वीच्या खडकांपासून वेगळे करणे सोपे आहे.

पृथ्वीवर सापडलेले बहुतेक अशनी विखुरलेल्या लघुग्रहांमधून येतात आणि काही मंगळ किंवा चंद्रावरून येतात. सिद्धांतानुसार बुध किंवा शुक्रावरून छोटे तुकडेदेखील पृथ्वीवर पोहचू शकले असते, परंतु अजून तरी एकाही तुकड्याची तशी ओळख पटलेली नाही. अशनी कुठे उगम पावतात हे शास्त्रज्ञ अनेक पुराव्यांच्या आधारे सांगू शकतात.

त्यांच्या भ्रमणकक्षाची गणना करण्यासाठी आणि लघुग्रहांच्या पट्ट्याकडे त्यांचे मार्ग प्रक्षेपित करण्यासाठी उल्का वर्षावाच्या छायाचित्रणाचा वापर होतो. अशनीच्या रचनात्मक गुणधर्मांची तुलना लघुग्रहांच्या विविध वर्गांशीदेखील केली जाते आणि त्यावरून अशनी किती जुने आहेत (४.६ अब्ज वर्षांपर्यंत) याचा अभ्यास होतो.

आजवर पृथ्वीवर ५०,००० अशनीचे तुकडे सापडले आहेत. यापैकी ९९.८ टक्के लघुग्रहांपासून आलेले आहेत. उरलेले ०.२ टक्के मंगळ आणि चंद्रावरून येणारे अशनी आहेत. एखादा मोठा अशनी जर पृथ्वीवर आदळला तर मोठे विवर तयार होते आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे लोणार तळे! हे सुंदर नृत्य पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता नसते. सर्वांनी निरभ्र आकाशातील उल्का वर्षावाचा आनंद जरूर घ्यावा.

First Published on: April 28, 2024 4:00 AM
Exit mobile version